Next
चौधरी दांपत्याने दिली ‘दीनानाथ’ला देणगी
प्रेस रिलीज
Monday, March 25, 2019 | 04:38 PM
15 0 0
Share this article:पुणे : चष्म्याचा मोठा नंबर असलेल्या गरजू व्यक्तींनाही दृष्टीदोष निवारणाद्वारे सामान्य जीवन जगता यावे या उद्देशाने पुण्यातील परिमल व प्रमोद चौधरी या दांपत्याने पुढाकार घेतला आहे. चौधरी यांनी अत्याधुनिक ‘लॅसिक’ नेत्र शस्त्रक्रियेसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला देणगी दिली असून, त्यामुळे खर्चिक समजली जाणारी ही शस्त्रक्रिया गरजू रुग्णांना दीनानाथ रुग्णालयामध्ये ५० टक्क्यांपर्यंतच्या सवलतीत करून घेता येणार आहे.

रुग्णालयाच्या प्रमुख इमारतीतील क्लिअर व्हिजन लेसर सेंटरमध्ये अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते नुकतेच या मशीनचे उद्घाटन करण्यात आले. रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर, परिमल व प्रमोद चौधरी, नेत्र विभाग प्रमुख डॉ. माधव भट या वेळी उपस्थित होते. ‘अल्कॉन’ कंपनीचे ‘वेवलाइट इएक्स ५००’ नावाचे हे मशीन असून त्यावर आता फक्त १० मिनिटांच्या कालावधीत नेत्रशस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे.

‘लॅसिक’ (लेझर असिस्टेड इन सीटू केरॅटोमिल्यूसिस) ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया प्रामुख्याने चष्म्याचा मोठा नंबर कमी करण्यासाठी अथवा घालवण्यासाठी वापरली जाते. असे असले तरी चष्म्याचा नंबर असलेल्या सर्वच व्यक्तींवर लॅसिक शस्त्रक्रिया होऊ शकते असे नाही. इच्छुकांची संपूर्ण नेत्र तपासणी आणि कॉर्निअल टोपोग्राफी चाचणी करून ते या शस्त्रक्रियेसाठी योग्य आहेत का, ते ठरवले जात असल्याचे डॉ. भट यांनी सांगितले.ते म्हणाले, ‘साधारणतः १८ वर्षे वयावरील व्यक्तींवर ही शस्त्रक्रिया केली जाते. अत्यंत अत्याधुनिक यंत्रणेनी शस्त्रक्रिया केली जात असून, त्याच्या दुसऱ्याच दिवशी उपचार केलेली व्यक्ती टीव्ही बघणे किंवा वाचन करणे ही कामे करू शकते, तर एक आठवड्यानंतर नेहमीप्रमाणे कामावर रुजू होऊ शकतो. चष्मा घालविण्याची नेत्रशस्त्रक्रिया ही केवळ सौंदर्यवृद्धीसाठीची शस्त्रकिया आहे असा गैरसमज समाजात आहे; परंतु अनेक वर्ष मोठ्या नंबरचा चष्मा वापरणाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असून, रोजच्या जीवनातील दुचाकी चालवणे, हेल्मेट घालणे अशी साधी कामेही त्यांच्यासाठी आव्हानात्मक असतात. चष्म्यावरील अवलंबित्व कमी करून व्यक्तीच्या जीवनाची गुणवत्ता वाढवणे हे या शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट्य असून केवळ चष्मा जाऊन लग्न जमावे यासाठीची ही शस्त्रक्रिया नाही.’

डॉ. केळकर म्हणाले, ‘गरजू रुग्णांना ही शस्त्रक्रिया ५० टक्क्यांपर्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार असली, तरी शस्त्रक्रियेच्या गुणवत्तेत कोणतीही कमतरता ठेवली जाणार नाही. चौधरी दांपत्याने मोठ्या मनाने केलेल्या मदतीमुळेच हे शक्य झाले आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search