Next
भारतीय वाद्यसंगीत - भाग तीन : संतूर
BOI
Tuesday, August 13, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

पं. शिवकुमार शर्मासंतूर हे वाद्य काश्मीरमधलं. तिथल्या सूफी संगीताशी याचं नातं जुळलेलं. हे लोकसंगीतातलं वाद्य शास्त्रीय संगीतासाठी अनुकूल बनवून पं. शिवकुमारांनी मैफलीत आणलं, तर पं. उल्हास बापट या अभ्यासू संतूरवादकानं, संतूरवादनाला आणखी एक पाऊल पुढे नेलं. ‘सूररंगी रंगले’ या सदरात मधुवंती पेठे या वेळी सांगत आहेत संतूरवादनातील या दिग्गजांबद्दल...
............
संतूर = पं. शिवकुमार शर्मा ... शिवकुमार शर्मा म्हणजेच संतूर आणि संतूर म्हणजेच शिवकुमार शर्मा, असं हे वाद्य आणि वादकाचं अतूट नातं. संतूर हे वाद्य काश्मीरमधलं. तिथल्या सूफी संगीताशी याचं नातं जुळलेलं. काश्मीरच्या लोकसंगीतात साथीचं वाद्य म्हणून संतूर वाजवलं जायचं. शंभर तारांचं म्हणून शततंत्री असंही त्याचं नाव. 

शिवकुमारांचे वडील उमादत्त शर्मा. ते स्वत: गायक आणि तबलावादक. शिवकुमारला त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षीच संगीताची दीक्षा दिली. तेव्हा शिवकुमार गात होता. तबला वाजवत होता. नंतर वडिलांनी त्याच्या हातात संतूर दिलं. शिवकुमारनं त्या वाद्याला आपलंसं केलं आणि वयाच्या सतराव्या वर्षी, १९५५मध्ये हिंदुस्थानी संगीताच्या कार्यक्रमात त्यांनी स्वतंत्रपणे संतूर या वाद्याचं वादन सादर केलं. संगीताच्या दुनियेतील रसिक प्रथमच हे वाद्य पाहत होते, ऐकत होते. साहजिकच उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. 

संतूरचा आवाज निसर्गाशी नातं सांगणारा... जलतत्त्वाशी जुळणारा. पहाडी प्रदेशातून खळखळ करत वाहणाऱ्या जलप्रवाहाचा आभास निर्माण करणारा किंवा एखाद्या जलाशयावर असंख्य लहरी उठल्याचा भास होऊन, मन रोमांचित करणारा. दोन काठ्यांनी (sticks) तारांवर आघात केल्यावर निर्माण होणारा संतूरचा नाद अत्यंत अल्पजीवी, पण मनाला सुखावणारा. काश्मीरच्या लोकसंगीतातील हे संतूर, एकदम हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या मैफलीत जाऊन बसल्यावर सर्व जण आश्चर्यचकित झाले. काहीतरी नवीन नादमय ऐकायला मिळालं म्हणून रसिक खूश झाले, तर त्या वाद्याच्या अल्पजीवी, तुटक वाजणाऱ्या स्वरावलीवर काही जण नाराज झाले. हिंदुस्थानी संगीताची मेलडी... स्वरांमधली आस त्यात नाही म्हणून टीका झाली.

या नकारात्मक प्रतिक्रियांनी शिवकुमार डगमगले नाहीत. संतूरला त्यांनी ‘आपलं’ म्हटलं होतं. त्यातील त्रुटी नाहीशा कशा करता येतील, याचा त्यांनी विचार सुरू केला. रागाला आवश्यक असलेल्या स्वरांमध्ये तारा जुळवून घेतल्या, की हातातील दोन नाजूक काठ्यांनी आघात करत हवी ती स्वरावली निर्माण करताना संतूरवादनात आस कशी आणता येईल, याचा ध्यास घेतला. संतूरमधून निघालेला स्वर, दीर्घ काळ कसा टिकेल यासाठी प्रयत्न करता करता, त्यांनी वाजवण्याच्या तंत्रात बदल केले. 

