Next
संगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग दोन
BOI
Tuesday, February 26, 2019 | 06:45 AM
15 1 0
Share this article:


संगीतातील ‘एफएक्यूजपैकी (फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स) काही प्रश्नांची उत्तरं मागील भागात आपण पाहिली. त्यात प्रामुख्यानं एक गोष्ट लक्षात आली असेलच, की गाण्यासाठी संगीताची किमान प्राथमिक माहिती असावी लागते. स्वरांचं ज्ञान असावं लागतं आणि गळ्यातून सुरेल स्वर निघण्यासाठी काही काळ जावा लागतो... ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी मधुवंती पेठे सांगत आहेत संगीतातील आणखी काही ‘एफएक्यूबद्दल...
......................
ड्राइव्हिंग टेस्ट देऊन लायसन्स मिळण्यासाठी किंवा ते मिळवण्यासाठी ट्रॅफिकच्या चिन्हांची जुजबी माहिती तरी करून घ्यावी लागते. तसंच गाणं शिकताना, साधारण नेहमी वापरले जाणारे पाच-सहा ताल माहिती करून घ्यावे. आपल्याला जे गाणं म्हणायचं आहे, त्याचा ताल कोणता, त्याची चौकट काय, त्याचा रिदम कसा तयार होतो, हे माहीत करून घ्यायला हवं. त्या तालाच्या चौकटीत ते गाणं कसं बसवायचं, ते स्वत: हातात ताल धरून समजून घ्यायला हवं. 

‘ताल’ हे गाण्याचं घड्याळ आहे असं मानलं, तर ते घड्याळ काटेकोरपणे पाळता आलं पाहिजे. घड्याळात किती वाजले हे पाहायला शिकल्याशिवाय, हातावर घड्याळ बांधण्यात काही अर्थ नसतो. तसं आपलं गाणं तालात येतंय की नाही हे स्वत:च बघायला शिकलं पाहिजे, ते दुसऱ्याला विचारून तालात आणता येत नाही. 

बऱ्याच जणांचा समज असतो, की आपल्याबरोबर तबला वाजला तरंच गाणं तालात येतं. असं मुळीच नाही. आपल्याबरोबर तबला वाजत असला किंवा नसला, तरी गाणं तालातच म्हणायचं असतं. मागील एका लेखात आपण ‘ताल’ ही संकल्पना जाणून घेतली आहेच. त्यात मी म्हटलं होतं, की गाण्याबरोबर असलेली तबला साथ ही गाण्याची शोभा वाढवणारी फ्रेम आहे. ती फ्रेम लावण्यापूर्वीच गाणं त्या चौकटीत बसतं की नाही, हे पहावं लागतं. नाहीतर मग काय होतं, की टेलरिंगचा कोर्स तर केला, सलवार-कुर्ती-ब्लाऊज शिवायला पण शिकलो, पण आपल्याला हव्या त्या मापात तो ड्रेस नाही झाला तर काय उपयोग?

यासाठी मी एक उदाहरण देते. आपण पेंटिंग करताना विशिष्ट मापाचा ड्रॉइंग पेपर घेतो. त्या मापात आपलं चित्र बसवतो. चित्र पूर्ण झाल्यावर त्याची शोभा वाढवण्यासाठी त्याला फ्रेम लावतो. म्हणजेच चित्र चौकटीत बसतंय का, हे फ्रेम लावताना नाही पाहत, तर चित्र काढायला सुरुवात करतानाच त्याचा विचार करतो. अगदी त्याचप्रमाणे गाणं बसवतानाच तालाचा विचार समजून घेतला पाहिजे. मग ते तालात बसवलेलं गाणं, तबला वाजल्यावर आपोआपच तालात येतं. त्यानंतर सराव करावा लागतो तो फक्त तबल्यावर वाजणारा ठेका ऐकण्याचा. तबला ऐकून ऐकून त्यावर वाजणारे निरनिराळे ताल समजायला लागतात. 

