Next
‘ईटन’तर्फे अहमदनगरमध्ये वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम सुरू
प्रेस रिलीज
Wednesday, April 24, 2019 | 05:40 PM
15 0 0
Share this article:

पुणे : पॉवर मॅनेजमेंट कंपनी असलेल्या ‘ईटन’तर्फे कृषी व ग्रामीण प्रशिक्षण संस्था (केव्हीव्हीजीपीएस) आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (डब्ल्यूओटीआर) यांच्या सहयोगाने अहमदनगर जिल्ह्यात वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्रामची घोषणा करण्यात आली आहे. माती आणि पाण्याचे स्थिरीकरण, वाढ आणि टिकाऊपणा यांचा अवलंब करून निवडक विभागांमध्ये वॉटरशेड उपक्रमाची अंमलबजावणी करून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमधील लोकांना मदत करणे हा या मागील मुख्य हेतू आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून ‘ईटन’तर्फे नगर जिल्ह्यातील पाच गावांना पुढील तीन वर्षांसाठी आर्थिक सहकार्य करण्यात येणार आहे.

या विषयी माहिती देताना ‘ईटन’ आशिया पॅसिफिकच्या व्हेइकल आणि हायड्रॉलिक्स विभागाचे अध्यक्ष नितीन चाळके म्हणाले, ‘ईटन हे जीवनाची व पर्यावरणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सतत कटिबद्ध आहे. २००८पासून आमच्या व्हेइकल समूहाच्या उत्पादन प्रकल्पामुळे आम्ही अहमदनगर येथे कार्यरत आहोत आणि अनियमित पावसामुळे निर्माण होणारी दुष्काळग्रस्त परिस्थिती अनुभवत आहोत. मजबूत आणि स्वरचित वॉटरशेड मॅनेजमेंट प्रणाली ही या परिस्थितीसाठी एकमेव दीर्घकालीन उपाययोजना आहे. मला खात्री आहे की, ‘डब्ल्यूओटीआर’ आणि ‘केव्हीव्हीजीपीएस’ या अनुभवी भागीदारांच्या सहकार्याने ‘ईटन’ निश्चित आणि दीर्घकालीन बदल घडवून समाज सक्षम बनविण्यास मदत करेल.’

पावसाच्या पाण्याचे जतन, पाण्याची उपलब्धता व त्याचा कौशल्यपूर्ण वापर, शेती आणि पशुपालन यांमधील उपाययोजना आणि तंत्रज्ञान याबाबत या कार्यक्रमाद्वारे लाभार्थींना प्रशिक्षित केले जाईल. या अंतर्गत शेतकर्‍यांना शाश्‍वत शेती पद्धती याबाबत प्रशिक्षण व शेतकरी उत्पादन संस्था स्थापन करून त्यांना बाजारपेठेशी जोडणे याचा यामध्ये समावेश असेल. या कार्यक्रमाद्वारे बचतगटांना अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाईल, ज्यामुळे हा कार्यक्रम अधिक शाश्‍वत होऊ शकतो.

‘ईटन’च्या भारतातील लीगल अ‍ॅंड पब्लिक अफेअर्स विभागाचे प्रमुख भूषण गोखले म्हणाले, ‘या कार्यक्रमाद्वारे पिण्यासाठी व सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्याची ही मोठी संधी आहे ज्याचा फायदा या कार्यक्रमाच्या केंद्रित क्षेत्रात मोठ्या लोकसंख्येला होईल. याद्वारे पीक उत्पादन अधिक वाढू शकेल आणि यामुळे स्थानिक रोजगार संधी व शेतकर्‍यांच्या उत्पादन वाढीला चालना मिळेल.’

‘केव्हीव्हीजीपीएस’च्या भागीदारीने अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी क्षेत्रातील वरशिंदे, वाबळवाडी व कोल्ह्याची वाडी येथे हा कार्यक्रम कार्यान्वित होईल; तसेच ‘डब्ल्यूओटीआर’च्या भागीदारीने पारनेर तालुक्यामधील भोकरदरा व कोंडिबाची ठाकरवाडी या गावात कार्यक्रम राबविला जाईल,’ अशी माहिती गोखले यांनी दिली. 

‘केव्हीव्हीजीपीएस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नाफडे म्हणाले, ‘तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपजीविकेसाठी सक्षम आणि वैविध्यपूर्ण साधने निर्माण करणे हा या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा घटक असेल. गावांमध्ये पाण्याची साठवणक्षमता वाढविण्यासाठी लाभार्थ्यांना तांत्रिक कौशल्य व माहिती दिली जाईल. पाण्याच्या वापरातील कार्यक्षमता व त्याचे अर्थकारण यादृष्टीने एक प्रतिमान व वर्तनात्मक बदल आणणे हा आमचा उद्देश आहे. ज्यामुळे समुदायांना पाण्याचे मूल्य अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल व पाण्याच्या बचत उपाययोजना सक्रीयपणे राबविल्या जातील. योग्य शेती तंत्रज्ञानाद्वारे उत्पादन वाढविणे हा या कार्यक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे.’

‘डब्ल्यूओटीआर’चे व्यवस्थापकीय विश्‍वस्त व सहसंस्थापक क्रिस्पीनो लोबो म्हणाले, ‘या दुष्काळग्रस्त गावांमध्ये लोकांच्या कौशल्याला चालना देऊन त्यांच्यामध्ये आशा व आत्मविश्‍वास निर्माण करणे हा आमचा हेतू आहे. वॉटरशेड पद्धती व माती आणि पाणी संरक्षण कार्यक्रम कार्यान्वित करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करू. ज्याद्वारे पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जतन करता येईल. या शिवाय पाण्याच्या वापराबाबतची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवीन पद्धतींबाबत माहिती देऊ ज्याद्वारे शेतीची गुणवत्ता व उत्पादन पर्यावरणपूरक पद्धतीने वाढण्यास मदत होईल.’ 

‘महिलांचे सक्षमीकरण हा या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या कार्यक्रमाच्या अपेक्षित परिणामांमध्ये पिण्याच्या व शेतीसाठी पाण्याची अधिक उपलब्धता, शेतीमधून मिळणार्‍या उत्पन्नात वाढ, सुधारित अन्न व पोषण सुरक्षा व सध्यापेक्षा अधिक चांगली जीवनशैली यांचा समावेश आहे,’ असे लोबो यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search