Next
यम म्हणतो, ‘गाडी चालवताना तुमचा फोन मलाही येऊ शकतो!’
नाशिकमधील निवृत्त अधिकाऱ्याकडून अनोख्या पद्धतीने जनजागृती
BOI
Saturday, July 13, 2019 | 02:57 PM
15 0 0
Share this article:

नाशिक : ‘हॅलो. मी यम बोलतोय. गाडी चालवताना तुमचा फोन मलाही येऊ शकतो...’ असे बोल प्रत्यक्ष ऐकू आले तर...? गाडी चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्यांच्या डोळ्यांत चांगलेच अंजन घातले जाईल की नाही! नाशिक रोड येथील निवृत्त अधिकारी मिलिंद पगारे यांनी वाहनचालकांमध्ये जागृती करण्यासाठी हीच शक्कल लढवली आहे. यमाच्या वेशभूषेत सिग्नलवर उभे राहून स्पीकरच्या साह्याने आणि गळ्यातील बोर्डांच्या साह्याने ते जनजागृती करत आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून पगारे नाशिक रोड येथील बिटको सिग्नलवर (जेल रोड) यमासारख्या वेशभूषेत उभे राहून वाहन चालवताना मोबाइलवर न बोलण्याबद्दल जागृती करत आहेत. मोबाइल कानाला लावून दुचाकी चालवणारे अनेक जण दिसतात. तसेच, एका हातात मोबाइल आणि एका हातात स्टिअरिंग व्हील धरून चार चाकी गाडी चालवणारेही अनेक जण दिसतात. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून, सुमारे पन्नास टक्के अपघात मोबाइल वापरल्यामुळे होतात, असा निष्कर्ष एका आंतरराष्ट्रीय संस्थेने काढला आहे.

ही परिस्थिती पाहून मिलिंद पगारे यांनी जनजागृतीचा ध्यास घेतला. यमासारखी वेशभूषा करून त्यांनी गळ्यात आणि पाठीला बोर्ड चिकटवले आहेत. पगारे यांनी गळ्यात स्पीकर लटकवला असून, ‘गाडी चालवताना मोबाइल वापरू नका’ अशा घोषणा ते देत आहेत. गेल्या काही  दिवसांपासून ते सकाळी दहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत जनजागृती करत आहेत. त्यांना पाहायला गर्दी होत आहे. पोलीस विभागानेही त्यांच्या या जनजागृतीचे कौतुक केले आहे. 

निवृत्तीनंतर काही ज्येष्ठ नागरिकांना घरात राहून काय करावे हे समजत नाही; मात्र मिलिंद पगारे यांनी वाहतूक जनजागृतीचा वसा घेतल्यामुळे अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि नाशिक शहरातील व्यक्ती त्यांच्या कार्याला सलाम करत आहेत.

‘अनेक अपघात मोबाइल वापरल्यामुळे होत आहेत. ही परिस्थिती बदलावी, यासाठी मी रस्त्यावर उतरून जनजागृती करीत आहे,’ असे मिलिंद पगारे यांनी म्हटले आहे.



 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search