विशेषत: समूहानं भजनं-भक्तिगीतं गाणाऱ्या भजनी मंडळांच्या भगिनींची ही कायम तक्रार असते, की त्यांचा ताल कच्चा आहे. तबल्याबरोबर गाता येत नाही. त्यांना मी एक सोपा रियाज सांगते. एक-दोन-तीन-चार असे तोंडाने आकडे (मात्रा) म्हणायचे. ‘एक’वर आणि ‘तीन’वर हाताने टाळी द्यायची. न थांबता एकाच लयीत एक ते चार... पुन्हा एक ते चार असं दहा बारा वेळा म्हटलं, की एक रिदम जाणवायला लागतो. दोन टाळ्यांमध्ये कमी अंतर असल्यानं, ते सहजपणे जमायला लागतं. नंतर थोडा वेळ एक ते चार म्हणताना, फक्त ‘एक’वर टाळी द्यायची. त्यामुळे दर चार मात्रांनंतर टाळी द्यायला जमू लागतं. भजनासाठी लागणारा ताल आठ मात्रांचा असल्यानं, चार-चार मात्रांचा रिदम मनात बसला, की सोपं जातं. सुगम संगीतात तालाच्या टाळ्या मनांत पक्क्या झाल्याशिवाय गाणं तालात येत नाही. कारण त्यांतील बरेच शब्द टाळीच्या आघाताबरोबर न येता, टाळीनंतर म्हणजेच ऑफबिट येतात. त्यामुळे मनात टाळीचा आघात पडल्यावर शब्द उच्चारावा लागतो. म्हणून आधी ताल पक्का करावा.

सुगम संगीतातील इतर गीतप्रकार गाताना जेव्हा तबला न वाजता, बोंगो, कोंगो, ऑक्टोपॅड, इतर सहयोगी तालवाद्यं (साईड रिदमची वाद्यं) वापरली जातात, तेव्हा तर त्या त्या तालांच्या फ्रेमवर्कनुसार तयार होणारा रिदम समजून गाणं म्हणावं लागतं. कारण सुरुवातीला पाठ केलेले तालाचे बोल त्या वाद्यांवर वाजवले जात नाहीत, तर त्यांत खूप व्हेरिएशन्स होतात, निरनिराळ्या तालवाद्यांवर त्या त्या तालाच्या बिट्स फक्त दाखवल्या जातात. त्यामुळे मनात ताल पक्का झाला असेल, तरच त्या ‘रिदम’बरोबर गाता येतं.

थोडक्यात काय, तर ताल - स्वर यांचा परिचय करून घेऊन, त्याची समज मनात पक्की होईपर्यंत सराव करण्याची तयारी हवी. ज्याला एखादं वाद्य वाजवायला शिकण्याची इच्छा असते, त्यालाही हा विचार, ही दृष्टी तयार करावी लागते. कारण जे गाणं मनात असतं, ते वाद्यातून त्याला साकारायचं असतं. फरक इतकाच, की गायक आवाजावर जी मेहनत घेतो, ती त्याला त्याच्या वाद्य वाजवण्याच्या तंत्रावर घ्यावी लागते. त्या वाद्याचे प्लस - मायनस पॉइंट्स माहित करून घ्यावे लागतात. ते वाद्य आपलंसं करून घ्यावं लागतं. त्या वाद्याचा कशा प्रकारे उपयोग केला जातो, ते समजून घ्यावं लागतं. म्हणजे ‘तंबोरा’ हा गायनासाठी मूळ स्वर पुरवतो, त्यावर गाणं वाजवलं जात नाही. ‘गिटार’वर तयार झालेला रिदम गाण्यासाठी उपयोगी पडतो. ‘सतार’ वाजवून कोणी गाणं म्हणत नाही. (सिनेमात जरी दाखवलं जातं तरी). व्हायोलीन, बासरी ही वाद्यं गायनाच्या शैलीत वाजवली जातात, तर सतार, सरोद, संतूर अशी वाद्यं खास वादकांच्या तंत्रानंच वाजवतात. 

अशा गोष्टी माहित असणं जरूरीचं आहे. त्यामुळे आपली संगीतातील समज दिसून येते. शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आपल्या स्वत:च्या आनंदासाठी संगीताची आराधना करा. सरावातून आनंद मिळवा. थोडी थोडी का होईना आपल्यामध्ये प्रगती करण्याची तयारी ठेवा. स्वत:च्या आनंदासाठी गाताना, अभ्यासाचं टेंशन घ्यावं लागणार नाही. परंतु चार लोकांसमोर स्टेजवर गाताना मात्र तयारी असल्याशिवाय गायन - वादन सादर करू नका. सतत कान उघडे ठेवा. चांगलं – वाईट यांतला फरक तुमच्या कानांना कळू द्या. कानसेन व्हायला तर काहीच हरकत नाही ना....?

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search