Next
मीलन नव्हे, सापांचे द्वंद्वयुद्ध!
मोहन काळे
Thursday, April 12, 2018 | 03:20 PM
15 0 0
Share this story

मेंढापूर (ता. पंढरपूर) येथील नागनाथ माळी यांच्या शेतरस्त्यावर सुरू असलेले धामण जातीच्या नरांचे द्वंद्वयुद्ध. (फोटो आणि व्हिडिओ : मोहन काळे)

सोलापूर : सध्या सापांचा मीलनकाळ सुरू झाल्यामुळे अनेक ठिकाणी नर जातीच्या सापांचे द्वंद्वयुद्ध पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मेंढापूर (ता. पंढरपूर) परिसरात नुकतेच धामण जातीच्या सापांचे युद्ध पाहायला मिळाले. दोन नरांमधील या युद्धात जो जिंकतो, त्याचे मादीसोबत मीलन होते; मात्र या द्वंद्वालाच नर-मादीचे मीलन समजले जाते आणि तो समज चुकीचा आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

उन्हाळा सुरू झाला, की सापांचा मीलनकाळ सुरू होत असतो. नर-मादी सापांच्या मीलनापूर्वी नर सापांमध्ये मादीला आकर्षित करण्यासाठी द्वंद्वयुद्ध होते. यात जो नर जिंकेल, तो मादीबरोबर मीलन करत असल्याचे सर्प अभ्यासकांचे मत आहे; मात्र अशा प्रकारचे युद्ध होते, हे अनेकांना माहीतच नाही. त्यामुळे सगळीकडे अशा प्रकारे नर-मादी सापांचे मीलन सुरू असल्याचाच गैरसमज पसरला गेला आहे. नर व मादी सापामधील फरक फारसा ओळखता येत नसल्यामुळे त्यांचे मीलनच सुरू असल्याचा गैरसमज होतो. सर्प अभ्यासकांनीही याला पुष्टी दिली आहे. 

रोपळे बुद्रुक येथील शेतकरी नागनाथ माळी यांच्या मेंढापूर शिवारातील निंबोणीच्या शेताजवळ नुकतेच धामण जातीच्या सापांचे युद्ध पाहायला मिळाले. निसर्गाचा हा आविष्कार डोळ्यांचे पारणे फेडणारा आणि थरकाप उडविणारा होता. हे सापांचे मीलन असल्याची चर्चा तेथे सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर, सोलापूर येथील सर्प अभ्यासक पप्पू जामदार यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने संवाद साधला. तेव्हा त्यांनी सध्या अनेक जातींच्या सापांचा मीलनकाळ सुरू झाला असल्याचे सांगितले. नर-मादीच्या मीलनादरम्यान दोन नर साप समोरासमोर आल्यास दोन्ही नर आपली ताकद आजमावत असतात. यालाच शास्त्रीय भाषेत ‘मेल कॉम्बॅट’ अशी संज्ञा आहे. जो नर ताकदवान असेल, तो जिंकतो आणि त्याचे मादीशी मीलन होते. अशा प्रकारच्या स्पर्धेमधूनच उच्च प्रतीची जनुके पुढील पिढीला मिळतात आणि पुढची पिढी अधिक सक्षम निर्माण होते, असे स्पष्टीकरण अभ्यासकांनी सांगितले.

अनेक वेळा या युद्धाला मीलन समजतात. तसेच काही लोक सापांच्या या नैसर्गिक प्रक्रियेत व्यत्ययही आणतात; मात्र तसे करणे योग्य नसल्याचे आणि त्याबद्दल जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले.

(धामण जातीच्या सापांच्या नरांच्या थरारक द्वंद्वयुद्धाचा मोहन काळे यांनी चित्रित केलेला व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
श्री . भारत रानरुई About 347 Days ago
अतिशय मनोरंजक , औत्सुक्यपूर्ण निसर्गप्रेमींना सुखावणारा व्हिडीओ काढून प्रसारीत केल्याबद्दल आपले प्रतिनिधी श्री . मोहन काळे यांना धन्यवाद ! बाईट्स ऑफ इंडियाचे संपादक व सर्व टिमला सकारात्मक विचाराची वेबसाईट सुरू केल्या बद्दल भुभेच्छा !
0
0

Select Language
Share Link