Next
रत्नागिरीतील प्रेरणादायी सावरकर स्मृतितीर्थ
BOI
Tuesday, February 26, 2019 | 08:00 AM
15 1 0
Share this article:स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि रत्नागिरीचे नाते अतूट आहे. सावरकरांचा कारावास, त्यानंतरची स्थानबद्धता, पतितपावन मंदिराच्या स्थापनेसारखी अजोड सामाजिक कामे रत्नागिरीला वेगळी ओळख निर्माण करून देणारी ठरली. सावरकरांना डांबून ठेवलेली कारागृहाची कोठडी आता स्मारकात रूपांतरित झाली आहे. एकूणच सावरकरांचा हा इतिहास म्हणजे आता प्रेरणादायी सावरकरतीर्थच ठरला आहे. सावरकरांच्या चौपन्नाव्या आत्मसमर्पण दिनाच्या (२६ फेब्रुवारी २०१९) निमित्ताने या तीर्थांचा परिचय.
.....................
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव उच्चारताच जाज्वल्य हा एकच शब्द आठवतो. भारतातच नव्हे, तर जगभरात स्वातंत्र्यासाठी कार्य करणाऱ्या क्रांतिकारकांमध्ये सावरकरांचे नाव सर्वांत वरचे आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांनी बलिदान केले; मात्र सावरकर हेच त्यात अग्रणी होते. अनेक बाबतीत सावरकर एकमेव क्रांतिकारक ठरले. भारतीय स्वातंत्र्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रांतिकारक चळवळ संघटित करणारे आद्य क्रांतिवीर, दोन देशांच्या सरकारांनी ज्यांच्या ग्रंथावर प्रसिद्धीपूर्वीच बंदी घातली असे जगातील आद्य लेखक, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला म्हणून ज्यांची पदवी विद्यापीठाने काढून घेतली असे आद्य पदवीधर, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्यामुळे ज्यांना बॅरिस्टर पदवी नाकारण्यात आली असे आद्य विधिज्ञ, विदेशी कपड्यांची निर्भयपणाने प्रकट होळी करणारे आद्य देशभक्त, देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सर्वस्पर्शी विचार करणारे, अस्पृश्यता व जातिभेद यांच्याविरुद्ध बंड पुकारणारे आद्य क्रांतिवीर, ब्रिटिश न्यायालयाचा अधिकार नाकारणारे आद्य भारतीय बंडखोर नेते, पन्नास वर्षे सीमापारीची काळ्या पाण्याची शिक्षा झालेले आणि ती पुरून उरल्यानंतर सक्रिय कार्य करणारे जगातील आद्य राजबंदी, कारागृहात लेखनसाहित्य न मिळाल्यामुळे काट्याकुट्यांनी कारागृहाच्या भिंतींवर सुमारे दहा हजार ओळींचे काव्य कोरणारे आणि ते सहबंदिवानांकडून पाठ करवून घेऊन प्रसिद्ध करविणारे जगातील आद्य कवी, हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात ज्यांची अटक गाजली असे भारताचे आद्य राजबंदी, योगशास्त्राच्या उत्तुंग परंपरेनुसार प्रायोपवेशनाने मृत्यूला कवटाळणारे आद्य आणि एकमेव क्रांतिकारक महायोगी अशा अनेक बाबतीत सावरकर एकमेवाद्वितीय होते. सावरकरांची कृती ब्रिटिश सत्तेला अधिक तापदायक ठरली होती. सावरकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान प्रस्थापित करुन क्रांतिकार्याला नैतिक अधिष्ठान मिळवून दिले. सावरकर हे ‘अभिनव भारत’ या क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक, अध्वर्यू आणि मेरूमणी होते. क्रांतिकारकांच्या तत्कालीन व नंतरच्याही पिढ्यांना सतत प्रेरणादायी ठरणारे व्यक्तिमत्त्व होते. मार्सेलिस प्रकरणात सावरकरांनी ब्रिटिश शासनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की करून ठेवली. त्यामुळेच ब्रिटिशांनी इतरांप्रमाणे एका झटक्यात मरण न देता तब्बल दोन जन्मठेपा म्हणजे पन्नास वर्षे काळ्या पाण्याची सश्रम कारावासाची शिक्षा त्यांना ठोठावली. ब्रिटिश साम्राज्य त्यांना सर्वांत मोठे शत्रू मानत असे.

