Next
‘मुंबईत अटलजींचे स्मारक उभारणार’
प्रेस रिलीज
Thursday, August 23, 2018 | 12:53 PM
15 0 0
Share this article:मुंबई :
‘माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी दिलेल्या देशप्रेमाच्या विचारांनी व त्यांनी दाखविलेल्या मार्गाने जाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,’ अशी भावना भारतीय जनता पक्षाच्या शोकाकुल कार्यकर्त्यांनी २२ ऑगस्ट २०१८ रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सभेत व्यक्त केली. मुंबईत अटलजींचे स्मारक उभारण्याचा निर्णयही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी जाहीर केला. दरम्यान, अटलजींच्या आठवणींचे संकलन करून पुस्तक करण्यात येणार असून, त्यासाठी फोटो व आठवणी पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या विचारांवर पीएचडी करणाऱ्यांना भाजपतर्फे तीन लाखांची पाठ्यवृत्तीही दिली जाणार असल्याचे पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे.अटलजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाजपने मुंबईत राज्यस्तरीय सभेचे आयोजन केले होते. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी या वेळी अटलजींच्या आठवणी सांगितल्या व त्यांच्या कार्याचे स्मरण केले. भाजपचे केंद्रीय व राज्यातील मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, नगरसेवक यांच्यासह कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी सूत्रसंचालन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘अटलजी विचारांचे पक्के होते आणि प्रखर वक्ते होते. राजकारण का करायचे आणि ध्येयवाद काय आहे, हे कार्यकर्ते त्यांच्याकडे पाहून शिकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे अटलजींच्या निधनाने मी निःशब्द झालो आहे. अटलजी आज आपल्यात नसले, तरी त्यांचे विचार आपल्यासोबत आहेत. त्यांनी देशसेवेचे जे विचार दिले व जो मार्ग दाखविला त्यावरून चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.’

‘पंतप्रधान म्हणून अटलजींनी देशासाठी केलेले कार्य अजोड आहे. ते मातीशी जोडलेले होते. देशाला काय हवे आहे, हे त्यांना ठाऊक होते. त्यामुळे त्यांनी देशात परिवर्तन घडविणाऱ्या योजना राबविल्या. देशाला एकविसाव्या शतकात नेण्याचे काम त्यांनी केले,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले, ‘अटलजींचे निधन झाल्यामुळे केवळ भाजपचेच नाही, तर संपूर्ण देशाचे नुकसान झाले आहे. अटलजींनी भाजपची स्थापना केली आणि ‘कमल खिलेगा’ असा निर्धार व्यक्त केला. अपयश आले तरीही त्यांनी त्यातून पक्ष उभा केला. भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर अटलजींचा आदर्श होता. त्यांचे नेतृत्व सर्वमान्य होते. त्यांनी सामान्यांचे दुःख जाणून घेऊन लोकसभेत मांडले. २३ पक्षांना एकत्र आणून आघाडी सरकार चालविण्याचे कसब त्यांच्याकडे होते. त्यांनी दाखविलेल्या मार्गाने जाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.’उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक म्हणाले, ‘अटलजींच्या निधनाने युगान्त झाला. ते हिंदुस्थानच्या राजकारणातील महानायक होते. त्यांना वक्तृत्व व कर्तृत्वाचे वरदान होते आणि ते त्यांनी देशाला अर्पण केले. माझ्यासाठीही ते प्रेरणा पुरुष होते. अटलजींशी चर्चा केल्यानंतर माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागत. जनसंघाचे नेतृत्व करत असताना अटलजींनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या निधनानंतर पक्ष सांभाळला व पुढे नेला. १९८४च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपला पुन्हा उभे करण्याचे काम अटलजींनीच केले. पंतप्रधान असताना झटपट निर्णय घेणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.’अटलजींच्या अस्थींचे राज्याच्या विविध नद्यांमध्ये विसर्जन करण्यात येणार आहे. त्यांचे अस्थिकलश प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपचे मंत्री व जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आले. अभिनेते मनोज जोशी व कवी किशोर कदम यांनी अटलजींच्या कवितांचे वाचन केले.

आठवणी, फोटोंचे पुस्तक
नागरिक व कार्यकर्ते यांच्याकडे अटलजींच्या अनेक आठवणी व फोटो आहेत. त्यांनी आठवणींच्या नोंदी आणि छायाचित्रे atalsmruti@gmail.com या ई-मेलवर तीस दिवसांत पाठवाव्यात. त्यांचे संकलन करून एक पुस्तक तयार करण्यात येणार आहे, असे भाजपतर्फे जाहीर करण्यात आले आहे. 

अटलजींच्या विचारांवर पीएचडी करणाऱ्यांना तीन लाखांची पाठ्यवृत्ती
अटलजींचे साहित्य व विचार याविषयी ‘पीएचडी’साठी संशोधन करणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची पाठ्यवृत्ती भाजपतर्फे देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व तेरा विद्यापीठांमध्ये अटलजी विचार अध्यासन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकार वीस कोटी रुपयांची तरतूद करणार आहे. अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 
.....
हेही जरूर वाचा...
साखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search