Next
केनियातल्या दिवाळीतली मौज
BOI
Thursday, November 08, 2018 | 10:00 AM
15 0 0
Share this article:

२००० ते २००५ या कालावधीत आफ्रिकेतील केनिया देशातल्या वास्तव्यादरम्यान मेघा घांग्रेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी साहजिकच तिथली दिवाळीही अनुभवली. तिथल्या दिवाळीतल्या मौजमजेचे त्यांनी केलेले हे स्मरणरंजन...
................
आम्ही साधारणपणे २००० ते २००५ या कालावधीत पूर्व आफ्रिकेतील केनिया देशाच्या राजधानीचे शहर असलेल्या नैरोबीमध्ये वास्तव्याला होतो. माझ्या यजमानांची कंपनीतर्फे बदली झाल्यामुळे तेथे राहण्याचा योग आला होता; अन्यथा त्या काळात आफ्रिकेत कुणी सहज म्हणून नक्कीच जात नव्हते. आताही तिकडे जाणारे तसे कमीच; पण जंगल सफारीच्या निमित्ताने मसाईमारा आणि अन्य जंगलांमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसते. 

आम्ही ज्या काळात तेथे राहत होतो, तेव्हा मोबाइलचा वापर रूढ झाला नव्हता. नैरोबीहून आम्ही आयएसडी  बूथवर जाऊन जेव्हा भारतात फोन करत असू, तेव्हा फोन लागणे हा आमच्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण असे, एवढी अवस्था होती. आता तुम्ही म्हणाल, की ही एवढी प्रस्तावना कशासाठी... तर जेव्हा एखादा फोन लागणे हे इतके कठीण होते, तर मग तिथे आपला सण साजरा करणे किती कठीण असेल, असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. अगदी असेच आम्हाला, आमच्या घरातील सर्वांना, मित्र-मैत्रिणींना वाटले होते. ‘आता कसे ग होणार तुमचे’ अशाच सर्वांच्या भावना होत्या; पण गंमत अशी झाली, की नैरोबीला अतिशय कार्यरत असणारे महाराष्ट्र मंडळ आणि आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहत होतो, तेथील सर्वच भारतीय यांच्यामुळे आमची फक्त दिवाळीच नव्हे, तर सर्वच सण इतके दणक्यात व्हायचे, की कदाचित आपण भारतातही इतके दणक्यात साजरे करत नसू. 

आमच्या सोसायटीमध्ये राहणारी बहुतेक मंडळी तेथे अनेक पिढ्या राहणारी गुजराती कुटुंबे होती. या कुटुंबांची खासियत अशी, की त्या सर्वांचेच एक पाऊल नैरोबीत तर दुसरे लंडनला असायचे. यावरून तुम्ही त्यांच्या राहण्याच्या ‘स्टाइल’ची कल्पना करू शकता. अर्थात कितीही आधुनिक असले, तरी ते आपले सण मात्र अतिशय उत्साहाने साजरे करताना दिसतात. ते लोक दिवाळीचे लक्ष्मीपूजन करतात; पण त्यापेक्षा दुसऱ्या दिवशीचा पाडवा अधिक उत्साहाने साजरा करतात. त्यांच्या वर्षाचा पहिला दिवस असतो ना तो. मला काही त्याची एवढी कल्पना नव्हती आणि तिथेच सगळी धम्माल आली.

सोसायटीतील बहुतेक सगळे जण अगदी सकाळी दहा वाजल्यापासून आमच्याकडे ‘साल मुबारक’ करायला मिठाईचे बॉक्सेस घेऊन येऊ लागले. आता त्यांनाही मी काहीतरी देणे गरजेचे होते; पण मी आपले चकली, चिवडा, लाडू यांचे ताट मध्यभागी ठेवले होते. त्यांना ते आवडले असले, तरी त्यांना तेवढेच नक्कीच अपेक्षित नव्हते. कारण बाकीच्या त्यांच्या लोकांकडून त्यांना जशी काही तरी ‘रिटर्न गिफ्ट्स’ मिळाली होती, तसे काही तरी अर्थात ‘टोकन’ स्वरूपात देणे अपेक्षित होते. मला हे माहीत नसल्यामुळे मी काही दिलेले नव्हते. नंतर मी शेजारच्या आंटीकडे गेले, तेव्हा त्याचा मला उलगडा झाला आणि मला पार लाजल्यासारखे झाले. त्यांनी कुणीही मला तसे जाणवू दिले नव्हते, ही गोष्ट निराळी; पण इतके सगळे जण घरी आल्यामुळे मला आपण घरापासून लांब आहोत, असे अजिबातच वाटले नाही हे मात्र खरे. 