सावरकरांना पन्नास वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांना १३ मार्च १९१० रोजी अटक झाली. त्यांना प्रारंभी अंदमानला ठेवण्यात आले. सावरकर पंधरा वर्षे दोन महिने दहा दिवस प्रत्यक्ष कारागृहात होते, तर तेरा वर्षे चार महिने स्थानबद्धतेत होते. त्यांची १० मे १९३७ रोजी स्थानबद्धतेतून विनाअट संपूर्ण मुक्तता करण्यात आली. सावरकरांना २४ डिसेंबर १९१० रोजी पंचवीस वर्षांची पहिली, तर ३१ जानेवारी १९११ रोजी पुन्हा पंचवीस वर्षांची दुसरी अशी एकूण ५० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर चार जुलै १९११ रोजी त्यांचा अंदमानमधील कारावास सुरू झाला. अंदमान येथील कारागृहात दुहेरी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना त्यांना प्रथम मद्रास आणि नंतर रत्नागिरीच्या विशेष कारागृहात १६ मे १९२१ रोजी हलविण्यात आले. रत्नागिरीत त्यांना २३ सप्टेंबर १९२३पर्यंत ठेवण्यात आले होते. पुढे त्यांना पुणे येथील येरवडा कारागृहात पाठविण्यात आले, तर सहा जानेवारी १९२४पासून रत्नागिरीतच स्थानबद्धतेत ठेवण्यात आले. स्थानबद्धतेच्या संपूर्ण काळात ते रत्नागिरीतच होते. रत्नागिरीतील कारावास आणि स्थानबद्धतेच्या प्रदीर्घ काळात सावरकरांनी केलेले कार्यच आता रत्नागिरीची ओळख झाली आहे.

