Next
रवि वर्मा यांच्या दुर्मिळ मुद्राचित्रांचे प्रदर्शन
पु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्ह, ‘झपूर्झा’तर्फे आयोजन
BOI
Monday, October 22, 2018 | 01:18 PM
15 0 0
Share this article:


पुणे :  भारतीय चित्रकलेला जागतिक ओळख देणारे महान चित्रकार राजा रवि वर्मा यांनी काढलेल्या चित्रांच्या ओलियोग्राफचे प्रदर्शन पु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्ह आणि झपूर्झा-क्रिएटिव्ह हबच्या वतीने पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. बालगंधर्व रंगमंदीर कलादालनात २७ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान हे ‘ए ट्रिब्यूट राजा रवि वर्मा’ प्रदर्शन भरवण्यात येणार असून, याद्वारे पुणेकरांना राजा रवि वर्मा यांच्या अत्यंत दुर्मिळ कलाकृती पाहण्याची संधी मिळणार आहे. हे प्रदर्शन सकाळी ११ते रात्री आठ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असून,  २६ ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता याचे उद्घाटन होणार आहे.

राजा रवि वर्मा
या प्रदर्शनाबाबत झपूर्झा-क्रिएटिव्ह हबचे संस्थापक व कला रसिक अजित गाडगीळ म्हणाले, ‘आजच्या पिढीला राजा रवि वर्मा यांनी निर्माण केलेल्या कला वारशाची ओळख व्हावी, या हेतूने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. यात राजा रवि वर्मा आणि रवि वर्मा प्रेसची शंभरहून अधिक मुद्राचित्रे मांडली जातील. यात रामायण, महाभारत, पौराणिक कथा व विविध देवी-देवतांची मुद्राचित्रे;तसेच, त्यांच्या चित्रांवर आधारित काडेपेटीचे छाप, निरनिराळी लेबल्स, मूर्ती, कॅलेंडर्स यांचाही समावेश असेल. राजा रवि वर्मा यांच्या चित्रांपासून प्रेरणा घऊन चित्रकारिता सुरू केलेले चित्रकार म. वि. धुरंधर, श्री. माळी यांचीही मुद्राचित्रे येथे असतील.’  

 ‘जानेवारी १८९४ मध्ये रवि वर्मा यांनी जर्मनीतून प्रिंटिंग प्रेस आणि तंत्रज्ञ बोलावून मुंबईत गिरगाव येथे रवि वर्मा प्रेसची स्थापना केली. ‘बर्थ ऑफ शकुंतला’ (शकुंतला जन्म) हे इथे छापलेले पहिले चित्र आणि तेही या प्रदर्शनात असणार आहे. त्या पाठोपाठ लक्ष्मी आणि सरस्वती या चित्रांचीही निर्मिती झाली आणि आजही ही चित्रे लोकप्रिय आहेत. विविध मुद्राचित्रे एकाच ठिकाणी पाहायला मिळणारे हे पहिलेच प्रदर्शन आहे’, असे क्यूरेटर विक्रम मराठे यांनी सांगितले.

दुर्मिळ लिथोग्राफचे मोठे कलेक्शन
‘या प्रदर्शनात लिथोग्राफी तंत्राची माहितीही देण्यात येणार असून, पुण्यात १८८८ मध्ये छापण्यात आलेला दुर्मिळ लिथोग्राफ व लिथोग्राफीची शिळाही येथे असेल. रवि वर्मांच्या संदर्भातील सर्व छायाचित्रे प्रदर्शनात असतील. प्रदर्शनादरम्यान २७ व २८ ऑक्टोबर रोजी अजय देशपांडे आणि आदित्य शिर्के हे व्यक्तिचित्रांचे प्रात्यक्षिक सादर करतील’, असे मुख्य क्यूरेटर दिलीप जोशी यांनी सांगितले.

कार्यक्रमाविषयी :
राजा रवि वर्मा यांच्या दुर्मिळ मुद्राचित्रांचे प्रदर्शन
स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर कलादालन
दिवस व वेळ : २७ ते ३१ ऑक्टोबर, सकाळी ११ ते रात्री ८.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search