Next
‘अन्नपूर्णा परिवारा’तर्फे १५० कोटींचे सूक्ष्म कर्ज वाटप
प्रेस रिलीज
Wednesday, March 14 | 06:04 PM
15 0 0
Share this story

अन्नपूर्णा परिवाराच्या कामगिरीची माहिती देताना संस्थेच्या अध्यक्ष डॉ. मेधा पुरव सामंत, समवेत संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्य

पुणे : ‘स्वयंरोजगार करणाऱ्या महिला सभासदांच्या सक्षमीकरणासाठी ‘ अन्नपूर्णा परिवार’ गेली पंचवीस वर्षे कार्यरत असून, आतापर्यंत या परिवारामध्ये एक लाखांपेक्षा अधिक महिला सदस्य सहभागी झाल्या आहेत. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये संस्थेने एकूण १५० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असून, अनुत्पादित कर्जाची टक्केवारी अवघी एक टक्का इतकी आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणाचे व्यापक ध्येय गाठण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे, अशी माहिती ‘अन्नपूर्णा परिवारा’च्या अध्यक्षा डॉ. मेधा सामंत पुरव यांनी दिली.   

संस्थेच्या कामगिरीबद्दल माहिती देताना त्या म्हणाल्या, ‘नोटाबंदी आणि वस्तु व सेवा कर यामुळे आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये सुक्ष्म कर्ज म्हणजेच ‘मायक्रो फायनान्स’ व्यवसायाला जबरदस्त धक्का बसला. बँकिंग व्यवसायातील अनुत्पादक मालमत्तेमध्ये (NPA) प्रचंड वाढ झालेली दिसत आहे. त्या तुलनेत ‘मायक्रो फायनान्स’ व्यवसायातील अनुत्पादक मालमत्ता गेली पाच वर्षे दोन टक्क्यांपेक्षा कमी होती, गेल्या आर्थिक वर्षात तिच्यातही वाढ होऊन राष्ट्रीय स्तरावर ती नऊ टक्के  तर, राज्यस्तरावर वीस टक्के इतकी झाली. एकंदरीत असे चित्र असताना, ‘अन्नपूर्णा परिवारा’ने अत्यंत सकारात्मक कामगिरी करत अनुत्पादक कर्जाची टक्केवारी अवघी एक टक्के ठेवण्यात यश मिळवले. आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल स्थिती असतानाही छोटे मोठे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या महिला अत्यंत  प्रामाणिकपणाने आपली कर्जफेड करतात. त्यामुळेच हे शक्य झाले आहे’. 

‘अन्नपूर्णा परिवार केवळ गरिबांना विना तारण कर्ज सुविधा देतेच, पण त्यांना एका सर्वंकष पॅकेजमध्ये कर्ज, बचत, स्वास्थ्य, जीवन व परिवार विमा, म्हातारपणाची सोय म्हणून पेन्शन योजना; तसेच विना आर्थिक सेवांमध्ये पाळणाघरे, आर्थिक साक्षरता प्रशिक्षण अशा सुविधाही पुरविते. अन्नपूर्णा परिवार आपल्या सभासदांकडून ऐच्छिक बचत स्वरूपात बचत गोळा करते. ज्यामध्ये २०१७-१८ या वर्षात वाढ होऊन ही रक्कम ३३ कोटीवरून  ४० कोटीपर्यंत गेली आहे. त्याचबरोबर संस्थेने २०१७-१८ मध्ये आपल्या सभासदांना तसेच, त्यांच्या परिवारातील सदस्यांना १३० लाख रुपयांची  रक्कम आजारपणाच्या दाव्यांपोटी दिली आहे. ही एक अनोखी सुविधा ‘अन्नपूर्णा’ पुरविते, अन्य कोणतीही ‘मायक्रो फायनान्स’ संस्था अशी सुविधा देत नाही’, असेही त्यांनी नमूद केले. 

‘२०१८-१९ वर्षाकरिता अन्नपूर्णा परिवाराचा आपल्या सभासदांसाठी कर्ज, बचत, आरोग्य, जीवन व परिवारविमा असे एकत्रित एक चांगले पॅकेज देण्याचा मानस आहे. रोखरहित व्यवहार प्रणालीचा वापर वाढवण्यावरही संस्था भर देणार असून, एप्रिल २०१८पासून क्रेडिट सोसायटीमध्ये नवीन योजना सुरू करण्यात येणार  आहेत. कमी व्याजदरात जास्त कर्ज, विना तारण कर्जमर्यादा तीस हजारवरून २० लाखांपर्यंत देणे, आरोग्यविमा वीस ते पस्तीस हजार रुपये प्रती व्यक्ती करणे’,अशा योजना विचाराधीन असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link