सावरकरांच्या आठवणी सांगणाऱ्या अनेक वास्तू रत्नागिरीत आहेत; मात्र दोन स्मारके सर्वांत महत्त्वाची आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाचे स्मारक म्हणजे विशेष कारागृह आणि दुसरे म्हणजे त्यांनी सामाजिक समरसतेचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून स्थापन केलेले पतितपावन मंदिर. पोर्तुगीजांनी दारूगोळा ठेवण्यासाठी १८३४ साली रत्नागिरीत एक इमारत बांधली. एका करारानुसार ही इमारत ब्रिटिशांकडे हस्तांतरित झाली. त्यानंतर ब्रिटिशांनी १८५३मध्ये कारागृहात रूपांतरित केली. सोळा एकर परिसरात कारागृहाच्या सर्व इमारती उभ्या आहेत. अंदमानप्रमाणेच त्या काळी रत्नागिरी हा अत्यंत दुर्गम भाग होता. पश्चि मेला विस्तीर्ण अरबी समुद्र, तर पूर्व आणि दक्षिणोत्तर भागातून रत्नागिरीला थेट येणाऱ्या रस्त्यांची वानवा तेव्हा होती. सहजपणे रत्नागिरीत येणे तेव्हा शक्य नव्हते. त्यामुळेच ब्रह्मदेशचा थिबा राजा किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या कैद्यांना ठेवण्यासाठी ब्रिटिशांच्या दृष्टीने ही अत्यंत उत्तम आणि सुरक्षित जागा होती. देशभरातील कुख्यात आणि खतरनाक गुन्हेगारांना या कारागृहात ठेवले जात असल्याने या कारागृहाला विशेष कारागृहाचा दर्जा देण्यात आला. या कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना प्रशासकीय इमारतीच्या वरच्या मजल्यावर स्वतंत्रपणे ठेवण्यात आले होते. अन्य कैद्यांशी त्यांचा संपर्क येऊ नये, अशी खबरदारी घेण्यात आली होती. शिवाय कारागृहावर कोठूनही हल्ला झालाच, तरी ती प्रशासकीय इमारत असल्याने तेथे पुरेसा कडक बंदोबस्तही होता. त्यामुळे सावरकर पळून जाण्याची किंवा त्यांना कोणी सोडवून घेऊन जाण्याची शक्यता नव्हती. कारागृहातही त्यांची स्वतंत्र व्यवस्था करावी लागली, एवढा ब्रिटिशांना सावरकरांचा धसका होता. अर्थातच ती खोली अत्यंत लहान म्हणजे ६.५ फूट बाय ८.५ फूट एवढ्याच आकाराची होती. तेथेच त्यांना कायम राहावे लागत होते. प्रातर्विधीही तेथेच उरकावे लागत असत. (मुळशी सत्याग्रहातील अग्रणी पांडुरंग महादेव ऊर्फ सेनापती बापट यांनाही याच कारागृहात २४ नोव्हेंबर १९३१ ते ३१ डिसेंबर १९३५ या काळात ठेवण्यात आले होते; मात्र त्यांना कारागृहात स्वतंत्रपणे ठेवण्यात आले नव्हते. अन्य कैद्यांसाठी असलेल्या विभागातच त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. कारण ते ब्रिटिशांच्या दृष्टीने खतरनाक गुन्हेगार नव्हते.) सध्या त्या खोलीत सावरकरांच्या गळ्यात अडकवण्यात आलेले साखळदंड, बेड्या, लोहगोळे इत्यादी वस्तू संग्रहित करून ठेवण्यात आल्या आहेत. ती खोली आणि त्याच्या बाहेरचा भाग स्वातंत्र्यवीरांचे स्मारक म्हणून जतन करून ठेवण्यात आला आहे. स्मारक म्हणून या कक्षाची घोषणा झाल्यानंतर चरित्रकार धनंजय कीर यांच्या हस्ते १९८३ साली कोठडीत सावरकरांची स्मृती म्हणून ठेवलेल्या भव्य तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.डिसेंबर २०१७मध्ये तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या कारागृहाला आणि सावरकरांच्या स्मारकाला भेट दिली. या कोठडीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी कोठडीचे सुशोभीकरण करण्याची आणि कोठडीला लागूनच स्वातंत्र्यवीरांचे जाज्वल्य संघर्ष दाखविणारे चित्र प्रदर्शन उभारण्याची सूचना कारागृह अधीक्षक आर. आर. देशमुख यांना केली. श्री. देशमुख यांनीदेखील या सूचनेला केवळ वरिष्ठांचे आदेश न मानता डॉ. उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत मनोभावे काम केले. तुरुंगाधिकारी वर्ग एक आणि दोनचे श्री. कांबळे आणि अमेय पोतदार यांनी कसून मेहनत घेतली. सावरकरांचा इतिहास जिवंत करणारी छायाचित्रे, चित्रे लावण्यासाठी अनेकांची मदत झाली. मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीचे संचालक आणि सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी या कारागृहाला भेट दिली होती. त्यांनी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन तर दिलेच; पण प्रत्यक्ष मदतही केली. पुण्यातील इतिहास अभ्यासक नितीन शास्त्री यांचीही मोठी मदत झाली. त्यांच्या संग्रहातून सुमारे ७५० चित्रे मिळाली. त्यापैकी २०० चित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. सावरकरांचा कुटुंबवृक्ष, त्यांच्या काळातील, तसेच भारतीय स्वातंत्र्यातील सशस्त्र क्रांतिकारकांची माहिती, चित्रे, तसेच प्रसिद्ध नसलेल्या अनेक क्रांतिकारांच्या चित्रांचाही त्यात समावेश आहे. २८ मे हा स्वातंत्र्यवीरांचा जन्मदिन! त्याचे औचित्य साधून २८ मे २०१८ रोजी रत्नागिरीचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. आज आपण कोठडीला भेट दिली, की आपले मन भक्तिभावाने, देशप्रेमाने आपसूकच भारून जाते. चित्रमय, आकर्षक, भव्य प्रदर्शन आपल्या डोळ्यांसमोर स्वातंत्र्यवीरांचा सर्व संघर्ष जिवंत उभा करते. याबरोबरच मोठा गट आल्यास भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनने स्वातंत्र्यवीरांच्या जीवनकार्यावर निर्माण केलेला सुमारे पाऊण तासाचा माहितीपट पाहण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या प्रेरणादायी स्मारकाला रत्नागिरीला येणाऱ्या नागरिकांनीच नव्हे, तर तर देश-विदेशातील देशप्रेमी नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी मुद्दाम येऊन भेट दिली पाहिजे, असे हे स्मारक आहे.साकारण्यात आलेल्या या नव्या व्यवस्थेची दखल कारागृह विभागाच्या विशेष पोलीस निरीक्षकांनीही घेतली. यापूर्वी केवळ वारसा म्हणून सावरकरांची कोठडी जतन करण्यात आली होती. तिचे सावरकरांची स्मृती वास्तू म्हणून रूपांतर करण्यासाठी कारागृहाचे वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांची प्रशंसा विशेष पोलीस निरीक्षक श्री. राजवर्धन यांनी केली. तसे प्रशंसापत्र त्यांनी गेल्या १६ जानेवारीला अधिकाऱ्यांना दिले आहे. हीसुद्धा कौतुकाची बाब आहे.गोपनीय दस्तऐवज
जानेवारी २०१८मध्ये कारागृहात झालेल्या बैठकीत तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी क्रांतिकारकांच्या वास्तव्यामुळे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या कारागृहाबाबत विशेष आस्था दाखवून जुन्या कागदपत्रांची माहिती घेण्याची सूचना केली होती. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यासाठी कारागृहात चार ते पाच तास ठाण मांडून या कागदपत्रांची माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. या वेळी १९०८पासूनची काही गोपनीय कागदपत्रे हाती लागली. वीर सावरकर आणि सेनापती बापट यांच्याबरोबरच कराचीचे क्रांतिकारक स्वामी गोविंदानंददेखील रत्नागिरीच्या कारागृहात होते. या तीन क्रांतिकारकांच्या कारागृहातील वास्तव्यादरम्यानच्या गोपनीय कागदपत्रांचा ऐतिहासिक खजिना कारागृह प्रशासनाच्या हाती लागला. शंभर वर्षांपूर्वीची ही ऐतिहासिक कागदपत्रे म्हणजे इतिहास महत्त्वाचा ठेवा ठरणार असून, त्यात महात्मा गांधींनी सेनापती बापट यांना पाठवलेली तार व अन्य पत्रांचाही समावेश आहे. ११० वर्षांपूर्वीची कागदपत्रे आजही सुस्थितीत आहेत. ही कागदपत्रे लोकांनाही पाहण्यासाठी खुली व्हावीत, यासाठी शासनाची विशेष परवानगी घेण्यात येणार आहे; मात्र सध्या तरी ही कागदपत्रे जनतेसाठी गोपनीयच राहणार आहेत. या कागदपत्रांची पाहणी व अभ्यास करता यावा यासाठीचा एक परिपूर्ण प्रस्ताव कारागृह प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. रत्नागिरी कारागृहातील शिक्षेदरम्यान सावरकरांनी कमला महाकाव्य, सन्यस्त खड्ग हे नाटक, तसेच अन्य साहित्यही लिहिले. तसेच अनेक कविता त्यांनी लिहिल्याचे समोर येत आहे. त्यांच्या कवितांची सर्व हस्तलिखिते अद्याप प्रशासनाच्या हाती लागलेली नसली, तरी त्याचा शोध सुरू आहे. अंदमान येथून दोन मे १९२१ रोजी प्रथम अलीपूरच्या तुरुंगात काही दिवस ठेवल्यानंतर सावरकरांना १६ मे १९२१ रोजी रात्री साडेनऊ वाजता गोपनीयरीत्या रत्नागिरीच्या विशेष कारागृहात आणले गेले होते. यासंबंधीची कागदपत्रेही यामध्ये आढळली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे इतर कैद्यांना जेलमध्ये बाहेरचे अन्न, लेखन साहित्य, कपड्यांसाठी परवानगी दिली जात असताना सावरकर यांनाही तशी परवानगी नाकारण्यात आली नव्हती, ही बाबही या कागदपत्रांमधून पुढे आली आहे. अंदमान कारागृहात सावरकरांना या सर्व सुविधा उपलब्ध होत्या. त्यामुळे रत्नागिरी कारागृहातही या गोष्टींना अनुमती मिळावी, यासाठी सावरकरांनी कारागृह महानिरीक्षकांना कारागृह अधीक्षकांमार्फत लिहिलेले पत्र या कागदपत्रांमध्ये सापडले आहे. 

