Next
शिल्पसौंदर्याचा आविष्कार : खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर
BOI
Wednesday, March 13, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराची दक्षिण बाजू

‘करू या देशाटन’
सदराच्या गेल्या काही भागांत आपण कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती घेत आहोत. कोल्हापूरच्या समारोपाच्या भागात आज माहिती घेऊ या शिल्पसौंदर्याचा अनोखा आविष्कार असलेल्या खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराची....
.............
गेले काही दिवस आपण या सदरातून कोल्हापूरमधील पर्यटनस्थळांची माहिती घेतो आहोत. आज कोल्हापूरच्या समारोपाच्या भागात असे पर्यटनस्थळ पाहू या, की जे सप्तसुरांतील जणू वरच्या ‘सा’प्रमाणेच आहे. खिद्रापूरला मी तीन वेळा जाऊन आलो. पहिल्यांदा गेलो होतो १९९२ आणि नंतर २००४मध्ये. दोन्ही वेळी मार्गदर्शक सोबत नसल्याने बारकावे समजू शकले नाहीत. आताची भेट मात्र कुतूहल शमविणारी ठरली.

सभामंडप

डॉ. रामचंद्र चोथे यांचा या संदर्भातील शोधनिबंध प्रसिद्ध झाल्याचे कळले. ‘खिद्रापूरची मंदिरे : भारतीयांची प्राचीन ठेव’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. त्यांनी १९९०पासून मंदिराचा अभ्यास सुरू केला आणि अगदी बारकाईने अभ्यास करून प्रत्येक मूर्तीचे वैशिष्ट्य शोधून काढले. त्यांनी खिद्रापूरच्या आसपासचे अनेक शिलालेख, ताम्रपट यांचा अभ्यास करून माहिती काढली आहे. पेशाने पशुवैद्य असलेल्या डॉ. चोथे यांनी खिद्रापूरच्या मंदिराची शिल्पगाथा पुस्तकातून सुंदरपणाने पर्यटकांसमोर आणली आहे. सुदैवाने डॉ. चोथे यांचे चिरंजीव शशांक यांच्याशी संपर्क झाला. त्यांनीही त्यांच्या वडिलांना या कामी मदत केली असल्याने त्यांची भेट खूपच उपयुक्त ठरली. त्यांच्याशी वेळ ठरवून खिद्रापूरच्या ‘अलिबाबाच्या गुहे’शी जाऊन उभा राहिलो. शशांक माझे फेसबुक मित्र असल्याने अनेक वर्षांची ओळख असल्यासारखे भेटलो. त्यानंतर आतुरता होती ‘गुहे’तील खजिन्यात असलेल्या संपत्तीच्या मूल्याची. 

नगारखान्यातून दिसणारा स्वर्गमंडप

प्राचीन काळी खिद्रापूरचे नाव कोप्पम किंवा कोप्पद होते. कोप्पम नावाचे आणखी एक गाव कर्नाटकातील बदामीच्या जवळ आहे. विजापूरजवळील येलूर येथील शिलालेखात कोपेश्वराचा उल्लेख आहे. हा शिलालेख सन १०७७मधील आहे. यादव राजा सिंधणदेव याचा, मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख असलेला शिलालेख १२५४मधील असून, तो मंदिराच्या दक्षिणद्वारजवळ आहे. काही लोकांच्या मते या मंदिराच्या स्वर्गमंडपातील आकाशदर्शन देणाऱ्या छिद्रामुळे खिद्रापूर असे नाव पडले आहे; पण ते गोल छिद्र म्हणण्याएवढे छोटे नाही, तर चांगले १३ फूट व्यासाचे आहे. 

