Next
‘नऊवारीचा नखरा’ साता समुद्रापार
BOI
Tuesday, November 28 | 05:10 PM
15 0 0
Share this story

‘मैं कर सकती हूँ...’ असं फक्त एकदाच वाटण्याची गरज असते. मग आपल्यासाठी आभाळ ठेंगणं असतं.. आणि मिळणारं यश कवेत घेण्यासाठी आकाशही आपले पंख पसरू देतं.. हेच दाखवून दिलंय पुण्याच्या सुचेता कुलकर्णी यांनी.. शिवण आणि भरतकामाच्या कलेला त्यांनी स्वतःच्या कल्पकतेची जोड दिली.नऊवारी साड्या शिवून देण्याच्या त्यांच्या व्यवसायाची दखल घेऊन झाशीच्या राणीच्या इंग्रजी जीवनपटासाठी २५० नऊवारी साड्या शिवून देण्याची ऑर्डर त्यांना मिळाली आणि त्यांनी ती पूर्णही केली आहे. त्या निमित्ताने विशेष लेख... 
......
फार पूर्वी शिवणकाम, भरतकाम, विणकाम या गोष्टी आणि मुलगी हे समीकरणच होतं. प्रत्येक मुलीला या कला अवगतच असायच्या, किंबहुना त्या अवगत करून घ्याव्या लागायच्या. कारण, बघण्याचा कार्यक्रम असला, की शिवणकाम वगैरे येतं का, हा प्रश्न हमखास विचारलाच जायचा. फार काही नसलं, तरी घरातलं जुजबी शिवण यावं, अशी अपेक्षा असायची. आणि तीसुद्धा फार काही गैर नव्हती. कालांतराने याच कलेला मुली फार दुय्यम लेखायला लागल्या. शिक्षणाच्या आणि करिअरच्या कक्षा रुंदावल्यानंतर या कलेचं महत्त्व कमी झालं. ज्यांना काहीच येत नाही, त्या घरात बसल्या बसल्या ही कामं करतात असा एक समज निर्माण झाला; मात्र कोणतीच कला निरुपयोगी नाही, असं म्हणतात आणि सुचेता कुलकर्णी यांनी पुन्हा हेच सिद्ध केलं आहे. साध्या शिवणकामाच्या कलेतून त्यांनी स्वावलंबी होत व्यवसायाची उभारणी केली. नेहमीचे पंजाबी ड्रेस, ब्लाउज यापेक्षा ग्राहकांना काहीतरी वेगळं द्यावं, या विचारानं त्यांनी नऊवारी साडी शिवण्याची कला आत्मसात केली. आपण कितीही आधुनिक जगात वावरत असलो, तरी सणावाराला पारंपरिक पोषाखालाच पसंती दिली जाते, हेच लक्षात घेऊन त्यांनी पारंपरिक पेहरावाला नवा चेहरा दिला. नऊवारी साडीत स्त्रीचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. प्रत्यक्ष साडी आणून ती नेसणं काहीसं कठीण आहे. त्यामुळे ही काहीशी अवघड वाटणारी साडी चुटकीसरशी नेसता आली तर, असा विचार करून सुचेता कुलकर्णी यांनी नऊवारी साडी कशी शिवता येईल याचा विचार केला आणि तो प्रत्यक्षात आणला.

या साड्या शिवून देण्याची घोडदौड सुरू झाली, ती पुन्हा थांबलीच नाही. त्याबरोबरच मुंजीची सोवळी शिवणे, मुलींसाठी खणाची परकर-पोलकी अशा अनेक पारंपरिक पेहरावांना त्यांनी पुन्हा फॅशनेबल केलं. मुली आपल्या लग्नात अशा नऊवारी साड्यांची ऑर्डर देऊन खास साड्या शिवून घेऊ लागल्या. लेकीबरोबर आयांनीदेखील आपली हौस भागवून घेतली. हळूहळू ही फॅशन कानोकानी जात थेट सातासमुद्रापार पोहोचली. आणि तिथून ऑर्डर्स येऊ लागल्या. प्रारंभी त्यांनी चिंचवडगावात हा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्या सिंहगड रोडवर स्थायिक झाल्या. सध्या सिंहगड रोड आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी त्यांचा ‘नऊवारीचा नखरा’ हा व्यवसाय तेजीत सुरू आहे. त्यांचे कुटुंबीयदेखील या कामात हातभार लावत आहेत.