...आणि १९५६मध्ये व्ही. शांतारामांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटाच्या एका दृश्यासाठी, या बदललेल्या संतूरचा आवाज पार्श्वसंगीताच्या रूपात रसिकांच्या कानावर पडला. रसिक खूश झाले. त्यांना या नवीन वाद्याच्या नादाची मोहिनी पडली. याचा फायदा घेऊन लोकांपुढे पुन्हा स्वतंत्र वादनाच्या रूपात संतूर सादर करण्यासाठी शिवकुमारांनी प्रयत्न सुरू केले. या वेळी त्यांनी साथ घेतली चित्रपटसृष्टीत नवीनच आलेल्या आपल्या दोन वादक मित्रांची. त्या तिघांचा शास्त्रीय संगीताचा एक अल्बम निघाला, हरिप्रसाद चौरासिया (बासरी), ब्रिजभूषण काब्रा (गिटार) आणि शिवकुमार शर्मा (संतूर) असा तिघांच्या वादनानं नटलेला...

‘Call of the Valley’ (१९६७) हा शुद्ध रागदारी संगीताचा अल्बम हिट झाला. अहिरभैरव, देस, पहाडी, भूप, बागेश्री अशा रागांमधील गती - धून यात तिघांनी वाजवल्या होत्या. शिवकुमारांच्या तपश्चर्येला यश मिळालं आणि त्यानंतर त्यांचे स्वतंत्र संतूरवादनाचे कार्यक्रम सुरू झाले. नंतर १९८०पासून हरिप्रसाद आणि शिवकुमार यांनी ‘शिव-हरी’ या नावानं ‘सिलसिला’ या हिंदी चित्रपटातल्या गीतांना संगीत दिलं. आणि सुरू झालेला हा संगीत दिग्दर्शनाचा सिलसिला पुढे फासले, चांदनी, लम्हें, डर अशा अनेक चित्रपटांमध्ये सुरूच राहिला.

... पण यादरम्यान चालू असणाऱ्या सततच्या मेहनतीमुळे, रियाजामुळे आता शिवकुमारांना आणि संतूरला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या मैफलीत मानाचं स्थान प्राप्त होऊ लागलं होतं. पुढे साउंड सिस्टीमचा वापर वाढल्यावर तर संतूरचा नाद अतिशय प्रभावीपणे रसिकांपर्यंत पोहोचू लागला. विसाव्या शतकाच्या अखेरीस प्रत्येक संगीत महोत्सवात एक नाव अग्रक्रमानं दिसू लागलं होतं...

‘संतूरवादन - पं. शिवकुमार शर्मा....’

त्यांचा पुत्र राहुल शर्मा आणि पं. सतीश व्यास हे त्यांचेच शिष्य. शिवकुमारांच्या मैफलीत साथ करता करता त्यांचं वादनतंत्र आत्मसात करून, पुढे तेही संतूरवादक कलाकार म्हणून नावारूपाला आले. संतूरवादनाचा प्रसार चालू राहिला.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला संतूरच्या रूपानं एका नवीन वाद्याची देणगी मिळाली आणि याचं संपूर्ण श्रेय जातं पं. शिवकुमार शर्मा यांना. संगीत रसिक यासाठी त्यांचा कायम ऋणी राहील.

पं. शिवकुमारांचं प्रभावी संतूरवादन ऐकून अनेक तरुण कलाकार या नवीन वाद्याकडे आकर्षित झाले आणि अल्पावधीतच नवनवीन संतूरवादक तयार होऊ लागले. 

