Next
जीवसृष्टीच्या सहा आश्चर्यांवर गुगलचे डूडल
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वैशिष्ट्यपूर्ण सजीवांवर प्रकाशझोत
BOI
Monday, April 22, 2019 | 04:24 PM
15 0 0
Share this article:


आज (२२ एप्रिल) जागतिक वसुंधरा दिन. आपली वसुंधरा म्हणजेच पृथ्वीवर वैविध्यपूर्ण आणि वैचित्र्यपूर्ण जीवसृष्टी आहे. त्यापैकी सहा वैशिष्ट्यपूर्ण सजीवांची ओळख करून देणारे बोलके डूडल गुगलने आजच्या दिवसाचे औचित्य साधून केले आहे. पृथ्वीवरची सजीवसृष्टी म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेली देणगी असून, त्यातील प्रत्येक घटक कसा एकमेवाद्वितीय आणि आश्चर्यचकित करणारा आहे आणि या घटकांमध्ये किती विविधता आहे, याची छोटी झलक या डूडलमधून दाखवण्यात आली आहे. 

सर्वांत मोठा पंखविस्तार असलेला ‘वँडरिंग अल्बट्रॉस’ पक्षी :
‘गुगल’वर गेल्यानंतर दिसणाऱ्या डूडलवर क्लिक केल्यावर पहिली स्लाइड आहे वँडरिंग अल्बट्रॉस या समुद्रपक्ष्याविषयीची. ही प्रजात जगातील मोठ्या पक्ष्यांपैकी एक असून, पृथ्वीवर सध्या अस्तित्वात असलेल्या पक्ष्यांपैकी या पक्ष्याच्या पंखांचा विस्तार (विंगस्पॅन) सर्वाधिक आहे. हा विस्तार अडीच मीटरपासून साडेतीन मीटरपर्यंत म्हणजेच कमीत कमी आठ फुटांपासून साडेअकरा फुटांपर्यंत असू शकतो. त्यामुळेच हा पक्षी शेकडो मैलांचे अंतर पंख न फडफडवताही हवेत तरंगत राहू शकतो. या प्रजातीचे काही पक्षी अंटार्क्टिक समुद्राला वर्षातून तीन वेळा संपूर्ण प्रदक्षिणा घालतात, अशी नोंद आहे. या प्रदक्षिणांवेळी एकूण एक लाख २० हजार किलोमीटर एवढे अंतर त्यांच्याकडून पार केले जाते.

सर्वांत उंच असलेली ‘कोस्टल रेडवूड’ झाडे :
डूडलच्या दुसऱ्या स्लाइडमध्ये आपल्याला दिसते कोस्टल रेडवूड नावाचे सदाहरित झाड. कॅलिफोर्नियात आढळणारी ही जगातील सर्वांत उंच झाडे असून, त्यांची उंची सुमारे ३७७ फूट असते. म्हणजे एकावर एक अशी ७५ माणसे उभी केली, तर त्यांच्या उंचीएवढे हे झाड असेल. या झाडांच्या खोडाचा व्यास २९.२ फुटांपर्यंत असू शकतो. या जातीची झाडे पृथ्वीवर १२०० ते १८०० वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असल्याने सर्वांत जुन्या सजीवांमध्येही यांचा समावेश होतो. 

नाण्याच्या आकाराचा बेडूक – पेडोफ्राइन :
तिसऱ्या स्लाइडमध्ये भेटीला येते पेडोफ्राइन अमॉएन्सिस ही बेडकाची प्रजात. केवळ ७.७ मिलिमीटर एवढ्या लांबीचा, नाण्याएवढ्या आकाराचा हा बेडूक पृथ्वीवरील ज्ञात प्राण्यांपैकी सर्वांत लहान पृष्ठवंशीय (पाठीचा कणा असलेला) प्राणी आहे. ही प्रजात पापुआ न्यू गिनीमध्ये आढळते.

भव्य पानांची अॅमेझॉन वॉटर लिली :
डूडलच्या चौथ्या स्लाइडमध्ये अॅमेझॉन वॉटर लिली नावाची पाणवनस्पती दिसते. वॉटर लिलीच्या प्रजातींमधील ही सर्वांत मोठी वनस्पती असून, तिची पाने विशाल असतात. त्यांचा व्यास सुमारे तीन मीटरपर्यंत (९.८ फूट) असू शकतो, तर त्यांचा पाण्यात बुडालेला देठ सात ते आठ मीटर (२३ ते २६ फूट) लांब असू शकतो. या पानावर एखादा लहान चणीचा मनुष्य किंवा छोटे बाळ नक्की बसू शकते, एवढे हे पान मोठे असते. 

डायनोसॉरच्या काळापासून अस्तित्वात असलेली माशाची प्रजात :
पाचव्या स्लाइडमध्ये दिसतो सीलाकँथ नावाचा मासा. सुमारे ४० कोटी वर्षांपासून म्हणजेच डायनॉसोर होते त्या काळापासून अस्तित्वात असलेली ही माशाची प्रजात आहे. आफ्रिकेचा पूर्व किनारा, इंडोनेशिया, तसेच हिंदी महासागरातही ही प्रजात आढळते. यातील काही जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. 

सर्वांत खोल राहणारे प्राणी – स्प्रिंगटेल :
जॉर्जियामधील क्रुबेरा-व्होरोन्जा या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वांत खोल गुहेत आढळलेल्या स्प्रिंगटेल या प्राण्याच्या प्रजातीला डीप केव्ह स्प्रिंगटेल असे म्हणतात. जगातील सर्वांत खोलीवर राहणारा प्राणी अशी त्याची ओळख असून, १९८० मीटर (६५०० फूट) खोलीपर्यंत त्यांचा वावर आढळला आहे. या प्राण्याची ओळख शेवटच्या स्लाइडमध्ये होते. 

वसुंधरा किती आश्चर्यांनी नटलेली आहे, याची कल्पना येणारी मोजकीच आश्चर्ये या डूडलमध्ये दिली असल्याचे गुगलने म्हटले आहे. ही सजीवसृष्टी जपण्याच्या मानवाच्या जबाबदारीची आठवण गुगलने या माध्यमातून करून दिली आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search