Next
‘शिक्षणाचा उपयोग उत्तम नागरिक घडविण्यासाठी व्हावा’
डॉ. स्वाती पोपट वत्स यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Tuesday, June 18, 2019 | 05:56 PM
15 0 0
Share this article:

‘वन्स अपॉन अ स्टोरी’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) नेहा कारे, कुसुम कन्वर, शिवेन जैन, महेश बालक्रिष्णन, डॉ. स्वाती पोपट वत्स, विनिता रामचंदानी, भारती ठाकोरे.

पुणे : ‘मुलांना आपण केवळ चांगले अभ्यासक बनवून उपयोग नसतो, तर त्यांना चांगले नागरिक बनविण्यासाठी शिक्षणाचा उपयोग व्हायला हवा. त्यासाठी गिजूभाई बढेका यांनी १०० पेक्षा अधिक वर्षांपूर्वी जे ‘दिव्यस्वप्न’ बघितले आहे ते केवळ पुस्तकात असून, उपयोग नाही, तर प्रत्यक्ष कृतीत उतरणे आवश्यक आहे,’ असे मत ‘अर्ली चाइल्डहूड असोसिएशन’ संस्थेच्या अध्यक्षा डॉ. स्वाती पोपट वत्स यांनी व्यक्त केले.

लहान मुलांची शिक्षण पद्धती व त्याचा मुलांवर होणारा परिणाम या संदर्भात स्वाती वत्स व लेखक, पत्रकार विनिता रामचंदानी यांनी गिजूभाई यांच्यावर लिहिलेल्या ‘वन्स अपॉन अ स्टोरी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. आयबी बोर्डाचे विकसन व्यवस्थापक महेश बालक्रिष्णन हे या वेळी प्रमुख पाहुणे होते. पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने ‘आपल्या शिक्षण व्यवस्थेला तुम्ही कोणत्या प्रकारची गुणपत्रिका द्याल? उत्तम, सुधारणेला वाव किंवा नापास’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात बालक्रिष्णन, विनिता, स्वाती वत्स, युनिमो युनिव्हर्स ऑफ मॉम्सच्या संस्थापिका नेहा कारे, न्यू मिलेनियम एज्युकेशन पार्टनर्सच्या संस्थापक कार्यकारी अधिकारी भारती ठाकोरे व विद्यार्थी लेखक शिवेन जैन यांनी आपली मते मांडली. के के किड्स लर्निंग सिस्टीमच्या संस्थापक संचालिका कुसुम कन्वर यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.

पुस्तकाविषयी बोलताना बालक्रिष्णन म्हणाले, ‘गिजूभाईसारखे अनेक दिग्गज आपल्याकडे आहेत; पण त्यांच्याविषयी आपल्याला माहिती नाही. जे ज्ञान आपण बाहेर शोधात फिरतो ते आपल्याकडे अनेक वर्षांपासून आहे. तो कोहिनूर आपण ओळखायला हवा. मुलांना शिक्षणात आनंद मिळायला हवा, शिक्षणाचा त्यांच्यावर ताण न येता मोकळीक मिळायला हवी. खरे तर मुलांना शून्य ते सहा या वयोगटात शाळेत न पाठवता घरीच शिक्षण द्यायला हवे. मला असे वाटते, की मुलांनी शाळेत जायलाच हवे, अशी सक्ती नसावी, तर त्यांचे शिक्षण कुठेही असले, तरी सुरू राहायला हवे याकडे अधिक लक्ष दिले जायला हवे. शिक्षण हे गुण, निकाल यावर आधारित आहे. हे चुकीचे वाटत असले, तरी याला शिक्षण संस्थेच्या बरोबरीने पालकही जबाबदार आहेत.’

परिसंवादात (डावीकडून) शिवेन जैन, नेहा कारे, भारती ठाकोरे, महेश बालक्रिष्णन, डॉ. स्वाती पोपट वत्स, विनिता रामचंदानी, कुसुम कन्वर.

चांगले शिक्षण केवळ परदेशातच मिळते असे नसून भारतातही उत्तम शिक्षण मिळते. मुलांच्या सर्वांगीण विकास व शिक्षणासाठी केवळ शिक्षण संस्थांकडे बोट दाखवून चालणार नाही त्याबरोबरच कुटुंबाचाही त्याला योग्य आधार व मदत असणे आवश्यक असल्याचे डॉ. वत्स म्हणाल्या. 

विनिता म्हणाल्या, ‘शिक्षण एकटे बदलणे शक्य नाही, त्याच्या बरोबरीनेच पालक, परिस्थिती असे सगळ्यांना बदलावे लागणार आहे. आपण मुलांना शिक्षण देतो म्हणजे काय करतो, त्यांना स्वतःला विचार करायला शिकवत आहोत का, जे शिक्षण देत आहोत त्याद्वारे त्यांना जगायला शिकवत आहोत का, या सगळ्याचा विचार करणे गरजेचे आहे.’

मुलांकडे आपले भविष्य म्हणून बघायला हवे त्यांना त्या पद्धतीचे शिक्षण द्यावे, असे मत ठाकोरे यांनी व्यक्त केले. कारे यांनी पालकांचे प्रतिनिधित्व करत शिक्षण व्यवस्थेत मुलांच्या गुणांना महत्व दिले जाते प्रयत्नांना दाद नाही, अशी खंत व्यक्त केली.

विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करत शिवेन म्हणाला, ‘शिक्षण व्यवस्थेतील गुणपत्रिकेची पद्धत ही निराशाजनक आहे. प्रयत्नांकडे सहज दुर्लक्ष केले जाते. प्रत्येकांत वेगळे गुण कौशल्य असते, त्या छुप्या गुणांना वाव देणारी शिक्षण पद्धती असावी.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search