‘करू या देशाटन’ सदराच्या मागील दोन भागांत आपण विजयनगरची सैर केली. विजयनगर साम्राज्याचे अवशेष तुंगभद्रेच्या उत्तर तीरावर (कर्नाटकच्या) कोप्पळ जिल्ह्यातही विखुरलेले आहेत. आजच्या भागात त्या जिल्ह्याची माहिती घेऊ या...
.........

तुंगभद्रा नदीच्या उत्तर काठावर आनेगुंदी आहे. तेथील रामायणाचा संदर्भ घेत असतानाच एक कथा नव्याने समजली. त्यात संदर्भ आला चापेकर बंधूंचा. बाळकृष्ण हरी चापेकर रँडच्या वधानंतर आनेगुंदीच्या जवळील गंगावटी गावाजवळील शिळांच्या डोंगरकपारीत सहा महिने दडून बसले होते. स्थानिक लोकांनी त्यांना खूप सहकार्य केले होते. रायचूरचा पोलीस अधिकारी स्टीफन्सन याने त्यांना अटक केली. त्याची गुप्तता पाळण्यात आली होती. त्या शिळांमध्ये ते कोठे दडले होते, हे पूर्ण गुलदस्त्यात होते; पण त्यांना तेथेच अटक झाली, अशी नोंद आहे. महाराष्ट्राबाहेर गेल्यावर एखादा मराठी संदर्भ खूप जवळचा वाटतो. त्याच्याशी इतिहास जोडलेला असेल, तर आणखी आपुलकी वाटते.
या संदर्भानंतर आता कोप्पळ जिल्हातील इटगी महादेव मंदिरापासून सहलीची सुरुवात करू या. ‘इटगी’ हे नाव फारसे ऐकलेले नाही. काय असेल बरे इथे, असा विचार करीत असतानाच संकेतस्थळावर क्लिक झाले होते आणि वास्तुकलेचे एक नवे दालन दिसले. हे मंदिर फारसे प्रसिद्ध झालेले नाही. त्यामुळे पर्यटकांच्या यादीमध्ये याचे नाव अभावाने दिसून येते. या लेखामुळे पर्यटक नक्कीच इकडे वळतील, एवढे हे देखणे मंदिर आहे.
इटगी : गदगपासून ३५ किलोमीटर आणि हंपीपासून ६० किलोमीटरवर थोडे आतील बाजूस हे ठिकाण आहे. मृदू पाषाणात बांधलेले हे महादेव मंदीर म्हणजे उत्तमरीत्या कोरलेल्या भिंती आणि खांबांसह कलांचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. चालुक्य कारागीरांच्या उत्तुंग कारागिरीची ओळख हे मंदिर देते. येथील महादेव मंदिर हे चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याचा सेनापती महादेव याने १११२मध्ये बांधले. या गोष्टीला आता ९०६ वर्षांचा काळ लोटला आहे. धारवाडजवळील अन्नीगेरी येथील अमृतेश्वर मंदिरासारखीच याची बांधणी आहे. वर्ष १११२मधील शिलालेख येथे असून ‘मंदिरांमध्ये सम्राट’ असा उल्लेख त्यात आहे. इतिहासकार हेन्री कॉसन्स यांनी हे स्मारक हळेबिडूनंतर कर्नाटकातील सर्वोत्तम असे म्हटले आहे. पुरातत्त्व सर्वेक्षणानुसार हे राष्ट्रीय स्मारक म्हणून संरक्षित करण्यात आले आहे. १३ इतर छोट्या मंदिरसमूहांसह या मंदिराच्या बाजूने धर्मशाळा, पुष्करिणी दिसून येते. आयताकृती पुष्करिणी खूपच आकर्षक आहे. पूर्वेकडे तोंड असलेल्या मंदिराला उत्तरेच्या आणि दक्षिण दिशेने असलेल्या दोन्ही बाजूंना पोर्चेस आहेत. खुला मंडप आणि सभोवताली असलेल्या लॉनमुळे मंदिराची शोभा अधिक खुलून दिसते. ६४ खांबांवर मुख्य खुला सभामंडप आहे. त्यातील २४ खांब जमिनीपासून छतापर्यंत आहेत. उरलेले सभोवतालच्या कमी उंचीच्या छतापर्यंत आहेत. मुख्य चार खांब कीर्तिमुखाने सजविलेले आहेत.
