Next
अर्जेंटिनाच्या सर्कशीची धमाल!
BOI
Monday, November 06 | 12:23 PM
15 0 0
Share this story

मारियाना सिल्वा व जुआन क्रुझ ब्रॅकमॉन्ट

कोणत्याही कलेला भाषेचं बंधन नसतं, ही गोष्ट खरीच... याचंच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे थिएटरमध्ये सादर होणारे माइम ॲक्ट‘आयपार आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सव २०१७’मध्ये चौथ्या दिवशी 'मॅन्ड्रागोरा सर्कस'च्या निमित्ताने रसिकांना माइम अनुभवण्याची संधी मिळाली. 
................................
मारियाना सिल्वा व जुआन क्रुझ ब्रॅकमॉन्ट या अर्जेंटिनाच्या दोन कलाकारांनी त्यांच्या मॅन्ड्रागोरा सर्कसच्या माध्यमातून माइम ॲक्ट ही कलाकृती सादर केली. दोन विदूषकांच्या माध्यमातून एक लव्ह स्टोरी सादर करत त्यांनी सादरीकरणात वेगळीच गंमत आणली. त्यांच्या परफॉर्मन्सच्या नावातच ‘सर्कस’ हा शब्द असल्यामुळे अगदी सर्कशीतील अनेक करामतीदेखील प्रेक्षकांना जवळून पाहता आल्या. इतरही अनेक गमतीजमती करत त्यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसवले. 

सादरीकरणाची सुरुवात एका भुकेल्या विदूषकापासून झाली. त्याला मेजावर ठेवलेली सफरचंद हवी असतात. ती घेण्यासाठीची त्याची धडपड व दरम्यान त्याला त्रास देणारी त्याची विदूषक मैत्रीण... मग बघता बघता एक एक सफरचंद हातात घेत त्या विदूषकाने जग्लिंग सुरु करत त्याच्या मैत्रीणीसोबतच प्रेक्षकांचीसुद्धा मने जिंकली. त्यानंतर एकापाठोपाठ एक धमाल गोष्टी करत त्यांनी कथा पुढे नेली. या सादरीकरणातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात वापर करण्यात आलेली अजब वाद्ये आणि तितक्याच गजब ट्यून्स. या विदूषकाची मैत्रीण त्याला मारण्यासाठी म्हणून करवत घेऊन येते आणि तो मात्र त्याचं चक्क व्हायोलिन करुन वाजवतो. ते पाहून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर जी हास्याची लकेर उमटते, तेच खरं त्या विदूषकाचं य़श म्हणायला हवं नाही का..? या सर्कशीत सादरकर्त्यांनी प्रेक्षकांचा करुन घेतलेला सहभाग ही याची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट. 

या विदूषकाने पोतडीतून घंटेचे चार जोड बाहेर काढले व ते प्रेक्षकांमध्ये दिले. त्यानंतर एखाद्या सिंफनी ऑर्केस्ट्राप्रमाणे त्या घंटाधारकांना गाईड करत त्याने प्रेक्षकांमध्ये एक छानशी धून बनवली. तसेच एकमेकांवर रुसल्याचे दाखवत प्रेक्षकांमधील एका एका व्यक्तीला स्टेजवर आणत त्याच्यासोबतदेखील धमाल केली. एकूणच ही सर्कस म्हणजे प्रेक्षकांसाठी एक धमाल अनुभव ठरला. 

शब्दांचा किंचितही वापर नसलेल्या या सर्कशीतील कलाकारांनी नंतर चर्चेसाठी जेव्हा बोलायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी त्यांच्या अनुभवांची आणखी धमाल पोतडी प्रेक्षकांपुढे उघडली. यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही दोघं गेल्या सात वर्षांपासून ही सर्कस घेऊन जगभ्रमंती करत आहेत. मजल दरमजल करत एक एक देशात सर्कस करुन तेथील प्रेक्षकांची मने जिंकणारी ही जोडगोळी आता भारतात येऊन पोहोचली आहे. पुढील काही दिवस ते मुंबई, दिल्ली, कलकत्ता, बेंगळुरू यांसारख्या भारतातील विविध शहरांमध्ये सादरीकरण करणार आहेत. इतका प्रचंड प्रवास करत असताना घरची आठवण येते का, या प्रश्नाचे उत्तर देताना ‘तुम्ही सगळे प्रेक्षकच आमचे कुटुंब आहात’, असे चपखल उत्तर त्यांनी दिले. शिवाय फिटनेसबाबतदेखील एक रसिकाने विचारल्यावर, ‘मी रोज दोन तास अष्टांग योग करते,’ असे उत्तर मारियानाने दिले. तर, ‘मला सर्कस करत राहायचंय ही एक गोष्टच मला फिट ठेवायला पुरेशी आहे’, असे जुआन म्हणाला. तसेच गेल्या ११ वर्षांपासून ते दोघेही संपूर्णपणे शाकाहार घेत आहेत, हे सांगायला ते विसरले नाहीत. 

मॅन्ड्रागोरा हे नाव कुठून आले याबाबत विचारल्यावर त्यांनी सांगितले की, मॅन्ड्रागोरा ही एक वनस्पती आहे, जी माणसासारखी दिसते. याचा वापर करुन माणसाला मुके करता येते अशी काहीशी दंतकथा असल्याचा दाखला त्यांनी दिला व आमची ही सर्कस देखील मूक असल्याचे सांगत त्यामुळेच मॅन्ड्रागोरा हे नाव दिल्याचे सांगितले. या दोघांनीही अगदी लहानपणापासूनच थिएटर करायला सुरुवात केली व आजतागायत त्यांचा हा प्रवास अखंड सुरु आहे. हे सांगत असताना मारियानाने जुआनचे वय सांगितले व आपले वय आपण सांगणार नाही असे मिश्किलपणे म्हणाली. तेव्हा मात्र प्रेक्षकांमध्ये जोरदार हशा पिकला. 

प्रेक्षकांतून लोकांची निवड करत असताना ‘परफेक्ट’ व्यक्ती कशी निवडता, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आम्हाला मनापासून जो वाटतो त्याचीच निवड आम्ही करतो. आणि ती व्यक्ती संपूर्णपणे अनोळखी असेल याचीदेखील खात्री करत असतो.’ सुदैवाने आजवर ही निवड एकदाही चुकली नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. 
एकंदरीत आयपार महोत्सव दिवसेंदिवस रंगतदार होत चालला आहे. शिवाय पुण्याच्या रसिक प्रेक्षकांना जगभरातील कलाकार येऊन रोज कलाकृतींची लज्जतदार मेजवानी देत आहेत. 

- आकाश गुळाणकर
ई-मेल : akash.gulankar@gmail.com

(‘आयपार महोत्सवा’चे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील वार्तांकन वाचण्यासाठी https://goo.gl/12cDAa इथे क्लिक करा.) 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link