Next
‘प्रामाणिक रुग्णसेवेतून दात्यांच्या पैशाला न्याय द्यावा’
डॉ. अजय चंदनवाले यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Tuesday, May 07, 2019 | 05:17 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘ससून सर्वोपचार रुग्णालयाला अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सेवांचे केंद्र बनविण्यासाठी छाब्रिया कुटुंबासारखे अनेक दानशूर लोक पुढे येत आहेत. ‘ससून फॉर कॉमनमॅन’ हे सत्यात उतरविण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनच्या देणगीचा वाटा मोठा आहे. डॉक्टर, स्टाफ व नर्सेससह आपण सर्वांनी रुग्णालयात येणार्‍या प्रत्येक रुग्णाची मनोभावे आणि प्रामाणिक सेवा करून दात्यांनी दिलेल्या पैशाला योग्य न्याय द्यायला हवा,” असे प्रतिपादन मुंबईतील जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता व ससून सर्वोपचार रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी केले.

फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे संस्थापक प्रल्हाद पी. छाब्रिया यांच्या तिसर्‍या स्मृतीदिनानिमित्त ‘फिनोलेक्स’ व मुकुल माधव फाउंडेशनच्या एक कोटी ३० लाख रुपयांच्या अर्थसाह्यातून ससून रुग्णालयात उभारण्यात आलेल्या यकृत प्रत्यारोपण केंद्राचे उद्घाटन प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. आर. एस. वाडिया व ससून रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण झालेले पहिले दोन रुग्ण बाबासो जाधव आणि सणस यांच्या हस्ते झाले. या वेळी फिनोलेक्सचे अध्यक्ष प्रकाश छाब्रिया, मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितु प्रकाश छाब्रिया, होप फाउंडेशनच्या अध्यक्षा अरुणा कटारा, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, डॉ. शीतल धडफळे, डॉ. कमलेश बोकील, डॉ. संजीव ठाकूर यांच्यासह प्रल्हाद छाब्रिया यांचा मित्रपरिवार, डॉक्टर, नर्सेस आदी उपस्थित होते. एक कोटी ३० लाख रुपयांच्या निधीतून अत्याधुनिक उपकरणे आणि शस्त्रक्रिया कक्ष उभारण्यात आला आहे.

डॉ. चंदनवाले म्हणाले, ‘ऑपरेशननंतर योग्य औषधोपचार आणि प्रतिबंधात्मक काळजी घेण्यासाठी रुग्णांना मार्गदर्शन केले पाहिजे. आपण काम करत असलेल्या ठिकाणची स्वच्छता, रुग्णाला पाहताना घ्यावयाची काळजी यावर लक्ष दिले पाहिजे. ‘ससून’च्या अधिष्ठातापदी निवड झाल्यानंतर सामान्य रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी या पदाचा वापर जास्तीत जास्त केला. आज ससूनकडे पाहण्याचा लोकांचा बदललेला दृष्टिकोन बघून मलाही आनंद होतो.’

डॉ. आर. एस. वाडिया म्हणाले, ‘ससूनमध्ये येणार्‍या प्रत्येक रुग्णाला बरा होऊन घरी जाण्याची आशा असते. येथे कार्यरत डॉक्टर आणि सर्वच स्टाफने रुग्णाला तो विश्वास दिला पाहिजे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला ससून रुग्णालय आपल्यासाठी आहे, असे वाटायला पाहिजे. माझा जन्मही ससून रुग्णालयातच झाला होता. माझे अनेक विद्यार्थी ससून रुग्णालयात आहेत. त्यामुळे छाब्रिया कुटुंबाकडून आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.’

डॉ. नणंदकर म्हणाले, ‘शासकीय रुग्णालयांकडे जाण्यासाठी रुग्ण फारसे इच्छुक नसतात; परंतु, गेल्या काही वर्षांत ‘ससून’ने आपल्या आरोग्यसेवेत आमूलाग्र बदल केले आहेत. मुकुल माधव फाउंडेशन, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्यासह समाजातील इतर देणगीदारांना ‘ससून’चे रूप पालटण्यासाठी मोठे अर्थसाह्य केले आहे.’