अभ्यासक शशांक चोथे आणि लेखक माधव विद्वांस

खिद्रापूर स्थलदर्शक नकाशाखिदरखान नावाच्या सरदाराने या गावावर कब्जा केल्याने खिद्रापूर हे नाव पडले असावे, हे सयुक्तिक वाटते. त्याचे वंशज आजही येथे आहेत. खिद्रापूर भागात सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, चोल, यादव, बहामनी, मराठे आणि शेवटी इंग्रज अशी सत्तांतरे होत राहिली. चालुक्य राजांच्या काळात दुसऱ्या पुलकेशीच्या कालखंडात राज्य वैभवाच्या शिखरावर होते. या काळातच येथील मंदिराची मुहूर्तमेढ झाली; पण पुलकेशीच्या मृत्यूनंतर हे काम बंद पडले. हे मंदिर चालुक्यांनी बांधले की शिलाहारांनी बांधले, यावर तज्ज्ञांमध्ये व इतिहासकारांमध्ये नेहमीप्रमाणे एकमत नाही; पण एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, की बदामी, वेरूळ, भुलेश्वर, हळेबिडू, बेलूर येथील शिल्पे वेगळी आहेत. प्रत्येकाचे वेगळे वैशिष्ट्य आहे; पण खिद्रापूरच्या शिल्पात जो नाजूकपणा आहे, तो दुसरीकडे कोठेही नाही. बेलूर, हळेबिडू येथील मंदिरे मृदू खडकातील आहेत, तर येथील मंदिरे सह्याद्रीच्या कातळातील आहेत. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील स्तंभ व खिद्रापूरमधील स्तंभ थोडे सारखे वाटले, तरी शिल्पे मात्र खूप वेगळी आहेत. एक इंच उंचीपासून आठ फूट उंचीपर्यंतची शिल्पे येथे आहेत. 

स्वर्गमंडप - खांब
मंदिराचे दार इतके साधे आहे, की येथे आत काही बघण्यासारखे आहे असे वाटतच नाही. आत आलो, की नगारखाना लागतो. तो ओलांडून पुढे गेल्यावर मंदिराचा भव्य परिसर दिसू लागतो. महादेवाचे मंदिर असल्याने प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे, म्हणून इकडे-तिकडे पाहू लागलो. शशांक म्हणाले, ‘नंदी शोधत आहात का?’ मी होय म्हणालो. त्यावर उत्तर मिळाले, की या मंदिरात नंदी नाही व भारतातील हे एकमेव मंदिर असे आहे, की जिथे नंदीशिवाय महादेव आहे. मागील वेळीही हाच प्रश्न होता; पण या वेळी उत्तर कारणासहित मिळाले. याची कथा अशी आहे. प्रजापती दक्षाने एका यज्ञ समारंभाला शंकर-पार्वतीला (सतीला) बोलावले नव्हते. तरीही सती हट्टाने खिद्रापूरच्या दक्षिणेस असलेल्या येडूर येथे दक्षाच्या घरी गेली. महादेवाने तिच्याबरोबर नंदीला पाठविले. तेथे गेल्यावर सतीचा दक्षाने अपमान केला. त्यामुळे क्रोधित होऊन तिने यज्ञात स्वतःची आहुती दिली. हे शंकराला समजताच शंकर कोपला आणि त्याने जटा आपटल्या. तेव्हापासून या स्थानाला कोपेश्वर हे नाव पडले. पार्वतीबरोबर गेलेला नंदी येडूर येथेच राहिला. त्याचे तोंड खिद्रापूरच्या दिशेने उत्तरेस आहे. 

स्वर्गमंडप रंगशिला

मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करण्याआधी नंदीमंडप किंवा स्वागत मंडप असतो. येथे मात्र आपण स्वर्ग मंडप किंवा यज्ञमंडपामध्ये प्रवेश करतो. याची सुंदर रचना आश्चर्यकारक आहे. मधोमध वरती १३ फूट व्यासाची, आकाशदर्शन देणारी गोलाकार, मोकळी जागा आहे. म्हणून याला स्वर्गमंडप असेही म्हणतात. काहींच्या मते ही यज्ञ करण्याची जागा असावी. त्याचा धूर जाण्यासाठी वर मोकळी जागा असावी, म्हणून हा यज्ञमंडप असावा. 

याची रचना वर्तुळाकार तीन रांगांत ४८ खांबांवर आधारित आहे. मध्यभागी गोलाकार रंगशिळा आहे. काहींच्या मते ती छतावर ठेवण्यासाठी केली असावी आणि राहून गेली असावी; पण जर ती झरोक्याच्या वर ठेवावयाची असती, तर ती आत ठेवली नसती. बाहेरून ती वर ठेवणे सोपे असते. सभामंडपाची शोभा वाढविण्यासाठीच त्याची रचना केली असावी. आकाशातून पडणारे पावसाचे पाणी बाहेर जाण्यासाठी वेगळी व्यवस्थाही येथे केलेली दिसून येते. रंगशिळेचा मधला गोलाकार भाग १२ खांबांवर आधारलेला आहे. सर्व खांब खालपासून वरपर्यंत नक्षीकामाने ओतप्रोत भरले आहेत. तसेच खांबांना वेगवेगळ्या उंचीवर गोलाकार, चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी आकार दिले आहेत. त्याच्या मागील बाजूस दुसरी ओळ असून, ती १६ खांबांची आहे. त्यामागे तिसऱ्या मालिकेत १२ खांब कठडावजा पॅराफिट भिंतीवर ठेवले आहेत आणि सहा खांब तीन प्रवेशद्वारांवर आहेत. 

