Next
दुष्काळग्रस्त भागातील संस्थांची दिवाळी ‘अंकुर’च्या उपक्रमामुळे सुखद
‘देणे समाजाचे समाजासाठी’ उपक्रमाची दशकपूर्ती
BOI
Friday, November 02, 2018 | 11:38 AM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘आहे रे’ व ‘नाही रे’ या वर्गांमधील दरी कमी करण्याच्या दृष्टीने व सामाजिक संस्थांची दिवाळी आनंदाने साजरी व्हावी, या उद्देशाने दिवाळीच्या आधी ‘देणे समाजाचे समाजासाठी’ हा उपक्रम पुण्यातील अंकुर प्रतिष्ठानच्या वतीने गेली नऊ वर्षे आयोजित केला जातो. यंदा दशकपूर्तीच्या वर्षी या उपक्रमामधून लातूर, उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर, नाशिक, कळम, भूम, अहमदनगर, नेरळ, मेळघाट, रत्नागिरी, बीडसह अन्य काही दुष्काळग्रस्त भागातील संस्थांना भरघोस मदत करण्यात आली. 

या उपक्रमाला दर वर्षीप्रमाणे याही वर्षी अत्यंत चांगला व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांकडून सुमारे अडीच लाख वस्तूंचे संकलन झाले. त्यात प्रामुख्याने धान्य, कपडे, खेळणी, पर्सेस, चालू इलेक्ट्रानिक वस्तू (लॅपटॉप, मोबाइल, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लिनर, हीटर, गीझर) इत्यादींचा समावेश होता. दागिने, फर्निचर, त्याशिवाय फराळ, चॉकलेट्स , बिस्किटे, कॅडबरी, दिवाळीचे नवीन साहित्य हेही मदत म्हणून देण्यात आले. चालू स्थितीतील सनी गाडीदेखील या वर्षी या उपक्रमात भेट म्हणून मिळाली.


या वस्तूंचे संकलन १९ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले होते. २८ ऑक्टोबर २०१८ रोजी एका कार्यक्रमात संस्थांना मोफत वितरण करण्यात आले. ‘सीड इन्फोटेक’च्या संचालिका भारती बऱ्हाटे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. हा उपक्रम पाहून त्या खूपच भारावल्याचे त्यांनी सांगितले. कल्पनेपेक्षा हा खूपच वेगळा उपक्रम असल्याचे व खूपच आवडल्याचे सांगितले. या उपक्रमाची समाजाला नितांत गरज असून, त्यात सक्रिय सहभाग घ्यायला निश्चित आवडेल असे सांगून, त्यांनी गरजू संस्थांमधील विद्यार्थ्यांना ‘अंकुर’च्या माध्यमातून ‘सीड इन्फोटेक’तर्फे कोर्सेस उपलब्ध करून देऊ, असेही जाहीर केले.

महेशराव करपे यांनी उपक्रमाला शुभेच्छा तर दिल्याच. स्वत: त्या उपक्रमात सहभागी असल्याबद्दल अभिमान असल्याचे सांगून, हा उपक्रम अनेक नागरिक व संस्था यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ते स्वत: प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. उपक्रमातील सातत्याबद्दल कुलदीप सावळेकर व ‘अंकुर’चे त्यांनी विशेष कौतुक केले.

संस्थेचे अध्यक्ष कुलदीप सावळेकर प्रास्ताविकाच्या वेळी म्हणाले, ‘दशकपूर्तीचा आनंद तर आहेच; पण अजूनही समाजातील दोन आर्थिक स्तरांमधीलल लोकांमध्ये खूप मोठी दरी आहे. १० वर्षांनंतरही अशा उपक्रमांची तेवढीच गरज भासते.’ त्यांनी उपक्रमाचा आजवरचा प्रवास सर्वांसमोर मांडला. लोकांनी दिलेल्या वस्तू स्वरूपातील व आर्थिक मदतीबद्दल आभार मानताना संस्था प्रतिनिधींच्या चेहऱ्यांवरील आनंद खूप समाधान देऊन जातो, असेही ते म्हणाले. 

सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिकांनी प्रत्यक्ष येऊन वस्तू दिल्या. पुण्यातील तळजाई, सहकारनगर व महात्मा सोसायटी येथून त्यांनी संस्थेच्या वतीने जमविलेले साहित्य टेम्पोने आणण्यात आले, असेही सावळेकर यांनी सांगितले. ‘सेवा सहयोग’ने दिलेल्या कापडी पिशव्या साहित्य देण्यासाठी आलेल्या नागरिकांना कृतज्ञता म्हणून देण्यात आल्या. लोकमान्य मल्टिपर्पज, जनता सहकारी बँक, दिशा परिवार यांचा या वर्षी सक्रिय सहभाग होता.


महापौर मुक्ता टिळक, सुशील मेंगडे, अभिनेत्री विभावरी देशपांडे यांसह अनेक मान्यवरांनी आवर्जून उपक्रमाला भेट दिली आणि आयोजकांचे कौतुक करून हा उपक्रम सुरूच ठेवण्याचे आवाहन केले. या वेळी स्थानिक नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व माधुरी सहस्रबुद्धे उपस्थित होत्या. त्यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. बापू घाटपांडे, महेशराव करपे, महेश पाटणकर, ललित राठी, मुकुंद शिंदे, मनीष घोरपडे, ‘लोकमान्य मल्टिपर्पज’चे हर्षल झोगडे व सहकारी, ‘जनता सहकारी’चे पदाधिकारी, चंद्रभागा पतसंस्थेचे पदाधिकारी हेदेखील या वेळी उपस्थित होते.
 
‘अंकुर’चे दातेकाका, सुनीती जोशी, सरोज जोशी, सुप्रिया सावळेकर, लीलावती पाटणकर, माधुरी कुलकर्णी व श्री. कुलकर्णी, श्री. व सौ. बीडकर, विनायक व अर्चना गोगटे, मंगेश व शलाका इनामदार, संगीता शेवडे, नीता शिंदे, वैशाली वेदपाठक, वैभव वेदपाठक, नीता भालेकर, रमेश चव्हाण, किरण देखणे, नेहल शहा, बागडेमामा हे उपक्रमासाठी अहोरात्र कार्यरत होते. तसेच साहित्य द्यायला येणाऱ्या मंडळींनादेखील त्यांनी मदतीचा हात पुढे केला. अगदी साहित्याची ने-आण करण्यासाठी स्वत:ची गाडी उपलब्ध करून देण्यापासून हे सर्व जण उपक्रमात सहभागी झाले.

शंतनू खिलारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रातिनिधिक पाच संस्थांना वस्तूंचे वाटप करताना त्या संस्थांची माहिती मीताली सावळेकर यांनी सांगितली. राज तांबोळी यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search