सावरकरांना दिवसभर हातमाग यंत्रावर काम करावे लागत होते. या कामाची नोंद असलेली व त्यांची वैयक्तिक माहिती असलेली कागदपत्रेही यामध्ये आढळली आहेत. सावरकरांचे बंधू त्यांना भेटण्यासाठी कारागृहात आले होते, याची नोंद असलेले कागदपत्रदेखील सापडलेली आहेत. सावरकरांना तीन सप्टेंबर १९२३ रोजी रत्नागिरी येथून येरवडा कारागृहात हलविण्यात आले. या वेळी सावरकरांना नेण्यासाठी एका कर्नलची नेमणूक करण्यात आली होती. विशेष म्हणजे त्यांना ॲम्बेसॅडर कारने येरवड्याला रवाना करण्यात आले होते, अशी महत्त्वपूर्ण माहिती व त्या कारचा कममांक असलेली कागदपत्रेही आढळली आहेत.पतितपावन मंदिर आणि सावरकर स्मारक
रत्नागिरीतील विठ्ठल मंदिर पुरातन आहे. राजस्थानातून आलेल्या गुजर कुटुंबीयांनी हे मंदिर बांधले. मुमय मंदिराभोवती इतर देवदेवतांची मंदिरे आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पतितपावन मंदिर उभारण्यापूर्वी जनसामान्यांना या मंदिरात प्रवेश मिळावा, म्हणून लढा दिला होता. या संघर्षामुळे बहुजन समाजाच्या नागरिकांना सभामंडपापर्यंत प्रवेश देण्यात आला होता. विठ्ठल मंदिरातील सत्याग्रहाचा अनुभव लक्षात घेऊन सामाजिक समतेचा उद्घोष करण्यासाठी स्वतंत्र मंदिर बांधण्याचा निश्चय सावरकरांनी केला. दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या मदतीने तेव्हा तीन लाख रुपये खर्चून हे मंदिर स्थानबद्धतेत असताना सावरकरांनी बांधले. बहुजन समाजासाठी हे मंदिर खुले करण्यात आले आणि त्यांना पूजा-प्रार्थनेचा समान अधिकार देण्यात आला. सामाजिक समतेचा एक अध्याय सुरू करणाऱ्या या पतितपावन मंदिराचे उद्घाटन २२ फेब्रुवारी १९३१ रोजी करण्यात आले. हे मंदिर म्हणजे सावरकरांचे स्मारक आहेच; पण त्याच मंदिराच्या परिसरात सावरकरांचे प्रेरणादायी स्मारक उभारण्यात आले आहे. स्मारकाच्या पहिल्या मजल्यावर गाथा बलिदानाची हे प्रदर्शन असून १८५७च्या स्वातंत्र्यसमरापासून ते स्वातंत्र्याच्या काळापर्यंतचे देशभक्त, क्रांतिकारक, हुतात्मे यांचा स्फूर्तिदायी, त्यागमय व तेजस्वी इतिहास तेथे मांडण्यात आला आहे. वीर सावरकरांच्या ज्या वस्तूंनी इतिहास घडवला ती सावरकरांनी लंडनहून पाठवलेली दोन पिस्तुले, त्यांची काठी, जंबिया, व्यायामाचे मुद्गल, सावरकारांची काठी, त्यांचा चष्मा, त्यांच्या जवळ असणारा जंबिया अशा अनेक गोष्टी तेथे प्रेरणा देत आहेत. मार्सेलिस बंदरावर ज्या बोटीतून सावरकरांनी मायभूमीच्या ओढीने समुद्रात ऐतिहासिक उडी घेतली, त्या मोरिया बोटीची प्रतिकृती तेथे ठेवली आहे. तळमजल्यावरील सभागृहात माहितीपटांद्वारे सर्वांना थोर नररत्ने व इतरही अनेक गोष्टींची माहिती देण्यात येते. या स्मारकाला सकाळी साडेदहा ते दुपारी १२ आणि सायंकाळी साडेतीन ते साडेपाच या वेळेत भेट देता येते.