गजपट्ट व नरपट्ट (दक्षिण बाजू)१२ खांबांपैकी चार खांबांवर छताखाली असलेली शिल्पे नष्ट झाली आहेत. आठ दिशारक्षक आणि चार देवतांची अशी रचना येथे होती. त्यापैकी राहिलेल्या शिल्पांमध्ये प्रत्येक देवता ही जोडीने (पतिपत्नी) आपल्या वाहनावर बसलेली दाखविली आहे. स्कूटरवर बसलेल्या जोडप्याप्रमाणे पुढे पती व मागे दोन्ही बाजूला पाय टाकून खेटून बसलेली पत्नी असे अलीकडे आपल्याला नेहमी पाहायला मिळणारे दृश्य येथे शिल्पात पाहायला मिळते. मंडप सर्व बाजूंनी मोकळा असल्याने आणखीच सुंदर दिसतो. 

येथून आपण आत मुख्य सभामंडपात जातो. येथे ६० खांबांच्या साह्याने सभामंडपाच्या छताला आधार दिला आहे. येथील खांबही नक्षीकामाने ओतप्रोत भरले आहेत. कीर्तिमुख असलेले चार खांब सभामंडपाच्या चौकोनी उंचवट्यावर आहेत. येथे स्वर्गमंडपापेक्षा छोटी रंगशिळा आहे. प्रत्येक कीर्तिमुखामध्ये वेगवेगळी नक्षी पाहायला मिळते. या ठिकाणी देव-देवतांबरोबर मदनिका, नर्तिका, नर्तक, वाद्यवृंद, प्राणी-पक्षीही पाहायला मिळतात. तसेच महाभारत, रामायण, पंचतंत्रातील काही कथाही येथे दाखविल्या आहेत. गौतम बुद्धांचे पद्मासनातील शिल्प एका खांबावर आहे. 

देवकोष्ठसभागृह आणि गाभारा याच्या मधील भागाला अंतराळ म्हणतात. अंतराळात प्रवेश करताना आठ फूट उंचीच्या द्वारपाळाच्या प्रमाणबद्ध मूर्ती दिसतात. त्यातील एक मंदिराच्या दक्षिणद्वाराबाहेर भग्नवस्थेत पडला आहे. हे द्वारपाळ गदाधारी असून, आभूषणयुक्त आहेत. शरीरयष्टी व आभूषणे प्रमाणबद्ध आणि बघतच राहावीत अशी आहेत. दागिन्यांची आवड फक्त महिलांनाच असते असे नाही. हे पुरुषाचे शिल्पही नखशिखान्त नाजूक दागिन्यांनी नटलेले आहे. कोणत्याही शिल्पामधील प्रमाणबद्धता त्याचे सौंदर्य वाढविते, हे येथे अनुभवायला मिळते. अंतराळात प्रवेश केल्यावर समोर गाभाऱ्याच्या चौकटीवर असलेली गजलक्ष्मी लक्ष वेधून घेते. विशेष म्हणजे चौकटीच्या दोन्ही बाजूंना कामासाठी वापरलेली छिन्नी अडकवलेली आहे. तसेच चौकटीखाली नक्षीकाम असलेली चंद्रशिळा आहे. चंद्रशिळेचे वैशिष्ट्य म्हणजे हिची झीज फारच कमी असते. 

श्री कोपेश्वर - श्री धोपेश्वर

या मंदिराच्या गाभाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे विष्णू आणि शंकर यांचे येथे एकाच वेळी दर्शन होते. गाभाऱ्यात दोन लिंगे आहेत. एक धोपेश्वराचे (विष्णूचे रूप), तर दुसरे लिंग कोपेश्वराचे (शंकराचे ) आहे. पिंडीवरील अभिषेकाचे पाणी उत्तर बाजूला जाण्याची व्यवस्था आहे. गाभाऱ्याच्या भिंतीला लागून १८ नवयौवना पूजेचे साहित्य घेऊन उभ्या असल्याचे शिल्पही येथे आहे.
 
