Next
पं. हरिप्रसाद चौरसिया, चार्ल्स लॉटन, बिली वायलर, ऑलिव्हिया हॅवीलँड
BOI
Sunday, July 01, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

आपल्या तेजानं तळपणारा मणी या अर्थाने सूर्याला दिनमणी म्हटलं जातं. त्याप्रमाणेच आपल्या कार्यकर्तृत्वानं अनेक व्यक्ती विविध क्षेत्रांत झळकत असतात. अशा कर्तृत्ववानांचा त्यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं परिचय करून देणारं ‘दिनमणी’ हे सदर एक जुलै २०१७पासून ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर सुरू करण्यात आलं. ३० जून २०१८पर्यंतच्या वर्षभरात या सदरातून मराठी, इंग्रजीतील विविध साहित्यिकांचा थोडक्यात, पण जास्तीत जास्त सर्वसमावेशक परिचय करून देण्याचा प्रयत्न आम्ही केला. आजपासून (एक जुलै २०१८) या सदरात, भारतीय आणि इंग्लिश सिनेमामध्ये योगदान देणाऱ्या मंडळींचा परिचय करून दिला जाणार आहे. तसंच संगीतासह अन्य क्षेत्रांतल्या काही उल्लेखनीय व्यक्तींच्या कार्याचा पटही संक्षेपाने मांडण्यात येणार आहे. पहिल्या दिवसाचे मानकरी आहेत प्रख्यात बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया, चतुरस्र ब्रिटिश अभिनेता चार्ल्स लॉटन, ११ वेळा ऑस्कर नॉमिनेशन्स मिळवणारा श्रेष्ठ दिग्दर्शक बिली वायलर, वयाची शंभरी पूर्ण केलेली देखणी अभिनेत्री ऑलिव्हिया ड हॅवीलँड, डान्सिंग स्टार लेस्ली केरॉन आणि ज्येष्ठ अमेरिकन दिग्दर्शक सिडनी पोलॉक....
.............
पंडित हरिप्रसाद चौरसिया 
बासरी म्हटलं, की पं. हरिप्रसाद चौरसिया हेच नाव सर्वांत आधी आपल्या डोळ्यांसमोर येतं. एक जुलै १९३८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कुस्तीपटू होते आणि हरिप्रसाद यांनीही पुढे कुस्तीतच नावलौकिक मिळवावा, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु संगीताची आवड असलेल्या हरिप्रसादांनी वडिलांच्या नकळतच संगीताचा अभ्यास सुरू केला. ते एका मित्राच्या घरी संगीताचा सराव करत असत. वडिलांची इच्छा होती, म्हणून काही दिवस ते आखाड्यात जात राहिले. वयाच्या पंधराव्या वर्षापासून चौरसियांनी त्यांच्या घराजवळच राहणाऱ्या पंडित राजारामांकडून हिंदुस्थानी गायकीचे धडे घ्यायला सुरुवात केली. नंतर त्यांनी वाराणसीच्या पंडित भोलानाथ प्रसन्न यांच्याकडे बासरी शिकण्यास आरंभ केला. वेणुनादाने रसिकांचे कान तृप्त करणारे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ बासरीवादक पद्मभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया वास्तविक पैलवान व्हायचे; पण रसिकांच्या सुदैवाने नियतीच्या मनात वेगळेच होते आणि अद्वितीय असा बासरीवादक घडला.

बासरीवादनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आपल्या दमसासाचे श्रेय ते लहानपणी केलेल्या कुस्तीच्या तालमीला देतात. ‘माझ्या आईमुळे मी बासरीवादक झालो. लहानपणी आई मला जेवण भरविताना गाणी गुणगुणायची, मला अंगाई म्हणून झोपवायची. आईचे ते शब्द आणि सूर माझ्या मनात-डोक्यात कायम गुणगुणत राहिले. आईने माझे नावही ‘हरी’ ठेवले होते. याच ‘हरी’च्या हातात आईने बासरी दिली व मी पैलवान न होता बासरीवादक झालो,’ असं ते सांगतात. पंडितजींना आतापर्यंत संगीत अकादमी पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण असे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