परदेशात साधारणपणे आपले सण रविवारी साजरे करायची पद्धत आहे. कारण आपल्या सणांची जशी आपल्या देशात सुट्टी असते, तशी तिथे नसल्यामुळे अशी पद्धत पडलेली दिसते. त्याप्रमाणे पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज व त्याच दिवशी रविवार असल्यामुळे महाराष्ट्र मंडळात सण साजरा करायचे ठरले होते. मंडळात गाण्याचा कार्यक्रम ठरला होता आणि त्यानंतर फराळ व जेवण. गाण्याच्या कार्यक्रमात आमच्यासारखे हौशी कलाकार होते, तरी आम्ही जोरात तयारी केली असल्यामुळे कार्यक्रम उत्तम होणार याची खात्री होती. अर्थात तसाच तो झालाही. कधी नव्हे ती मी भारी जरीची साडी भारतामधून मागवली होती. सासूबाईंनीदेखील मोठ्या कौतुकाने फराळाच्या जिन्नसांबरोबर अतिशय सुंदर साडी पाठवली होती. आम्ही सगळ्यांनी रंगही ठरवले होते. दिवाळी हा रंगांचा सण, तो तसाच साजरा करायचा होता, म्हणून हा अट्टाहास. 

महाराष्ट्र मंडळात दिवाळी आणि गणपती अशा दोन्हीही सणांना बहुतेक सगळे सभासद आवर्जून हजर राहत. त्यामुळे मग काय विचारता! खूप धम्माल मस्ती करत हाही दिवस गेला. हो आणि संध्याकाळी तिथे शहराच्या सीमेजवळ असणाऱ्या एका मोठ्या ग्राउंडवर सगळे जण (ज्यांची मुले लहान होती, ते तर अगदी आवर्जून) फटाके उडवायला गेलो. आमचा मुलगा लहान असल्यामुळे आम्ही आमच्याबरोबर फटाके घेऊन गेलो. तिकडे आपल्याकडील फटाके उडवायला तर मिळतातच; पण काही जण मुद्दाम सगळ्यांसाठी रोषणाईचे फटाके उडवतात. आकाशातील ही रंगांची उधळण अतिशय सुंदर दिसते. नंतर पुढील जितकी वर्षे आम्ही तिकडे होतो, तेव्हा ही उधळण पाहायला जातच असू. 

आपले नातेवाईक आपल्या जवळ नाहीत याची खंत मनातल्या कोपऱ्यात असली, तरी तेथे असणाऱ्या आपल्यांनी ती बरीच कमी केली, हे मात्र नक्की. पुढे सगळेच सण आम्ही असेच उत्साहात साजरे करत राहिलो. गणपती उत्सव तर ‘क्या कहने’ अशा पद्धतीने नेहमीच साजरा केला जात असे. आम्ही सर्वच जण अंगातील सर्व कलागुणांना संधी देण्याचा मनापासून प्रयत्न करत असू. कधी हसू, तर कधी मजा करत एकंदरीत रंग भरण्याचा प्रयत्न करत असू. 

मला वाटते इतरही बाहेरच्या देशांत याहून निराळे काही नसावे. शेवटी माणसाची आनंद मिळवण्याची वृत्ती तो कुठेही गेला तरी बदलत नाही, हे सत्य आहे. मग तो आपल्या देशात राहून असो वा परदेशात... नाही का?

संपर्क : मेघा घांग्रेकर, पुणे
मोबाइल : ९८२३१ ९२४३६
ई-मेल : gmegha1969@gmail.com

(‘आठवणीतली दिवाळी’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी https://goo.gl/riz56x या लिंकवर क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dr.Mrs.Swati R. Dixit. About 343 Days ago
khup chan megha!!ashich varnana ajun vachanyacha amhala anand deshilach !
0
1
Pratibha kasar_ Kandalkar About 344 Days ago
Tuza lekh vachun Diwali tumhi kashi sajri keli asel yache chitra ch dolyasamor ubhe rahile. Mastch lekh. Happy Diwali Megha to u & ur Family.
0
0

Select Language
Share Link
 
Search