मंदिराचे बाह्य सौंदर्य :
स्वर्गमंडपाच्या गजपट्टावरील २४ पैकी ११ हत्ती शिल्लक आहेत. कोपेश्वर मंदिराची सुलतानी आक्रमणात मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे. तरीही त्याचे सौंदर्य कमी झालेले नाही, मग नासधूस झालेली नसताना मंदिर कितीसुंदर असेल, याचा विचार पाहताना मनात येतो. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाचे काही चित्रीकरण येथे झाले. त्यामुळे त्यामुळे आता लोकांची पावले येथे वळत आहेत. पुरातत्त्व विभागानेही थोडीफार दखल घेतली आहे. एक मात्र नक्की, कोणी कितीही वर्णन केले, तरी तेथील गाइडशिवाय मंदिर बघू नये. कारण त्यातील बारकावे नुसते बघून लक्षात येत नाहीत. येथे रात्री विद्युत दिव्यांचे झोत टाकण्याची व्यवस्था केली, तर हे मंदिर आणखी खुलून दिसेल. 

दक्षिण बाजूकडील गजपट्ट

गजपट्टावरील हत्तीबाह्य बाजू मुख्यत्वेकरून खूरशिळा, गजपट्ट, नरपट्ट व त्यावर असलेले नक्षीकाम, त्यावर छत अशी विभागली गेलेली दिसते. गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूच्या भिंतीमध्ये उत्तर, पश्चिम व दक्षिण बाजूला देवकोष्ठ व त्यावर छोटे शिखर दाखविले आहे. गजपट्टामध्ये ९२ हत्ती असून, प्रत्येक हत्तीचे शिल्प बारकाईने पाहिले असता वेगवेगळे असल्याचे दिसून येते. तसेच हत्तीच्या पाठीवर वेगवेगळ्या देवदेवता दर्शविल्या आहेत. नरपट्टावरही अनेक सुंदर शिल्पे आहेत. त्यात सुंदर नर्तिका, मदनिका, नर्तक, भुजंगपीडिता, अरब देशातील पाहुणे खुबीने दर्शविले आहेत. त्यामध्ये तत्कालीन कपडे, पादत्राणे, दागिने, सौंदर्यप्रसाधने दर्शविली आहेत. त्यावरून तत्कालीन जीवनमान नक्कीच सुधारलेले व सुसंस्कृत असावे, हे नक्की दिसते. नरपट्टावरील विविध शिल्पांच्या चेहऱ्यावर असलेले भावही दिसून येतात. त्यावरील देवकोष्ठामध्ये विविध नक्षीकाम दिसून येते. छतावरील बांधकाम मंदिराबरोबर झालेले दिसत नाही. बहुधा ते यादवकाळात झाले असावे. मंदिरातील खांबांची जाडी लक्षात घेतली, तर वरचा भाग आणखी सुशोभित व उंच करण्याची योजना असावी असे वाटते. 

कीर्तिमुखस्वर्गमंडपाच्या दक्षिण बाजूने पश्चिमेकडे जाताना सभागृहाच्या मध्यभागी दक्षिणद्वार आहे. येथे द्वारपालाची भंग पावलेली मूर्ती दिसून येते. येथे दाराजवळ सप्तमातृका दिसून येतात व या चालुक्यांच्या कुलस्वामिनी असल्याने हे मंदिर चालुक्यांनीच बांधल्याचा एक दाखला मिळतो. दारापुढे मुखमंडप बांधण्याची कल्पना असावी. त्यासाठी तोंडी गुंफण्यासाठी लोहपट्ट्यांचा वापरही केला आहे; पण हे काम अर्धवट सोडलेले दिसते. तसेच उत्तरद्वाराचेही काम असेच अर्धवट सोडलेले आहे. तेथेही मुखमंडप बांधण्याची योजना असावी. 

मंदिराच्या पश्चिमेस एक सुंदर जैन मंदिर आहे. यामध्ये मिथुन शिल्पे असल्याने याला छोटे खजुराहो म्हणतात; पण मंदिरशैली चालुक्यांचीच आहे. मंदिरात भगवान आदिनाथ यांची चार फूट उंचीची सुंदर शांतिस्वरूप मूर्ती आहे. येथेही देव-देवता, मदनिकांची शिल्पे आहेत. 