पं. शिवकुमार शर्मा यांच्यासोबत ‘सिलसिला’ या हिंदी चित्रपटाला ‘शिव-हरी’ या नावाने दिलेले संगीत असो, जॉन मॅकलॉघलीन आणि जॅन गारबारेक यांसारख्या पाश्चिमात्य संगीतकारांबरोबर केलेले काम असो, ‘कॉल ऑफ दी व्हॅली’सारखा अनेक कलावंतांनी एकत्र येऊन केलेला प्रयोग असो वा गायन-बासरी, बासरी संतूर अशी जुगलबंदी करण्याची कल्पना असो.... या सगळ्यातून चौरसिया यांची प्रयोगशील वृत्ती दिसते आणि संगीताविषयीचे त्यांचे समर्पण हेच त्यांच्या यशाचे गमक असल्याची खात्री पटते.
.......

चार्ल्स लॉटन 
एक जुलै १८९९ रोजी स्कारब्रोमध्ये जन्मलेला चार्ल्स लॉटन हा चतुरस्र ब्रिटिश अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून प्रसिद्ध आहे. तरुणपणी ‘रॉयल अॅकॅडमी ऑफ ड्रामॅटिक आर्टस्’मधून प्रशिक्षण घेतल्यावर त्याने लंडनमध्ये रंगभूमीवर अनेक भूमिका गाजवल्या. पुढे त्याने सिनेमाची वाट धरली. ‘दी प्रायव्हेट लाइफ ऑफ हेन्री एट्थ’ ही त्याची भूमिका चांगलीच गाजली आणि त्याला अॅकॅडमी अॅवॉर्ड मिळालं. पाठोपाठ आलेल्या ‘म्युटिनी ऑन दी बाउन्टी’मधल्या त्याच्या कॅप्टन ब्लायच्या भूमिकेलाही लोकांची पसंती मिळाली. यासाठी त्याला ऑस्कर नॉमिनेशन मिळालं होतं. त्याने दिग्दर्शित केलेला ‘नाइट ऑफ दी हंटर’ सिनेमा गाजला आणि नंतर १९६० सालच्या ‘स्पार्टाकस’मधला त्याचा अभिनयही उल्लेखनीय ठरला. ‘दी बॅरेट्स ऑन दी विम्पल स्ट्रीट’, ‘दी हंचबॅक ऑफ नोत्रडेम’, ‘दी बिग क्लॉक’ हे त्याचे गाजलेले सिनेमे. भूमिका कुठलीही असो तो आपली छाप पडून जाई. १५ डिसेंबर १९६२ रोजी त्याचा कॅलिफोर्नियामध्ये मृत्यू झाला.
........

विल्यम वायलर
एक जुलै १९०२ रोजी मिलहाउसमध्ये (फ्रान्स) जन्मलेला विल्यम ऊर्फ बिली वायलर अमेरिकेचा श्रेष्ठ दिग्दर्शक आणि पटकथालेखक म्हणून प्रसिद्ध आहे. माणसांमधले नातेसंबंध अतिशय तरल पद्धतीनं मांडणारा आणि ते करत असताना उत्तम तांत्रिक सफाईनं सिनेमा काढणारा दिग्दर्शक असा त्याचा लौकिक होता. गाजलेल्या कथा-कादंबऱ्यांवर त्याने काढलेले सिनेमेही गाजले. दिग्दर्शनासाठी त्याला तब्बल ११वेळा  ऑस्कर नॉमिनेशन्स मिळाली होती आणि तीन वेळा ऑस्करचा बहुमानसुद्धा. ‘बेनहर’, ‘दी बेस्ट इयर्स ऑफ अवर लाइफ’, ‘दी मिनिव्हर’, ‘वदरिंग हाइट्स’, ‘रोमन हॉलिडे’, ‘दी डेस्परेट अवर्स’, ‘दी एअरेस’, ‘डिटेक्टिव्ह स्टोरी’, ‘दी बिग कंट्री’, ‘दी लेटर’ - हे त्याचे गाजलेले सिनेमे! चार्ल्टन हेस्टन, लॉरेन्स ऑलिव्हिए, बेट्टी डेव्हिस, गॅरी कूपर, ऑड्री हेपबर्न, ग्रेगरी पेक यांच्यासारख्यांनी त्याच्या सिनेमातून भूमिका गाजवल्या होत्या. २७ जुलै १९८१ रोजी त्याचा कॅलिफोर्नियामध्ये मृत्यू झाला. 
.......
ऑलिव्हिया ड हॅवीलँड
एक जुलै १९१६ रोजी जपानमध्ये जन्मलेली ऑलिव्हिया ड हॅवीलँड ही गेल्या शतकाच्या मध्यातल्या, ज्याला क्लासिक हॉलिवूड म्हटलं जातं, त्या काळातली आणि वयाची शंभरी पूर्ण केलेली देखणी अभिनेत्री. तिची आई रंगभूमीवरची अभिनेत्री होती आणि आईमुळेच तिला अभिनयाची आवड उत्पन्न झाली. सुरुवातीला तिने ‘अॅलीस इन वंडरलँड’, ‘ए मिडसमर नाइट्स ड्रीम’ यांसारख्या नाटकांतून भूमिका केल्या. पुढे तिची ‘अॅडव्हेंचर्स ऑफ रॉबिनहूड’मधून एरॉल फ्लिनबरोबर जोडी जमली आणि त्यांनी अनेक सिनेमे एकत्र गाजवले. ‘गॉन विथ दी विंड’, ‘टू इच हिज ओन’, ‘दी स्नेक पिट’, ‘दी एअरेस’ हे तिचे सिनेमे आणि भूमिका तुफान गाजल्या. तिला कारकिर्दीत दोन ऑस्कर आणि एका गोल्डन ग्लोबसह अभिनयाचे इतर चार मानाचे पुरस्कार मिळाले होते. सध्या ती पॅरिसमध्ये राहते. 
.......