पं. उल्हास बापटसंतूरवरचं क्रोमॅटिक ट्युनिंग - पं. उल्हास बापट
लोकसंगीतातलं वाद्य शास्त्रीय संगीतासाठी अनुकूल बनवून पं. शिवकुमारांनी मैफलीत आणलं, तर पं. उल्हास बापट या अभ्यासू संतूरवादकानं, संतूरवादनाला आणखी एक पाऊल पुढे नेलं. 

तेही शिवकुमारांच्या संतूरवादनानं प्रभावित होऊन संतूरकडे वळले होते; पण निरनिराळ्या रागांच्या सादरीकरणाच्या वेळी येणाऱ्या ‘प्रॅक्टिकल प्रॉब्लेम’मुळे ते विचारात पडले होते. संतूरवर वाजवण्यासाठी एखादा राग निवडला, तर त्याप्रमाणे आवश्यक असणाऱ्या कोमल, तीव्र स्वरांमध्ये वाद्याचं ट्युनिंग करावं लागतं. एक राग वाजवून झाल्यावर भिन्न प्रकृतीचा - भिन्न थाटातला राग वाजवायचा झाला, तर पुन्हा संपूर्ण वाद्याचं ट्युनिंग (शंभर तारांचं) नव्यानं करावं लागतं. त्यात वेळ जातो आणि त्यामुळे रंगलेल्या मैफलीचा रसभंग होतो. नाही तर, आधीच्याच रागाशी साधर्म्य असलेला, साधारण तसेच कोमल, तीव्र स्वर असलेला राग सादर करावा लागतो. यावर उपाय म्हणून प्रचलित असलेल्या ट्युनिंगपेक्षा निराळी अशी क्रोमॅटिक ट्युनिंगची नवीन पद्धत पं. उल्हास बापट यांनी विकसित केली. 

क्रोमॅटिक ट्युनिंगमध्ये संतूरवर डाव्या-उजव्या बाजूला एकामागून एक अशा बाराही स्वरांत तारा जुळवल्या जातात. त्यामुळे कोणताही राग एकामागून एक सादर करताना, काही बंधन येत नाही. राग बदल करण्यासाठी वाद्य जुळवण्यात वेळ जात नाही. वक्रराग, जोडराग सहजपणे वाजवता येतात. आयत्या वेळी रसिकांकडून आलेली फर्माईश क्षणांत पूर्ण करता येते. कोणत्याही स्वराला षड्ज मानून वाजवणं शक्य झाल्यामुळे रागमालिका, रागसागर यांसारख्या रचनाही सादर करता येतात; पण याला खूपच सावधानता आणि कौशल्य लागतं.

विशिष्ट आकाराच्या स्टिक्स वापरून, संतूरवर सहजपणे मींड काढण्याचं तंत्रही उल्हासजींनी विकसित केलं होतं. संतूरच्या प्रत्येक ब्रिजवर ते तीन चार स्वरांची मींड सहजपणे घेत असत. आघात आणि घसीट यांच्या साह्याने ही मींड काढल्यामुळे वाद्याचं मूळ ट्युनिंगही बिघडत नसे. हे सर्व त्यांच्या अभ्यासू संशोधक वृत्तीमुळे आणि प्रयोगशील स्वभावामुळे शक्य झालं, असं म्हणता येईल. 

म्हणूनच पं. उल्हास बापट यांचं नाव संतूरवादनाच्या प्रगतिशील टप्प्याशी जोडलं जातं.

(भारतीय संगीतातील वाद्यवादनातील महत्त्वाचे बदल नजरेस आणून देणं या उद्देशाने भारतीय वाद्य संगीत आणि वाद्य कलाकार यांची माहिती देण्याचा प्रयत्न आहे. सर्व वादक कलाकारांचा परिचय किंवा वाद्यसंगीताचा इतिहास सांगणं हा उद्देश नाही. त्यामुळे काही प्रसिद्ध आणि लोकप्रिय वादक कलाकारांबद्दल उचित आदर बाळगून, काही निवडक कलाकारांच्या संशोधनात्मक कार्याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करत आहे.)

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध आहेत.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search