Next
रत्नागिरीत २२ जानेवारीला हमीद दलवाईंवरील माहितीपट
BOI
Wednesday, January 16, 2019 | 03:06 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : कोकणात जन्मलेले, मुस्लिम समाजसुधारणेसाठी झटलेले समाजसुधारक, लेखक, समाजवादी विचारसरणीचे सामाजिक कार्यकर्ते असलेल्या हमीद दलवाई यांच्या विचारांचा, कामाचा, लेखनाचा परिचय तरुण पिढीला व्हावा या हेतूने सुप्रसिद्ध अभिनेत्री ज्योती सुभाष यांच्या संकल्पनेतून ‘हमीद दलवाई : द अनसंग हुमॅनिस्ट’ हा माहितीपट साकारला आहे. हा माहितीपट २२ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी सात वाजता गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात दाखविला जाणार आहे. या प्रसंगी ज्योती सुभाष उपस्थित राहणार आहेत.

या माहितीपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन ज्योती सुभाष यांचेच आहे. चिपळूण तालुक्यातील मिरजोळीसारख्या खेड्यात सनातनी मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या हमीद दलवाई यांचा अग्रगण्य समाजसुधारक म्हणून झालेला प्रवास या महितीपटाच्या निमित्ताने उलगडणार आहे. यात अभिनेते नसीरुद्दीन शहा, अभिनेत्री अमृता सुभाष आणि हमीद दाभोळकर (डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे सुपुत्र ज्यांचे नाव हमीद दलवाई यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे), क्षितीश दाते आणि सुधन्वा देशपांडे हे कलाकार सहभागी आहेत. ओंकार बर्वे यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.
 
तत्कालीन समाजामधल्या अनिष्ट रूढी, परंपरा, तिहेरी तलाक या साऱ्यांच्या विरोधात हमीद दलवाई यांनी दिलेला लढा हा महत्त्वपूर्ण होता. महाराष्ट्रातील १९ व्या शतकात होऊन गेलेल्या महात्मा फुले, आगरकर या समाजसुधारकांच्या विचारांशी साधर्म्य साधत दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सोबत येतील तेवढ्या तरुणांना बरोबर घेऊन समाजसुधारणेची चळवळ चालू केली. त्या चळवळीला विरोध करणाऱ्यांना निर्भयपणे सामोरे जात अन्यायाविरुद्ध लढा उभा केला. अशा द्रष्ट्या विचारवंताच्या अकाली मृत्यूमुळे कोकणाचे आणि पर्यायाने भारतवर्षाचे नुकसान झाले.  

या ज्येष्ठ प्रबोधनकाराच्या आयुष्याची जडणघडण, धार्मिक रूढींविरोधात निर्भयपणे उभे केलेले काम, संवेदनशील लेखणीमधून निर्माण झालेले साहित्य या सगळ्यांचा मागोवा या माहितीपटाच्या निमित्ताने ज्योती सुभाष यांनी घेतला आहे. तसेच त्यांच्या जन्मगावी जाऊन तेथील लोकांशी संवाद साधून सुमारे ३० तासांचे छायाचित्रण करून त्यावरून एक तासाचा हा माहितीपट बनला आहे.

दिग्दर्शक म्हणून ज्योती सुभाष यांची ही पहिलीच कलाकृती आहे. समाजवादी विचारसरणीच्या वातावरणात बालपण गेले असल्याने हमीद दलवाई यांचे माहात्म्य आणि त्यांचे साहित्य याचा लहानपणापासून ज्योती सुभाष यांना परिचय होता; तसेच नसीरुद्दीन शहा हे स्वतः लेखक, विचारवंत, आणि बुद्धिप्रमाण्यवादी कलाकार आहेत. त्यामुळे दलवाई यांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचले पाहिजेत, या ध्यासातून प्रचंड अभ्यासांती हा माहितीपट निर्माण झाला आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
२२ जानेवारी २०१९
वेळ : सायंकाळी सात वाजता
ठिकाण : राधाबाई शेटये सभागृह, गोगटे-जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link