ही सोपी आणि आकर्षक रेडीमेड नऊवारी साडी आता महाराष्ट्रात, देशातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध झाली आहे. ‘स्वोडर्स अँड सेप्टर्स’ नावाच्या झाशीच्या राणीच्या जीवनावरील इंग्रजी जीवनपट ब्रिटनमध्ये तयार होत असून, २०१८मध्ये तो सादर होणार आहे. त्यासाठी २५० नऊवारी साड्यांची ऑर्डर सुचेता यांना मिळाली. नेहमी भरजरी साड्या शिवल्या जात असतात; मात्र या सिनेमासाठी जुन्या काळातल्या साड्या हव्या होत्या. कॉटन, सेमी कॉटन साड्यांची मागणी होती. उठावदार रंग नको, शेतकरी, लोहार, भाजीवाली बाई अशांसाठी साड्या हव्या होत्या. त्यामुळे जुन्या काळाला साजेशा साड्यांची निवड हा मुख्य भाग होता. वेगवेगळ्या म्युझियममध्ये जाऊन जुन्या काळातल्या वस्त्रांचा अभ्यास करून त्यांनी साड्यांची निवड केली आणि ही ऑर्डर पूर्ण केली.

अनेक सेलेब्रिटी आणि प्रसिद्ध राजकीय नेत्यांच्या कुटुंबांतील महिलांनी अशा तयार नऊवारी साड्या सुचेता यांच्याकडून खास ऑर्डर देऊन शिवून घेतल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील, सुप्रिया सुळे आदींच्या कुटुंबीयांनी सुचेता यांच्याकडून या साड्या शिवून घेतल्या आहेत. अमेरिका, इंग्लंड, मॉरिशस आणि ऑस्ट्रेलियातील मराठी मंडळातील सदस्यांनी तेथील स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ही रेडीमेड साडी नेसून संस्कृतीचे जतन केले आहे आणि पारितोषिकेही मिळविली आहेत, असे सुचेता सांगतात.

कोणतीही मोठी ऑर्डर पूर्ण करून द्यायची असेल, तर अख्खं कुलकर्णी कुटुंब कामाला लागतं. शिवणकाम करणाऱ्या अन्य महिलांची मदत घेण्यापेक्षा घरातलीच मंडळी शिवण मशीनवर बसतात आणि काम सुरू करतात; मात्र फिनिशिंगचा टच सुचेता यांचाच असतो. प्रत्येकच साडी त्यांच्या हाताखालून गेलेली असते. म्हणूनच आजपर्यंत या साड्यांची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. या कामी त्यांना पती धनंजय यांचा मोठा पाठिंबा आहे. आता मुलगा परिमलदेखील साडी खरेदी, निवड, दागिने यासाठी मदत करतो. मुलगी सुहिता ‘भरतनाट्यम्’मध्ये बीए करते आहे. तीदेखील यात लक्ष घालते. नवे ट्रेंड्स आणण्यासाठी तिचा पुढाकार असतो. ‘भरतनाट्यम्’चे ड्रेस शिवण्यासाठी ती आता मदत करत आहे. तसेच त्यांनी सून हिमानीदेखील आता व्यवसायात मदत करते. सुचेता यांच्या मातोश्री रोहिणी पिसोळकर घरातली सगळी जबाबदारी सांभाळतात. म्हणूनच त्यांची लेक आज एक यशस्वी ‘बिझनेस वुमन’ होऊ शकली आहे. त्यांच्याकडे असलेली शिवणाची मशीन्सदेखील आईचं, सासूबाईंचं अशी जुनीच आहेत. ‘जुनं ते सोनं असल्यामुळे फक्त मोटर बसवून त्यात बदल केलाय, बाकी सगळं या पारंपरिक यंत्रांच्या आशीर्वादानं यशस्वी होतंय,’ असं त्या म्हणतात.

‘पिंगा’साठी मागणी वाढतेय...
‘बाजीराव मस्तानी’ चित्रपट आल्यावर ‘पिंगा डान्स’साठी प्रसिद्ध झालेल्या साड्यांना भारतातून आणि परदेशातूनही यासाठी खूप मागणी होती, असं कुलकर्णी यांनी सांगितलं.

- सीमा शेख-देसाई
ई-मेल : seemashaikh11@gmail.com
मोबाइल : ९८२०९ ६९४३१

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

(‘स्वोर्डस् अँड सेप्टर्स’ हा चित्रपट ब्रिटनमध्ये तयार होत आहे. देविका भिसे, स्वाती भिसे आणि ऑलिव्हिया एम्डेन यांनी त्याचे लेखन केले असून, स्वाती भिसे दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत आहेत. देविका भिसे राणी लक्ष्मीबाईची भूमिका करणार असून, मिलिंद गुणाजी, सिया पाटील, यतीन कार्येकर, नागेश भोसले, अजिंक्य देव, पल्लवी अजय पाटील आदी मराठी कलाकारही त्यात भूमिका करणार आहेत. चित्रपटाविषयी अधिक माहितीसाठी https://goo.gl/pFDBJG येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link