- प्रमोद कोनकर
ई-मेल : pramodkonkar@gmail.com

(लेखक रत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाचे संपादक आहेत. हा लेख ‘साप्ताहिक कोकण मीडिया’च्या २२ फेब्रुवारी २०१९च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.)

(या लेखासाठी महाराष्ट्र राज्य माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, कारागृह अधीक्षक आर. आर. देशमुख, तुरुंगाधिकारी अमेय पोतदार, पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब परुळेकर यांनी दिलेली माहिती आणि पतितपावन मंदिर संस्थेच्या संकेतस्थळाचा संदर्भ घेण्यात आला आहे.)

(स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्यप्रतिभेबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. सावरकरांच्या कार्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सावरकरांची ई-बुक्स मोफत :
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्टतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समग्र साहित्यापैकी बहुतांश पुस्तके ई-बुक स्वरूपात बुकगंगा डॉट कॉम या पोर्टलवर मोफत उपलब्ध आहेत. ती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. बुकगंगाच्या मोबाइल अॅप्लिकेशनवरूनही ती डाउनलोड करता येतील.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 144 Days ago
I. Have read his book dealing with life in Andaman . I have also read ' One day in the life of Ivan Denisovich ' . Neither is fiction . Perspective helps .
0
0
Bal Gramopadhye About 156 Days ago
He had strong views on ritualistic religion . This aspect is , Usually , ignored . He made important contribution to Marathi language . The periodical , Kirloskar used to publishe his articles .
0
0
मकरंद About 203 Days ago
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम, त्यांनी भोगलेल्या हालअपेष्टा वाचल्या की डोळ्यातून आसवं येतात, रत्नागिरकरांचे भाग्य असा महान नेता रत्नागिरीत वास्तव्याला होता.
0
0

Select Language
Share Link
 
Search