प्रकाश छाब्रिया म्हणाले, ‘सामान्य रुग्णांसाठी ‘ससून’मधील डॉक्टर आणि स्टाफ देवाप्रमाणे आहेत. त्यांची ही भावना लक्षात घेऊन येथील आरोग्यसुविधा उच्च दर्जाच्या व्हाव्यात, या प्रेरणेने आम्ही गेली ३-४ वर्षांपासून सातत्याने काम करीत आहोत. वडिलांच्या दातृत्वपणामुळे भविष्यातही ‘ससून’ला सामान्य रुग्णांसाठी लागेल ती मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.’

रितु छाब्रिया म्हणाल्या, ‘आर्थिकदृष्ट्या कमकुवत रुग्णांना चांगल्या आरोग्यसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मुकुल माधव फाउंडेशन सातत्याने प्रयत्न करीत आहे. नवजात शिशू अतिदक्षता विभाग, एन्डोस्कोपी केंद्र, लेझर डेंटल युनिट, विश्रांतीकक्ष अशा सुविधा उपलब्ध केल्यानंतर आता यकृत प्रत्यारोपण केंद्र उभारले आहे. यामुळे गरजू रुग्णांना अल्पदरात यकृत प्रत्यारोपण करणे शक्य होणार आहे.’

यकृत प्रत्यारोपण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी प्रकाश छाब्रिया यांनी आणखी एक कोटी रुपये ‘ससून’ला देत असल्याचे जाहीर केले. पुढील ९० दिवसांत त्या एक कोटीच्या देणगीचा विनियोग करावा, असे त्यांनी सूचित केले. ही एक कोटी रुपयांची देणगी यकृत प्रत्यारोपण केंद्राच्या रिकव्हरी कक्षाच्या उभारणीसाठी वापरली जाणार असल्याचे रितू छाब्रिया यांनी सांगितले.

‘यकृत प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिल्यानंतर आम्ही अनेक रुग्णालयात फिरलो; पण त्यासाठी लागणारा खर्च ऐकून जगण्याची आशा सोडली होती. मात्र, ‘ससून’मध्ये हे प्रत्यारोपण करण्यात येणार असल्याबाबत माझ्या मुलाने व सुनाने वाचले आणि आम्ही संपर्क केला. खासगी रुग्णालयांतील खर्च ऐकून जगण्याची आशा सोडलेला मी आज ठणठणीत बरा झालो आहे. ‘ससून’मधील डॉक्टर आणि नर्सेस यांच्या रूपाने मला देव भेटला. पुन्हा जगण्याची संधी मिळाली,’ अशी प्रतिक्रिया ससूनमध्ये यकृत प्रत्यारोपण झालेले पहिले रुग्ण जाधव यांनी व्यक्त केली. 

‘पुणे, मुंबईसह इतर अनेक ठिकाणच्या रुग्णालयांत आम्ही गेलो; पण ऑपरेशनचा खर्च ऐकून हताश झालो होतो. शेवटी ‘ससून’मधील यकृत प्रत्यारोपणाबाबत माहिती मिळाली आणि माझे ऑपरेशन झाले. काही दिवसांचा सोबती आहे, असे वाटत असताना ‘ससून’मुळे पुनर्जीवन मिळाले. ३० वर्षे लष्करात ज्या हिंमतीने सेवा केली, त्याच हिंमतीने आज सगळी कामे करीत आहे. ससून रुग्णालयातील सर्वांनीच उत्तम काळजी घेतली व जगण्याची संधी दिली याबद्दल आभार,’ असे ससूनमध्ये यकृत प्रत्यारोपण झालेले दुसरे रुग्ण सणस यांनी सांगितले.

अरुणा कटारा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. कमलेश बोकील व डॉ. शीतल धडफळे यांनी ‘ससून’मधील पहिल्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबाबत सांगितले. डॉ. ठाकूर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. नेहा सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पठाण यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search