सभागृहातील प्रत्येक खांब भौमितिक नक्षीने खालपासून वरपर्यंत कोरलेला आहे. नंदीजवळ असलेल्या एका नादुरुस्त आडव्या दगडी तुळईला आधारही दिलेला दिसून येतो. सोबत दिलेल्या विहंगम फोटोवरून मंदिर संकुलाची कल्पना करता येईल.
किन्नल/किन्हल : कोप्पळपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. खेळण्यांचे आणि पारंपरिक रंगीबेरंगी हस्तकला प्रतिमांचे उत्पादन करण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. विणकाम, प्राण्यांच्या शिंगापासून शोभेच्या वस्तू आणि मातीची भांडी बनवण्याचे काम या ठिकाणी चालते.
कनकगिरी : कनक मुनींनी येथे तपश्चर्या केली होती, म्हणून कनकगिरी हे नाव रूढ झाले. त्याचे मूळ नाव सुवर्णगिरी असे आहे. बहुधा मौर्य राजवटीत हे या भागातील सुभ्याचे मुख्य गाव असावे. या भागात सम्राट अशोकाचे शिलालेख सापडले आहेत. कनकगिरीच्या नायकांनी येथे अनेक मंदिरे बांधली. यापैकी कनकचलापथी मंदिर प्रमुख आहे. विजयनगर काळातील दक्षिण भारतीय वास्तुकलेचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. तसेच उत्तम शिल्पकलेसाठीही हे मंदिर प्रसिद्ध आहे. राजा-राणीची सुंदर शिल्पे, तसेच लाकडावरील नक्षीकामही सुंदर आहे. या गावात नायकांनी बांधलेले शाही स्नानगृह बघण्यासारखे आहे. कनकगिरी किंवा कोप्पळचा बराच भाग विजयनगरमध्ये समाविष्ट होता. गंगावती-लिंगसुगुर रस्त्यावर गंगावतीपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण वसलेले आहे.

कुकनुर : येलबुर्गा तालुक्यात गुंटकल-हुबळी रेल्वेमार्गावरील बन्नीकोपा स्टेशनच्या उत्तरेस सात मैल अंतरावर हे ठिकाण आहे. इ. स. ८०० ते इ. स. १३००दरम्यान राष्ट्रकूट व चालुक्य राजवटीत याला खूप महत्त्व होते. येथे काळेश्वर आणि मल्लिकार्जुन ही दोन महत्वाची मंदिरे आहेत. काळेश्वर मंदिर हे चालुक्य शैलीचे उत्तम उदाहरण आहे आणि ते चांगल्या स्थितीत आहे. मल्लिकार्जुन मंदिर मूळ स्वरूपात राहिलेले नाही. त्यात बरेच बदल झालेले आहेत. कुकनूर शहरात आणखी एक प्राचीन मंदिर असून, त्याचा महाभारताशी संबंध असल्याचे सांगितले जाते. मंदिरातील गाभाऱ्यात लक्ष्मी, पार्वती आणि हरिहर या तीन देवता आहेत. हरिहर याचा अर्थ विष्णू आणि शिव यांचे एकत्रित रूप असा होतो.

