Next
मूल वयात येताना..
BOI
Saturday, May 05 | 06:45 AM
15 0 0
Share this story


शाळेच्या क्रिकेट टीममधून त्याने स्वतःहूनच आपलं नाव काढून घेतलं होतं. मित्र-मैत्रिणींमध्ये मिसळणं, खेळणं बंद करून टाकलं होतं. हे सगळं का घडतंय..? तो असं का वागतोय.? हे जाणून घेण्याचा सनीच्या आई-वडीलांनी खूप प्रयत्न केला होता; पण सनी कधी उत्तर देणं टाळायचा, तर कधी उडवा-उडवीची उत्तरं द्यायचा... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या वयात येत असलेल्या मुलांच्या वर्तन समस्येबद्दल...
...................................
सनी नुकताच आठवीत चांगल्या गुणांनी पास होऊन आता नवव्या इयत्तेत आला होता. शाळा सुरू होऊन तीन-चार महिने झाले होते; पण आठवीच्या शेवटच्या काही महिन्यांपासूनच त्याचं वागणं बदललं होतं. शाळेच्या क्रिकेट टीममधून त्याने स्वतःहूनच आपलं नाव काढून घेतलं होतं. मित्र-मैत्रिणींमध्ये मिसळणं, खेळणं बंद करून टाकलं होतं. हे सगळं का घडतंय..? तो असं का वागतोय.? हे जाणून घेण्याचा सनीच्या आई-वडीलांनी खूप प्रयत्न केला होता; पण सनी कधी उत्तर देणं टाळायचा, तर कधी उडवा-उडवीची उत्तरं द्यायचा. तो काहीच बोलेना म्हणून मग आई-वडील शाळेत जाऊन शिक्षकांना व त्याच्या काही मित्रांना भेटून आले. तिथेही तो तसंच वागत असल्याचं समजलं. यामागचं कारण काही कळत नव्हतं, त्यामुळे आई-वडिलांना आता सानीची काळजी वाटायला लागली. या सगळ्यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे, या उद्देशानं त्यांनी सनीला समुपदेशनासाठी नेण्याचं ठरवलं.

सुरुवातीला ते दोघंच भेटायला आले. त्यांनी सनीमध्ये झालेले अगदी छोटे छोटे बदल उदाहरणं देऊन सांगितले. त्यांच्या बोलण्यातून काळजी, भीती, प्रेम अशा सगळ्या भावना स्पष्टपणे जाणवत होत्या. त्यातही, ‘शाळेत मोठ्या मुलांनी त्याला काही केलं नसेल ना..? त्याच्यावर रॅगिंग वैगरे झालं नसेल ना? तसं काही असेल, तर काय करायचं’, अशी भीती सनीची आई वारंवार व्यक्त करत होती. या सगळ्या प्रश्नांपैकी कशाचंच उत्तर सध्या माहित नव्हतं. त्यामुळे आईला आधी शांत करून सनीला भेटायला पाठवा, असं सांगितलं. सुरुवातीला ठरवलेल्या दिवशी सनी भेटायला आलाच नाही. ‘तो भेटायला येण्यासाठी घाबरतो आहे’, असं त्याच्या आईने सांगितल्यावर दोन दिवसांनी त्या दोघांनाच त्याला घेऊन येण्याचं सुचवलं. त्याप्रमाणे ते प्रयत्नपूर्वक त्याला घेऊन आले.

आई-बाबा त्याला घेऊन आल्यावर सनीची भीती कमी होण्यासाठी आणि त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी आधी तिघांशी थोडा वेळ चर्चा केली. या चर्चेत सनी विशेष सहभागी झाला नाही. पण आम्ही काय बोलत होतो याकडे त्याचे पूर्ण लक्ष होते. थोड्या वेळाने आई-बाबांना बाहेर जायला सांगून सनीशी बोलायला सुरुवात केली. आई-बाबा बाहेर गेल्यावर सनी जरा कावरा-बावरा झाला. मग त्याला विश्वास वाटेल, मोकळेपणानं बोलावंसं वाटेल अशा दृष्टीने त्याच्याशी चर्चा केली. 

चर्चेदरम्यान तो केवळ दोनंच वाक्य बोलला, ‘मी खूप वाईट आणि घाणेरडा मुलगा आहे. मला स्वतःची लाज वाटते.’ याव्यतिरिक्त तो सत्रात काहीच बोलला नाही. मात्र यादरम्यान तो सतत एक कृती करत होता. त्याचा टी-शर्ट तो सारखा खाली खेचत होता. नजरेला नजर मुळीच देत नव्हता. सत्र संपवल्यावर तो बाहेर गेला आणि पाच मिनिटांनी दार वाजवून पुन्हा आत आला. ‘मी परत भेटायला आलो, तर चालेल का.? मला तुमच्याशी खूप बोलायचंय, पण प्लीज आई-बाबांना यातलं काही सांगू नका. प्लीज..’, असं तो म्हणाला. त्याला, ‘तू बोलशील ते गोपनीय राहील हे पक्कं समज, असं सांगितल्यावर तो पुढची वेळ निश्चित करून गेला. 

या वेळी ठरल्याप्रमाणे तो स्वत:हून आला आणि मोकळेपणाने बोललाही. त्याला स्वतःचा राग येत होता. घृणा वाटत होती. स्वतःच्या शरीरात, मनात आणि भावनांमध्ये होणाऱ्या बदलांचा अर्थच त्याला उमगत नव्हता. ‘मला आजकाल मुलींशी सारखं बोलावंसं वाटतंय. सिनेमातले ‘रंजक सीन्स’ परत परत पाहावेसे वाटतात. परंतु ते पहिले, की काही शारीरिक बदल होत असल्याची जाणीव होते. सतत ते आणि तेच विचार मनात येतात. यात माझी चूक आहे. मी ही इतर मुलांसारखा वाईट वळणाला लागलोय. आता मी कधीच सुधारू शकणार नाही. मी माझ्या आई-वडिलांची स्वप्नं आता कधीच पूर्ण करू शकणार नाही’, असं सगळं तो बोलून गेला. या अशा अनेक विचार आणि भावनांमुळे त्याला स्वतःचा खूप राग आला होता.

त्याचं हे सारं बोलणं ऐकल्यावर समस्या आपोआपच उघड झाली. या सगळ्या गोष्टी त्यांच्या मागची शास्त्रीय कारणं, त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन असं सगळं त्याला नीट  समजावून सांगितलं. त्याच्यात होणाऱ्या सर्व शारीरिक, मानसिक, भावनिक बदलांचा अर्थ त्याला उलगडून सांगितला. त्याबाबत त्याने अनेक शंकाही अगदी मोकळेपणाने विचारल्या. ह्या साऱ्या बदलांना प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला या (टीन एज) वयात सामोरं जावं लागतंच आणि हे नैसर्गिक बदल अनिवार्य आणि महत्त्वाचे आहेत, हे समजल्यावर मात्र तो एकदम शांत झाला. आता परत पूर्वीसारखंच वागण्याचं आश्वासन त्याने स्वतःहूनच दिलं. आता स्वतःमधील सगळे बदल त्याने मनापासून आणि आदरपूर्वक स्वीकारले होते. 

(केसमधील नावे बदलली आहेत.) 

- मानसी तांबे-चांदोरीकर 
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत.)

(दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link