Next
पुण्याच्या देवेंद्रचे पॉवरलिफ्टिंगमध्ये वर्चस्व
BOI
Friday, July 06, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

देवेंद्र खुळे

पॉवरलिफ्टिंग हा क्रीडाप्रकार खरे तर दुर्लक्षितच, पण काही खेळाडूंच्या कामगिरीमुळे काही क्रीडा प्रकारांनादेखील लोकाश्रय मिळतो. पुण्याच्या देवेंद्र खुळे या खेळाडूने पॉवरलिफ्टिंगच्या आशियाई सबज्युनिअर स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदकांची कमाई केली आणि अचानक या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या पॉवरलिफ्टर देवेंद्र खुळेबद्दल...
...........................
भारतात राष्ट्रीय स्तरावर पॉवरलिफ्टिंग खेळात प्राविण्य मिळवणारे बरेच खेळाडू आहेत, पण काही काळानंतर या क्रीडाप्रकारात खेळणाऱ्यांमध्ये सातत्य राहत नाही. याला तशीच काही कारणेही आहेत. एक तर या खेळासाठी लागणारे साहित्य, कपडे अशी साधने महागडी आहेत. त्यातच सामान्य कुटुंबात जन्मलेल्या देवेंद्रसारख्या खेळाडूला तर या खेळात कारकीर्द घडवताना अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्याचे वडील गणेश खुळे हेदेखील याच खेळातील खेळाडू. त्यामुळे वडिलांचा खेळ पाहूनच देवेंद्रलाही पॉवरलिफ्टिंगची गोडी लागली. वडिलही या खेळात प्रगती करत होते, पण घरची परिस्थिती पाहता त्यांनी आपल्या स्वप्नांना मुरड घातली आणि ते पोटापाण्याच्या व्यवसायाकडे वळले. मात्र वडिलांचे स्वप्न आपण पूर्ण करायचे, हे ध्येय घेऊन देवेंद्र पुण्यातील सागर मोरे या प्रशिक्षकांकडे त्यांच्याच शिवाजी नगर येथील पॉवर हाऊस जिममध्ये दाखल झाला.

पंडीतराव आगाशे शाळेत शालेय शिक्षण पूर्ण करून देवेंद्रने पुना कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आता तो बारावीत आहे.  शिक्षणाइतकाच तो पॉवरलिफ्टिंगच्या बाबतही गंभीर आहे.  एका गोष्टीमुळे दुसऱ्या गोष्टीचे नुकसान होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत तो वाटचाल करत आहे. या वाटचालीत देवेंद्रला प्रशिक्षक सागर मोरे, आई-वडील यांच्याबरोबरच सोमनाथ बेलदरे या क्रीडाप्रेमी व्यक्तीचेदेखील मोलाचे सहकार्य मिळत आहे. अशी माणसे पाठीशी असली, की सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्याचे बळ मिळते.  

देवेंद्र आज केवळ अठरा वर्षांचा आहे, त्याच्यासमोर खूप मोठी कारकीर्द आहे. त्याने गेल्या दोन वर्षांपासून म्हणजेच दहावी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पॉवरलिफ्टिंगमध्ये स्पर्धात्मक सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि केवळ दोनच वर्षांत त्याच्या नावावर आठ सुवर्ण, तीन ब्राँझ आणि दोन रौप्य अशी एकूण तेरा पदके जमा झाली आहेत.

राजस्थानमधील उदयपूरमध्ये नुकतीच सबज्युनिअर गटाची आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धा झाली. या स्पर्धेत देवेंद्रने कमाल केली. इतक्या मोठया स्तरावर प्रथमच खेळत असताना त्याने ९३ किलो वजनी गटात एकूण चार सुवर्ण आणि एक रौप्य अशी एकूण पाच पदके मिळवत जाणकारांना आश्चर्याचा धक्का दिला. या स्पर्धेला जाण्यासाठी, युनिफॉर्म घेण्यासाठी, तसेच प्रवास, निवास व खाण्यापिण्यासाठी पैसे जमवणे हे देवेंद्रसमोर खूप मोठे आव्हान होते. घरची आर्थिक परिस्थिती फारशी सक्षम नसताना तर त्याला एक क्षण ही स्पर्धा खेळायलाच नको असेही वाटले, पण वडिलांनी प्रयत्न सोडले नाहीत. त्यांनी मित्रमंडळी, आपला व्यवसाय यातून पैसे गोळा केले व देवेंद्रला या स्पर्धेसाठी रवाना केले. या स्पर्धेत जगभरातून खेळाडू आले होते, त्यांचे कोणतेही दडपण न घेता देवेंद्रने आपण कोणत्या परिस्थितीचा सामना करून इथे आलो आहोत याचे भान ठेवले व पहिल्या फेरीपासून आपले वर्चस्व सिद्ध करायला सुरुवात केली. या स्पर्धेत त्याने चार सुवर्ण पदके जिंकली आणि एका लढतीत त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, पण पदार्पणाच्या स्पर्धेत ही कामगिरी निश्चितच ऐतिहासिक आहे. पण दुर्दैवाने अशा खेळाची आणि खेळाडूंची माध्यमांकडूनही फारशी दखल घेतली जात नाही. 

स्कूलिंपिक स्पर्धा जेव्हा झाल्या त्यात देवेंद्रने रौप्यपदक पटकावले होते आणि तिथूनच त्याचा प्रवास सुरू झाला होता.  आजवर त्याने तीन राष्ट्रीय, तीन राज्यस्तरीय आणि तीन जिल्हास्तरीय स्पर्धा खेळल्या असून या सर्व स्पर्धांमध्ये त्याने सुवर्णपदके पटकावली आहेत. खेळाडूला केवळ कामगिरीचे समाधान नसते, तर कोणीतरी आपली दखल घेत आहे याचा आनंद मोठा असतो.

भारतात क्रिकेटवेड्या वातावरणात जी इतर खेळांची अवस्था आहे, ती पाहता पॉवरलिफ्टिंग या खेळाला लोकमान्यता व राजमान्यता मिळवून देण्यासाठी देवेंद्रसारख्याच खेळाडूंना अथक परिश्रम घ्यावे लागतील. आता आगामी मोसमात राष्ट्रकूल युवा स्पर्धा, विश्वविजेतेपद युवा स्पर्धा होणार आहेत त्यासाठी देवेंद्र तयारी करत आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, संघटना यांनी पुढे येत मदतीचा हात दिला तर देवेंद्र आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपले वर्चस्व सिद्ध करेल यात शंका नाही. या लेखाद्वारे देवेंद्रसाठी मदतीचे आवाहन आम्ही करत आहोत. त्याचे वडील गणेश खुळे यांच्याशी ९८९०८०१६४६ या क्रमांकावर इच्छूक व्यक्तींनी संपर्क साधावा.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. 'क्रीडारत्ने' सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link