Next
बडी देर भई नंदलाला...
BOI
Sunday, September 02, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

हिंदी चित्रपटांमधून अनेक देव-देवता कथानकाच्या अनुषंगाने पडद्यावर येत असल्या, तरी अगदी मूकपटांपासून बोलपटांपर्यंत आणि अगदी आजच्या काळातल्या हिंदी चित्रपटांमध्येही मूर्ती, गाणी किंवा कथानकाच्या स्वरूपात सर्वांत जास्त झळकला तो श्रीकृष्ण. आज कृष्ण जन्माष्टमी आहे. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज हिंदी चित्रपटसृष्टीतील कृष्णगीतांवर एक धावती नजर आणि ‘बडी देर भई नंदलाला...’ या गीताचा रसास्वाद...
........
रसिकहो, ‘सुनहरे गीत’ सदरामध्ये आपण नेहमी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मधुर गीत आणि एका कलावंतांची थोडक्यात माहिती घेतो. आजही आपण एक ‘सुनहरे गीत’ बघणार आहोत; पण हिंदी चित्रपटसृष्टीतील कोणत्याही कलावंतांची माहिती मात्र येथे आज वाचायला मिळणार नाही. चित्रपटसृष्टीतील कलावंतांचीच नव्हे, तर या जागील सर्वांची सूत्रे ज्याच्या हातात आहेत, ‘तो’च आज केंद्रस्थानी असणार आहे. कारण आजचा दिवस आहे कृष्णाष्टमीचा! होय! रसिकहो आजच्या दिवसाच्या अनुषंगाने आपण भगवान श्रीकृष्णाबद्दच येथे काही वाचणार आहात, अर्थात हिंदी चित्रपटांच्या संदर्भात!

हिंदी चित्रपटांमधून अनेक देव-देवता कथानकाच्या अनुषंगाने पडद्यावर येत असल्या, तरी त्यामध्ये अनेक चित्रपटांत मूर्तीच्या स्वरूपात, गाण्याच्या स्वरूपात अगर कथानकाच्या स्वरूपात जास्त आढळून येणारा देव म्हणजे श्रीकृष्ण! तसे पाहिले, तर श्रीराम, शंकर, देवी, गणपती, मारुती असे देव आपल्या अनेक चित्रपटांत व चित्रपटगीतांत दिसतात; पण या सर्वांपेक्षा श्रीकृष्ण दिसण्याचे प्रमाण जास्त आहे. हे पाहता, हिंदी चित्रपट निर्मात्यांचा आवडता देव म्हणजे श्रीकृष्ण असे विधान केल्यास वावगे ठरणार नाही.

भारतात जेव्हा प्रथम मूकपट तयार होत होते, तेव्हाही श्रीकृष्णजन्म, कालियामर्दन, शिशुपालवध असे कृष्णाच्या जीवनकथेवरचे मूकपट निर्माण झाले होते. १९३१मध्ये जेव्हा मूकपटाचा ‘बोलपट’ झाला, तेव्हापासून निर्माण होणाऱ्या चित्रपटांत पौराणिक चित्रपटांचा भरणा जास्त होता. त्यामध्ये राधाकृष्ण, श्रीकृष्ण विवाह, श्रीकृष्ण दर्शन इत्यादी चित्रपटांचा समावेश होता. पुढील काळात चित्रपटाची कथानके बदलू लागली. सामाजिक समस्या, कौटुंबिक कलह व प्रेम असे विषय असलेले चित्रपट येऊ लागले, तरीही अधूनमधून बलराम-श्रीकृष्ण, हरिदर्शन, कृष्णावतार अशा चित्रपटांमधून कृष्ण पडद्यावर येत राहिला! त्यानंतरही, कौटुंबिक कथानक असो अगर प्रेमकथा असो, त्यामध्ये कथानकाच्या अनुषंगाने कृष्णाची मूर्ती, कृष्णाचे मंदिर आणि महत्त्वाचे म्हणजे कृष्णाचा उल्लेख असलेले गीत येत राहिले आणि आजही डोकावताना दिसते.

हिंदी चित्रपटातील कृष्णगीते हा खरे तर फार मोठा विषय आहे; पण तरीही एक धावता आढावा घेऊ. ‘देवदास’मधील ‘पारो’ची व्यथा दाखवताना बिमल रॉय यांच्यासारखा दिग्दर्शक ‘कान्हा आन मिलो श्याम सावरे ...’सारखे गीत पडद्यावर दाखवून ‘ब्रिज में अकेली राधे खोई खोई सी रे...’ अशा काव्य पंक्तीतून पारोचे दु:ख मांडतो.