लेस्ली केरॉन
एक जुलै १९३१ रोजी पॅरिसमध्ये जन्मलेली लेस्ली केरॉन ही डान्सिंग स्टार म्हणून प्रसिद्ध होती. ‘अॅन अमेरिकन इन पॅरिस’हा जीन केलीबरोबरच तिचा प्रचंड गाजलेला सुपरहिट सिनेमा! ‘जीजी’ या रोमॅन्टिक म्युझिकल फिल्ममुळे तिने जगभरच्या लोकांची मनं जिंकली होती. ‘लिली’, ‘फॅनी’, ‘दी एल शेप्ड रूम’, ‘फादर गुज’ आणि ‘लॉ अँड ऑर्डर : स्पेशल व्हिक्टिम्स युनिट’ हे तिचे इतर गाजलेले सिनेमे. तिला गोल्डन ग्लोब, ब्रिटिश अॅकॅडमी अवॉर्ड, एमी असे पुरस्कार मिळाले आहेत. तिने अमेरिकेचं नागरिकत्व पत्करलं आहे. 
......

सिडनी पोलॉक
एक जुलै १९३४ रोजी इंडियानामध्ये जन्मलेला सिडनी पोलॉक हा ज्येष्ठ अमेरिकन दिग्दर्शक आणि अभिनेता आहे. अभिनयाचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेल्या पोलॉकने हॉलिवूडमध्ये मात्र दिग्दर्शक म्हणून मोठी कामगिरी केली. १९८५ सालचा ‘आउट ऑफ आफ्रिका’ हा मेरिल स्ट्रीप आणि रॉबर्ट रेडफोर्डला घेऊन त्याने दिग्दर्शित केलेला नितांतसुंदर सिनेमा. तब्बल ११ ऑस्कर नॉमिनेशन्स मिळालेल्या या सिनेमाने सात ऑस्कर्स पटकावले होते. ‘दे शूट हॉर्सेस, डोन्ट दे? ’, ‘टूट्सी’, ‘दी वे वुई वर’, ‘थ्री डेज ऑफ दी कॉन्डॉर’, ‘हवाना’, ‘अॅब्सेंस ऑफ मॅलीस’, ‘दी इंटरप्रिटर’ असे त्याचे गाजलेले इतर सिनेमे. २६ मे २००८ रोजी त्याचा कॅलिफोर्नियामध्ये मृत्यू झाला.
...............

यांचाही आज जन्मदिन :
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक : एक जुलै १९१३ - १८ ऑगस्ट १९७९
विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू : एक जुलै १९४९
माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस : एक जुलै १९५० (डॉ. सबनीस यांच्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link