Next
‘त्या’ ५१ वर्षे सांभाळताहेत भजनाची परंपरा
देवरुखमधील ज्योती महिला भजन मंडळाची कामगिरी
संदेश सप्रे
Monday, December 31, 2018 | 04:13 PM
15 0 0
Share this story

सन १९८२मध्ये रत्नागिरी आकाशवाणी केंद्रात भजन सादर केलेल्या ज्योती महिला भजन मंडळाच्या महिला.

देवरुख :
रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील ज्योती महिला भजन मंडळाने पारंपरिक भजनाचा समृद्ध वारसा तब्बल तीन पिढ्या सांभाळला आहे. ५१ वर्षांची परंपरा लाभलेल्या या मंडळाने सलग २५ वर्षे रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावर भजन सादर करण्याचा मानही मिळवला आहे. आजच्या विज्ञानयुगात लोकप्रबोधनाचे साधन म्हणून तिसऱ्या पिढीतील महिला हे भजन सादर करीत आहेत. लोककलांना आधुनिकतेचा साज चढताना आणि त्यात नव्या गाण्यांच्या चालीवर त्या लोककलांची पारंपरिकता नष्ट होत असताना भजनी मंडळाचे उदाहरण आदर्श घेण्यासारखे आहे.

संतपरंपरेतून सुरू असलेल्या वारकरी सांप्रदायिक भजनाची गोडी सध्याच्या आधुनिक युगात, रिमिक्स जमान्यात काहीशी कमी होत असल्याचे दिसते. ही भजन परंपरा टिकून राहावी व आजच्या तरुणाईला तिची गोडी लागावी, या हेतूने काही प्रसिद्ध भजनप्रेमी आणि संगीत संस्थांनी पुढाकार घेऊन या भजनाला शास्त्रीय स्वरूप दिले. तेथूनच खरी संगीत भजनाला सुरुवात झाली. यात देवरुखच्या ज्योती महिला भजन मंडळाचा समावेश आहे. 

संगमेश्वर तालुका हे विविध पारंपरिक कलांचे माहेरघर मानले जाते. त्यात भजन, कीर्तन, जाखडी, नमन आदींचा समावेश होतो. आध्यात्मिक ज्ञान सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे सामर्थ्य भजनात आहे. म्हणूनच आजही भजनात संतांनी लिहिलेले अभंग गायले जातात. अभंगांशिवाय गवळण, भारूड आदी प्रकारही यातून ऐकायला मिळतात. ‘टी २०’ भजनाच्या जमान्यात ही पारंपरिकता लोप पावत असताना देवरुखातील महिला भजन मंडळाने मात्र पारंपरिकता जोपासण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. 

सन १९६६मध्ये देवरुखच्या मधल्या आळीतील उल्काताई गद्रे, उषा साने, सुनंदा फाटक, सुलोचना साने, सुनीता दांडेकर, मंगला ठकार, मालती देसाई, उषा दांडेकर, प्रमिला भिडे, गोदूताई जोशी, मामी परांजपे यांच्यासह काही महिलांनी या भजन मंडळाची स्थापना केली. संसारगाडा हाकताना आलेल्या अडचणींवर मात करून या महिलांनी केवळ हरिनामाचा जप व्हावा म्हणून भजनाची आवड जोपासली. त्या वेळी गणेशोत्सवात अनेकांच्या घरी भजन करण्याची संधी या महिलांना मिळाली. यातून महिलांच्या सुरेल भजनाला मागणी वाढली आणि देवरुख शहर आणि परिसरात त्यांचे भजनाचे कार्यक्रम सुरू झाले. 

हे भजन एवढे लोकप्रिय झाले, की १९८२मध्ये त्यांना रत्नागिरी आकाशवाणीने आपली कला सादर करण्याची संधी दिली. महिलांचे पहिलेच भजन पाहून आकाशवाणीने महिन्यातून एकदा या महिलांना संधी देऊन २००८पर्यंत या मंडळाचे कार्यक्रम रसिकांसमोर सादर केले. १९९०नंतर या भजनाची परंपरा दुसऱ्या पिढीतील सविता गद्रे, नेत्रा दांडेकर, छाया भिडे, शालिनी भागवत, मंजिरी दांडेकर, मालती जोगळेकर, सुरेखा यलगुडकर, मेघा जोशी, वासंती राजवाडे यांनी पुढे सुरू ठेवली. जिल्हाभरात होणाऱ्या भजन स्पर्धांत भाग घेऊनही या महिलांनी आपली छाप पाडली. 

सध्याची तिसरी पिढी हा भजनाचा वारसा सांभाळत आहे.

आज तिसऱ्या पिढीतील महिलांनीही ही परंपरा सुरू ठेवली आहे. मानसी साठे, वर्षा फाटक, मीनल देसाई, क्षमा साठे, अर्चना भिडे, सुप्रिया जोशी, श्रद्धा राजवाडे, सुखदा राजवाडे, मीरा साने यांच्यासह या भागातील महिला ही परंपरा जोपासत आहेत. मंडळाच्या या संपूर्ण प्रवासात विनायक फाटक, उपेंद्र आगाशे, अभिषेक भालेकर, किशोर भाटे यांनी तबल्याची, तर दादा दांडेकर, शशिकांत भागवत (गुरुजी), अमोघ पेंढारकर यांनी हार्मोनिअमची साथ दिली. प्रसिद्ध हार्मोनियमवादक (दिवंगत) बाबीराव सरमुकादम यांनीही हे भजन पाहून या महिलांना मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहन दिले होते.  

अलीकडे भजनातही ‘टी २०’चा प्रकार सुरू असून, त्यात समाजप्रबोधन कमी आणि निरर्थक प्रकारच अधिक असतात. या पार्श्वभूमीवर, केवळ हरिनाम आणि समाजप्रबोधनाची परंपरा सुरू ठेवलेल्या या महिलांच्या भजनाला आजही जिल्ह्यात मागणी आहे.

संपर्क : छाया उदय भिडे – ९४२११ १३९७९
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link