Next
जाधवांचा वाडा
BOI
Thursday, August 01, 2019 | 07:00 AM
15 0 0
Share this article:

कोकणातील भुतांच्या गोष्टी अनेकदा कानावर येतात.रत्नागिरीमधील अशाच एका भुताच्या समजल्या जाणाऱ्या वाड्यामधले भयावह अनुभव कथन करणारी, आयडा बॅरेटो यांची ‘जाधवांचा वाडा’ ही कादंबरी सत्यघटनांवर आधारित आहे. या रहस्यमय कादंबरीविषयी लेखिकेने लिहिलेले हे दोन शब्द...
...................
प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील सत्य अनुभव एकत्र केले, तर ती एक उत्कृष्ट कादंबरी होऊ शकते. रत्नागिरी, गोवा, कारवार या ठिकाणी सामान्य मनुष्यदेखील वाड्यात राहतो. कोणाचा स्वकष्टाने बांधलेला वाडा असतो, तर कोणाला आपल्या पूर्वजांकडून वारशाने मिळालेला असतो. अशा या काळोखाने भरलेल्या बहुतांश वाड्यांमध्ये अनेक भयावह गोष्टी दडलेल्या असतात. परंतु तिथे राहणाऱ्या कुटुंबांना त्यांच्या गरीब परिस्थितीमुळे हे वाडे सोडता येत नाहीत. नंतर ही कुटुंबे आपले उर्वरित आयुष्य त्या वाड्यांतच घालवतात.

अशाच एका वाड्याचे सत्य अनुभव एकत्र करून ‘जाधवांचा वाडा’ हा कादंबरीचा पहिला भाग लिहिला गेला. त्या वाड्यातील ते सत्य अनुभव माझ्या कादंबरीत लिहिताना मी थोड्या वेगळ्या पद्धतीने लिहिले आहेत. परंतु कादंबरीचा मूळ गाभा तोच आहे. ‘जाधवांचा वाडा’ या रत्नागिरीच्या स्मशानातील भुतांच्या वाड्यात जाधवांच्या तीन पिढ्या त्यांच्या परिस्थितीमुळे राहिल्या. वाड्यातील त्या सर्व वावरांबरोबर तेथील जाधवांची सर्व माणसे वावरे होऊनच आयुष्य जगली. 

निपाणीचे मराठा सरदार हिंमतराय बहादूर यांनी पुत्रप्राप्तीसाठी काही अघोरी तांत्रिकांच्या सांगण्यावरून रत्नागिरीच्या मोठ्या स्मशानात हा जाधवांचा भुताचा वाडा बांधला. अर्थात या वाड्यात त्या स्मशानातले अनेक अतृप्त आत्मे वास करू लागले. या हिंमतराय बहादुरांनी पुत्रप्राप्तीसाठी जे काही अशुभ कार्य केले, त्याचे तसेच अशुभ फळ त्यांना भोगावे लागले. 

पुढे या सबंध सरदार कुटुंबाचा अत्यंत हृदयद्रावक असा अंत झाला आणि नंतर हा अशुभ वाडा बक्षीसरूपाने मल्हारराव मारोती जाधव यांच्या मालकीचा झाला. पुढे रत्नागिरीत हा वाडा ‘जाधवांचा वाडा’ या नावाने ओळखला जाऊ लागला. 

मल्हारराव जाधवांनंतर तो वाडा त्यांचे पुत्र कृष्णकांत जाधव याच्या मालकीचा झाला आणि नंतर या कादंबरीच्या पहिल्या भागाला सुरुवात झाली. या जाधवांच्या भुताच्या वाड्यात जाधवांच्या तीन पिढ्या झाल्या होत्या. वाड्यातील सर्वच माणसे परिस्थितीमुळे आणि वाड्यातील नारळाच्या व आमराईच्या उत्पन्नामुळे नाईलाजाने राहिली. नंतर त्या वाड्यातील माणसांना काय काय भोगावे लागले, हे सर्व सत्य अनुभव या कादंबरीत लिहिले आहेत. 

वास्तविक ‘जाधवांचा वाडा’ या कादंबरीचा हा पहिला भाग असून, तीन भाग प्रकाशित झाल्यानंतरच ही कादंबरी पूर्ण होणार आहे. हे उर्वरित भाग लवकरच प्रकाशित होणार आहेत. 

पुस्तक : जाधवांचा वाडा
लेखक : आयडा बॅरेटो
प्रकाशक : आयव्हन बॅरेटो
पृष्ठे : ३८३
मूल्य : ४०० रुपये
ई-मेल : authorida@gmail.com

(हे ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search