Next
‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’तर्फे गांधी सप्ताहानिमित्त कार्यशाळा
प्रेस रिलीज
Thursday, October 05 | 05:18 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘शांततामय सहअस्तित्व हेच सर्व धर्मांची शिकवण असल्याने धर्माचे मूळ स्वरूप सत्य जाणणे, तसेच  लोकशाहीवादी मार्गावर चालण्यानेच दहशतवादाचा धोका कमी होऊ शकतो,’ असा सूर ‘आंतरराष्ट्रीय राजकारण आणि दहशतवादाचे स्वरूप’ या कार्यशाळेत उमटला.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहानिमित्त ही कार्यशाळा गांधी भवन येथे आयोजित केली होती. साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, ‘भारत बचाओ’ आंदोलनाचे प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक फिरोझ मिठीबोरवाला यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कुमार सप्तर्षी होते.

देशमुख म्हणाले, ‘असंतोषातून, आंतरराष्ट्रीय धोरणे, स्पर्धा यातून दहशतवादाचा जन्म होतो. सर्वच धर्मांत कमी-जास्त प्रमाणात दहशतवाद आहे. मुस्लिम दहशतवाद जगातील अधिक देशात आहे. हा दहशतवाद इस्लामच्या मूळ प्रेरणेशी विसंगत आहे हे समजून सांगण्याची गरज आहे. इस्लामचा मूळ प्रवाह शांतता आणि शिक्षणाचा आहे. जागतिक स्तरावर अमेरिकेची दंडेलशाहीदेखील दहशतवादाला कारणीभूत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लोकशाही बळकट असल्याने आणि गांधी विचारामुळे भारत दहशतवादी देश होणार  नाही. इतरत्र लोकशाहीवाद आणि सत्याच्या मार्गाने दहशतवाद कमी करता येईल. लोकांना दहशतवादाचा तिटकारा येणेही महत्त्वाचे आहे. भारताशी वैराची भूमिका घेतल्याशिवाय जगता येणार नाही, असे पाकिस्तानला वाटते. त्यामुळे त्यांच्याकडून दहशतवादाचे प्रयत्न चालू राहतात.’

फिरोज मिठीबोरवाला म्हणाले, ‘जागतिक दहशतवादाच्या उगमाबाबत अमेरिकेची भूमिका संशयास्पद आहे. कोणत्याही काळातील दहशतवादामुळे कोणाचा फायदा झाला याचा अभ्यास केला पाहिजे. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर कोणी हल्ला केला याबाबत अनेक मतांतरे आहेत. अमेरिकाच या हल्ल्यामागे होती असेही एक संशोधन आहे. त्यांनतर दहशतवादाविरुद्धच्या लढाईमुळे कोणाचा फायदा झाला हे समजून घेतले की या संशोधनाचे महत्त्व कळते. दहशतवाद हे राजकारणाचे हत्यार बनविण्यात आले असून भय आणि द्वेष निर्माण केला जात आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीवरील मालकीची स्पर्धा हेही आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे एक कारण आहे.

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘भावनात्मक विचार केल्याने धर्मांचा संघर्ष होतो. म्हणून बुद्धी बंद पडण्यापासून आपला बचाव केला पाहिजे. धर्माने हिंसेचा मार्ग स्वीकारला, तर तो धर्म न राहता अधर्म होतो. भारताने जगाला शांततामय सहजीवनाचा आदर्श दिला आहे. सहअस्तित्व आणि मानवता यांच्या प्रयोगाची भारत ही जागतिक प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेला धोका पोहोचता कामा नये.’

संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी अन्वर राजन, डॉ. उर्मिला सप्तर्षी, जांबुवंत मनोहर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link