अकबराच्या काळातील अनारकलीची प्रेमकथा दर्शविताना ‘मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे...’सारखे कृष्णगीतच नव्हे, तर कृष्णजन्माचा सोहळा पडद्यावर दाखवून के. असीफसारखा दिग्दर्शक प्रेक्षकांना बांधून ठेवतो. वर्णाने काळी असलेल्या तरुणीचे दु:ख सांगणारा चित्रपट म्हणजे ‘मैं भी लडकी हूँ’ (१९६४)! ए. व्ही. एम. मद्रास संस्थेचा हा सामाजिक चित्रपट! तेथे नायिका काळ्या वर्णाची. ती काळ्या वर्णाच्याच देवाला अर्थात श्रीकृष्णाला प्रश्न करते - त्यासाठीचे गीत राजेंद्रकृष्ण लिहितात - ‘कृष्णा ओ काले कृष्णा, तूने ये क्या किया, कैसा बदला लिया रंग देके मुझे अपना.....’ संगीतकार चित्रगुप्त यांनी संगीत दिलेले आणि लता मंगेशकर यांनी गायलेले हे गीत मधुर आहेच; पण ते एक वेगळे कृष्णगीतही आहे.

गीतकार राजेंद्रकृष्ण यांचा विषय निघाला, की नावातच कृष्ण असलेल्या या प्रतिभासंपन्न गीतकाराने लिहिलेली अनेक कृष्णगीते आठवतात. त्यामधील एक म्हणजे मिस मेरी (१९५७) या चित्रपटामधील ‘वृंदावन का कृष्ण कन्हैया ....’ हे हेमंतकुमार यांनी संगीत दिलेलेल एक मधुर गीत! १९५५च्या ‘आझाद’ चित्रपटाकरीता हेच राजेंद्रकृष्ण राधेला गीतात घेतात! कृष्णाबरोबर राधा हे ठरलेलेच! मग या राधेची मनःस्थिती वर्णन करतानाचे शब्द ‘राधा ना बोले ना बोले रे.... !’ हेही एक प्रकारे मधुर कृष्णगीतच!

‘कान्हा आन पडी तेरे द्वार...’ अशा शब्दांत ‘शागीर्द’ची (१९६७) नायिका कृष्णाची आळवणी करते. दहीहंडीचा सोहळा मोहम्मद रफी ‘ब्लफ मास्टर’ चित्रपटात ‘गोविंदा आला रे ....’ असे गाऊन साजरा करतो. कल्याणजी-आनंदजींचे संगीत आपल्यालाही पावले थिरकवायला लावते.

कृष्ण-राधा-मीरा-बासरी या सर्वांचा विचार करूनही हिंदी चित्रपटाच्या गीतकारांनी गीते लिहिली. त्यामध्ये ‘श्याम तेरी बन्सी पुकारे राधा नाम लोग करे मीरा को यूँ ही बदनाम’सारखी वेगळी तक्रार मांडली गेली. कृष्णाच्या बालपणीच्या खोड्यांवरून ‘बडा नटखट है ..’सारखे गीतही लिहिले गेले. आणि ‘बनवारी रे जीने का सहारा तेरा नाम रे’सारखे भक्तिगीतही लिहिले गेले.

लगान

कृष्णाशिवाय कोणी त्राता नाही, हे सांगणारे १९४३च्या ‘किस्मत’ चित्रपटातील अमीरबाई कर्नाटकी यांनी गायलेले कवी प्रदीप यांचे ‘अब तेरे सिवा कौन मेरा कृष्ण कन्हैया’ हे गीत लोकप्रिय झाले होते. २००१च्या ‘लगान’ चित्रपटातील राधेची गोड तक्रार असलेले ‘राधा कैसे ना जले....’ हे कृष्णगीतही लोकप्रिय ठरले होते.

‘राधिके तूने बन्सरी चुराई.....’ (बेटी-बेटे), ‘कान्हा बजाए बन्सरी, और ग्वाले बजाए....’ (नास्तिक १९५४), ‘मधुबन में राधिका नाचे रे....’ (कोहिनूर, १९६०), ‘शोर मच गया शोर देखो आया माखनचोर ....’ (बदला, १९७४) अशी अनेक कृष्णगीतेही हिंदी चित्रपटांनी दिली आहेत. 