पंचतंत्रातील कासव आणि पक्षी कथायादव राजा सिंधणदेव याचा शिलालेखकृष्णेच्या काठावरील हा भाग गाळाने भरलेला आहे. आपण शाळेत भूगोलात शिकल्याप्रमाणे येथे मैदानी प्रदेशात नदी नागमोडी वळणे घेते, त्याचे येथे प्रत्यंतर येते. नरसोबाच्या वाडीवरून दक्षिणेकडे अलसा गावापासून पुन्हा पूर्वेकडे, देवळाला वळसा घालून पुन्हा पश्चिमेकडे असा तिचा प्रवास चालू असतो. येथे तिन्ही बाजूंना कृष्णा नदी आहे. पावसाळ्यात सैनिक टाकळीच्या अलीकडे एक ओता (प्रवाह) आहे. नदीला पूर आल्यावर त्यातून आलसा गावापासून कृष्णेच्या दक्षिणेला रामतीर्थापर्यंत पाणी वाहू लागते. त्यामुळे पावसाळ्यात खिद्रापूर एक बेट असल्यासारखे होते; मात्र आता त्यावर पूल झाला आहे. या ओतामुळे खिद्रापूरच्या भागाचे पुरापासून संरक्षण झाले आहे. अन्यथा नदी अशा ठिकाणी आपला प्रवाह बदलत असते. 

लॉकिंग सिस्टीम

आता एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे, हे मंदिर बांधले कसे? येथे मंदिरात वापरलेला दगड आसपासचा नाही. तो खिद्रापूरच्या पश्चिमेला कोल्हापूरच्याही पुढे असलेल्या सह्याद्री पर्वतातून तराफ्यांच्या साह्याने पंचगंगेतून येथे आणला गेला. नदीवरून हत्तींच्या साहाय्याने तो ओढत आणला गेला. त्यावर वेगवेगळ्या आकाराच्या शिळा घडवून ‘लॉकिंग सिस्टीम’मध्ये (खालच्या शिळेमध्ये वरच्या बाजूला खोबणी करून त्यामध्ये वरील शिळेच्या खालच्या बाजूला खालच्या खोबणीत बसेल अशी जीभ कोरून अडकवायचे, अशा प्रकारचे हे बांधकाम असते). जमिनीत सुरुवातीला मोठा खड्डा करून त्यात ‘डबर सोलिंग’ करून वर मंदिर उभारले गेले. 

वायुविजनासाठी झरोकेचंद्रशिळाखिद्रापूरच्या उत्तरेला १० किलोमीटरवर नरसोबाच्या वाडीजवळ पंचगंगा कृष्णेस मिळते, तर दक्षिणेला साधारण तेवढ्याच अंतरावर दानवाडपुढे दूधगंगा कृष्णेस मिळते. दूधगंगेच्या दक्षिणेस व कृष्णेच्या पूर्वेस कर्नाटक राज्य चालू होते. 

कसे जायचे खिद्रापूरला?
पुण्याहून सातारा-इस्लामपूर-सांगली-जयसिंगपूर-कुरुंदवाडमार्गे खिद्रापूरला जाता येते. तसेच सातारा-पेठवडगाव-हातकणंगले-इचलकरंजी-अकिवाट-खिद्रापूर असेही जाता येते. बेळगावहून कागलमार्गेही जाता येते. जवळचे रेल्वे स्टेशन जयसिंगपूर - ३२ किलोमीटर. जवळचा विमानतळ - कोल्हापूर ६० किलोमीटर. जयसिंगपूर, नरसोबाची वाडी, सांगली येथे राहण्याची, भोजनाची उत्तम सोय होऊ शकते. साधारण पावसाळा सोडून येथे कधीही जाता येते. कोल्हापूर, नरसोबाची वाडी, सांगली ट्रिपमध्ये या ठिकाणाचा समावेश करावा. 

(या लेखातील माहितीसाठी शशांक चोथे यांचे सहकार्य झाले. त्यांनी चांगली छायाचित्रेही उपलब्ध करून दिली. तसेच मंदिर स्वतः फिरून दाखविले. त्यामुळे सविस्तर माहिती देता आली.)

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

वाद्यवृंदातील रमणीस्वर्गमंडपातील दिशारक्षक पत्नीसह...

मदनिकावाहनावर बसलेले दाम्पत्य

पर्शियन पाहुणाभुजंगपीडिता
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search