कोप्पळ : हे जिल्हा मुख्यालय असून, ते तुंगभद्राची उपनदी हिरेहल्लाच्या डाव्या किनाऱ्यावर वसलेले आहे आणि गुंटकल-हुबळी रेल्वे मार्गावर आहे. पश्चिमेकडे २३९९ फूट उंचीची एक टेकडी असून, तिचे नाव पालकीगुंडू असे आहे. पालकीगुंडूच्या पश्चिमेला मालिमाल्लाप्पा टेकडी आहे या टेकडीवर दगडी स्लॅबमधे तयार केलेले आदिमानवांचे निवारे आहेत. गावाच्या सभोवताली छोट्या-मोठ्या टेकड्या आहेत. किल्ल्यावर काही लेणी, गुंफा व मंदिरे आहेत. काही लेण्यांत जैन समाधिस्थळे आहेत. टिपू सुलतानने १७८६मध्ये कोप्पळ किल्ला ताब्यात घेतला आणि फ्रेंच अभियंत्यांच्या मदतीने तो मजबूत करवून घेतला. किल्ल्यावर एका ठिकाणी एक इंच व्यासाचे छिद्र असून, त्यातून गावाकडचा भाग दुर्बिणीतून पाहिल्यासारखा दिसतो. यातील मजा म्हणजे येथे खालील आवाज स्पष्ट ऐकू येतो. टिपूच्या पाडावानंतर किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात आला.
पुरा : कुश्तोगी तालुक्यात पुरा हे धार्मिक ठिकाण असून, येथे कोटिलिंग मंदिर आहे. विजयनगर राजवटीत हे मंदिर उभारले गेले. श्रावणात येथे मोठी जत्रा भरते. येथे काही शिलालेखही आहेत.
आनेगुंदी : रामायणातील किष्किंधा म्हणजेच आनेगुंदी. हंपीजवळच तुंगभद्रेच्या पलीकडे कोप्पळ जिल्ह्यात हे ठिकाण आहे. रामायणातील पंपा सरोवर येथेच आहे. ३५०० वर्षांपूर्वीची गुंफाचित्रे येथे आहेत. पौराणिक कथेनुसार हे हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते. तसेच शबरी व रामाची भेट येथेच झाली असे स्थानिकांचे म्हणणे आहे. हंपी व आनेगुंदीदरम्यान विजयनगरकालीन पुलाचे अवशेष अद्यापही आहेत.
मुनिराबाद : होस्पेटपासून हे ठिकाण आठ किलोमीटरवर आहे. तुंगभद्रा धरण येथेच आहे. हे एक औद्योगिक शहर आहे. येथे साखर कारखाना, तसेच रासायनिक कारखाने आहेत. तुंगभद्रा धरणामुळे आजूबाजूचा परिसर शेतीसमृद्ध झाला आहे. हा परिसर रामायणाशी निगडित आहे. जेव्हा राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात शोधत होते, तेव्हा त्यांना मुनिराबादजवळील पंपा सरोवराजवळ शबरी भेटली, असे सांगितले जाते. या ठिकाणी जवळच बाली किला (बालीचा किल्ला) आहे. जवळच एक पर्वत आहे, ज्यावर भगवान राम आणि हनुमान पहिल्यांदा भेटले. येथे सापडलेल्या १०९९मधील एका शिलालेखावर चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याने ही जागा चतुर्वेदी भट्ट याला दिल्याचा उल्लेख आहे. येथे हुलीगम्मा देवीचे इ. स. १३००मधील मंदिर आहे.
कसे जाल कोप्पळला?कोप्पळ हे हुबळी-गुंटकल रेल्वे मार्गावरील स्टेशन असून, जवळचा विमानतळ ११४ किलोमीटरवर हुबळी येथे आहे. मुनिराबाद, कोप्पळ येथे राहण्याची, भोजनाची व्यवस्था आहे. होस्पेटपासून हे ठिकाण ३१ किलोमीटरवर असून, विजयनगर ट्रिपमध्ये या ठिकाणी जाता येईल. जाण्यासाठी उत्तम कालावधी - ऑक्टोबर ते फेब्रुवारीअखेर.
- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com
(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)