शाहू मोडकहिंदी चित्रपट आणि कृष्ण हा विषय निघाला, की आवर्जून आठवतो अभिनेते शाहू मोडक यांचा चेहरा! कृष्णाची भूमिका अभी भट्टाचार्य, विक्रम गोखले, महिपाल इत्यादी अभिनेत्यांनीही केली होती; पण शाहू मोडक कृष्ण म्हणून एवढे भावले होते, की प्रत्यक्ष कृष्ण जरी पुढे आले, तरी ते शाहू मोडकांसारखेच असतील, असे वाटण्याइतपत शाहू मोडक यांचे व्यक्तिमत्त्व कृष्णरूप होते. जेव्हा टीव्हीचा जमाना सुरू झाला व ‘महाभारत’ मालिकेतील कृष्ण म्हणून नितीश भारद्वाज  पुढे आला, तेव्हा अर्थात हाही श्रीकृष्ण भावला! परंतु त्यानेही एका मुलाखतीत सांगितले होते, ‘माझी भूमिका पाहून शाहू मोडक यांनी माझे कौतुक केले. त्यामुळे मी भारावून गेलो.’ शाहू मोडक यांचा कृष्ण म्हणून एवढा प्रभाव चित्रपटसृष्टीत होता. 

हिंदी सिनेमा आणि श्रीकृष्ण, त्याची कथानके, गीत हा विषय फार मोठा आणि स्वतंत्रपणे लिहिण्यासारखा आहे. आता आपण एक ‘सुनहरे गीत’ पाहू या. अर्थातच ते ‘कृष्णगीत’ आहे. चित्रपट १९६५चा खानदान. संगीतकार रवी. गीतकार राजेंद्रकृष्ण आणि गायक मोहम्मद रफी.

चित्रपटातील कृष्ण जन्मोत्सवाच्या प्रसंगी चित्रपटाचा नायक सुनील दत्त गातो - रफी ‘ओ हो ओ-’ अशी साद घालून गीताला सुरुवात करतो. 

ग्वाल बाल इक इक से पूछे, कहाँ है मुरलीवाला रे

(हे परमेश्वरा, हे) नंदलाला, खूप उशीर झाला आहे रे. वृंदावनातील गोपी तुझी केव्हापासून वाट पाहत आहेत. वृंदावनातील गोप आणि बालके एकमेकांना विचारत आहेत, की मुरलीवाला कोठे आहे?

कृष्ण गोकुळात मोठा झाला. नंतर मथुरेत गेला. द्वारकानगरीत जाऊन राहिला. तेव्हा गोकुळवासीयांची अवस्था कशी झाली? ते काय म्हणतात?

कोई न जाए कुंज गलीन में तुज बिन कलीयाँ चुनने को 
तरस रहें है जमुना के तट
धून मुरली की सुनने को 
अब तो दर्श दिखा दे नटखट क्यूँ दुविधा में डाला रे?

(तू आता येथे नाहीस त्यामुळे) तुझ्याशिवाय कुंजामध्ये, बगीच्यामध्ये फुलांच्या ताटव्यात जाऊन कोण कळ्या वेचणार आहे? गोळा करणार आहे? (अरे तुझ्या) मुरलीची धून ऐकण्यासाठी यमुनेचे काठ आसुसले आहेत. (आमचे हे सांगणे ऐकून) आता तरी दर्शन दे, खट्याळ कन्हैया... का आम्हाला संभ्रमात टाकतो आहेस?

यानंतरच्या कडव्यात कवी राजेंद्रकृष्ण श्रीमद्भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील सातव्या व आठव्या श्लोकाचा आधार घेऊन कृष्णाला जी विनंती करतात, ती त्या काळातही योग्य होती व आजही त्यांचे ते मागणे योग्यच ठरते. ते या कडव्यात म्हणतात - 

संकट में है आज वो धरती जिसपर तूने जनम लिया
पूरा कर दे आज वचन वो गीता में जो तूने दिया 
कोई नहीं है तुज बिन मोहन भारत का रखवाला रे

ज्या भूमीवर तू जन्म घेतला होतास, ती भूमी (हे मधुसूदना) आज संकटात आहे. त्यामुळे हे उपेंद्रा, एकेकाळी श्रीमद्भगवद्गीतेत दिलेले वचन तू आता पूर्ण कर. (यदा यदा हि धर्मस्य...) कारण हे मोहना, तुझ्या शिवाय या भारताचा रक्षणकर्ता कोणी नाही रे.

असे हे दोनच कडव्यांचे गीत; पण केवढे अर्थपूर्ण आणि मोहम्मद रफीने ते तन्मयतेने गायलेही आहे. संगीतकार रवींची मधुर चाल, पडद्यावरचा कृष्ण जन्मोत्सव व गीत गाणारा सुनील दत्त... सारेच सुनहरे... कृष्णासारखे मन प्रसन्न करणारे! जय श्रीकृष्ण!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search