Next
‘वंचित विकास’तर्फे संघर्ष करणाऱ्या महिलांचा सन्मान
अभया पुरस्कार प्रदान
BOI
Thursday, May 02, 2019 | 04:28 PM
15 0 0
Share this article:

अभया पुरस्काराच्या मानकरी महिलांसह शाहिरा प्रा. संगीता मावळे, नंदिनी शेटे, उद्धव भडसाळकर, विलास चाफेकर, सुनीता जोगळेकर, मीना कुर्लेकर, मीनाक्षी नवले, देवयानी गोंगले आदी

पुणे : निर्भयपणे स्मशानात काम करणाऱ्या मालतीताई, स्वतःची किडनी नवऱ्याला देऊन रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारी एकता, खोट्या गुन्ह्यात नवऱ्याला जन्मठेपेची शिक्षा झाल्याने परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या सोनालीताई, दोन महिन्यात जवळची सहा माणसे गमावल्यानंतर पुन्हा उभ्या राहणाऱ्या संध्याताई.. अशा कष्ट करून आपल्या पोटाच्या मुलांना वाढवणाऱ्या आणि संघर्षाची ज्योत तेवत ठेवून आयुष्य प्रकाशमय करणाऱ्या १६ स्त्रियांचा वंचित विकास संस्थेच्या अभया मैत्री गटातर्फे ‘अभया पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. 

अभया पुरस्काराचे हे पाचवे वर्ष होते. कीर्तनकार, शाहिरा प्रा. संगीता मावळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी शेटे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार उद्धव भडसाळकर, वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर, संचालिका सुनीता जोगळेकर, मीनाताई कुर्लेकर, मीनाक्षी नवले, देवयानी गोंगले आदी उपस्थित होते. या महिलांच्या संघर्ष कहाण्यांनी उपस्थितांचे डोळे पाणावले. पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर येताना अभयांना भरून येत होते.

परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी स्मशानात चिता रचण्याचे काम करणाऱ्या मालतीताई माझिरे, मनोरुग्ण-व्यसनी जोडीदारापासून वेगळे होत जिद्दीने मुलींना घडवणाऱ्या वर्षा तिखे, पती सोडून गेल्यानंतर घरकाम करून मुलींना वाढवणाऱ्या संगीता चांदणे, सासरच्या छळाला कंटाळून घर सोडल्यानंतर पाणीपुरीच्या गाडीवर धाडसाने उभे राहून मुलीला उच्चशिक्षित करणाऱ्या पूजा देसाई, नवऱ्याने फसवल्यानंतर एकट्या पडलेल्या, पण पुन्हा जिद्दीने उभ्या राहिलेल्या विद्या वाईकर, अंथरुणाला खिळलेल्या, निराधार, अंध अपंगांची माय झालेल्या अॅड. प्रीती वैद्य, पती बेपत्ता झाल्यानंतर वडिलांच्या आधाराने पोटच्या मुलीला घेऊन स्वाभिमानाने जगणाऱ्या निर्मला थोरात, दोन महिन्यात एका पाठोपाठ एक अशी जवळची सहा माणसे गमावल्याचे दुःख उराशी घेऊन सहा वर्षाच्या नातीबरोबर रमणाऱ्या संध्या हुलकोपकर, पतीच्या निधनानंतर घरगुती कामे करून मुलांना उच्च पदावर पोहोचवणाऱ्या अनुराधा काळे, नवऱ्याने घराबाहेर काढल्यानंतर आणि सावत्र आईने नाकारल्यानंतर दोन मुलांना घेऊन संघर्ष करणाऱ्या मनीषा भोसले, वस्तीतील गुंडाच्या त्रासापासून मुली-महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणारी किरण पवार, सासरकडून नाकारल्यानंतर आयुष्यभर स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या रंजिता आरेकर, खोट्या गुन्ह्यात नवऱ्याला जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर मोलमजुरी करून तीन मुलांना वाढवणाऱ्या सोनाली कांबळे, कौटुंबिक अडचणींवर मात करीत सामाजिक कार्यात झोकून देणाऱ्या विनया लेले, नवऱ्याला स्वतःची किडनी देऊन उभे करणारी आणि रिक्षा चालवून घर चालवणारी एकता सोनावणे आणि जनता वसाहतीत सामाजिक काम उभारणाऱ्या संध्या बोगाम्मा यांना अभया पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या वेळी बोलताना प्रा. संगीता मावळे म्हणाल्या, ‘प्रत्येकीचे आयुष्य जिद्दीने, संघर्षाने भरलेले आहे. या सगळ्यांची कहाणी प्रेरणादायी, तर आहेच; पण प्रत्येकीवर एक सिनेमा होईल अशी आहे. आयुष्यात आलेल्या आव्हानांचा सामना करून ताठ मानेने उभे राहण्याचा त्यांचा प्रयत्न जगण्याचा अर्थ सांगणारा आहे. त्यांचा संघर्ष पाहिल्यानंतर आपले आयुष्य फारच सुलभ असल्यासारखे वाटू लागले आहे.’

नंदिनी शेटे म्हणाल्या, ‘येथे पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या प्रत्येक स्त्रीची कथा डोळ्यात पाणी आणणारी आहे. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत ताठ मानेने जगणाऱ्या या अभयांना भेटून मलाही जगण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे.’
 
सूत्रसंचालन देवयानी गोंगले यांनी केले. मीनाताई कुर्लेकर यांनी अभया मैत्री गटाविषयी सांगितले. मीनाक्षी नवले यांनी पुरस्कारार्थींच्या संघर्षाचा आढावा घेतला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search