Next
‘यह महान दृश्य है.. चल रहा मनुष्य है..’
BOI
Saturday, May 05, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this story

आयुष्यात पाहिलेला सर्वांत सुंदर, अप्रतिम असा निसर्ग तेव्हा मी बघत होतो. अवाढव्य हिमालयाच्या रांगा. कुठेतरी पाण्याचं दर्शन, बर्फ झालेली नदी, थोडं फार खुरटं, जमिनीलगत गवत आणि छोट्याशा पायवाटेने जाणारी माणसांची रांग. मला हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेची आठवण झाली... स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या ‘अमरनाथ ट्रेक’ या ट्रॅव्हलॉगचा हा सव्विसावा भाग.. 
.........................................
बाहेर उजाडलं होतं. आजूबाजूला लोकांची वर्दळ सुरू झाली होती. मी बाहेर आलो. सूर्योदय झाला नव्हता, मात्र सूर्याच्या आगमनापूर्वीच्या पसरलेल्या उजेडाने किरणांची वर्दी दिली होती. आसमंत उजळून गेला होता. लोक तयार होऊन प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे, म्हणजेच पंचतरणीकडे एव्हाना निघाले होते. बरेच लोक घोड्यांवर जात होते. दुरून पाहिलं, तर मानवी मुंग्यांची एक मोठी रांगच भासत होती जणू.. 

मी मात्र अत्यंत बिकट आणि वाईट अवस्थेत होतो. मला कळतच नव्हतं, काय करावं. घोडा करावा, की पायी चालावं. पायी चालणं जवळपास अशक्य होतं. छाती प्रचंड दुखत होती. श्वास घेताना खूप त्रास होत होता. हातात काठी घेऊन, पाठीवर बॅगेचं बिऱ्हाड घेऊन पुढे निघण्याच्या तयारीत होतो; पण पाऊल पुढे टाकणं अवघड होत होतं. काठीचं लोखंडी टोक निघून गेलं होतं. ..आणि हे काय..! क्षणात परिस्थिती पुन्हा बिकट झाली. बघता बघता आभाळ दाटून आलं. रात्रीचं सुंदर निळंशार आभाळ झाकोळून पावसाच्या काळ्या ढगांनी गर्दी केली होती. नीलकांती अप्सरेनं अंगावर काळी गोधडी ओढली होती.

मी एकेक पाऊल समोर टाकत चालू लागलो. तेवढ्यात एक घोडेवाला जवळ आला. ‘पंचतरणी तक करना है घोडा.? दो घंटे में पहुच जायेंगे..’ मनावर दगड ठेऊन मी घोडा करण्याचा विचार करू लागलो होतोच. कारण घोडा करणं हे मी माझ्या वयातल्या मुलासाठी कमकुवतपणाचं लक्षण समजायचो. नेहमी मी सतत फुशारक्या मारायचो, स्वतःच्या, कितीही चालू शकण्याच्या, माझ्या स्टॅमिनाच्या. अमरनाथला जाताना संपूर्ण रस्ता पायी चालणार आहे, असं सतत म्हणायचो; पण आता शक्य होत नव्हतं. 

मी घोडा करायचं ठरवलं; पण एक महत्त्वाचा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. एक काळजी वाटू लागली. मी घोडा करेन, असा विचारही कधी केला नव्हता. त्यामुळे माझ्याकडे अगदी मोजकेच रोख पैसे होते. ते सर्व घोड्यावर लावायचे का, असा विचार करू लागलो. त्या घोडेवाल्याला मी नकार दिला. त्याने माझ्यासमोर आणखी एक प्रस्ताव ठेवला. आणखी एक हजार रुपयांची भर घालून सरळ अमरनाथ गुहेजवळ सोडतो, असं तो म्हणाला. माझ्यासाठी हा आश्चर्याचा धक्काच होता. माझ्या डोक्यात अगदी हेच पक्कं होतं, की आजची रात्र पंचतरणीला तंबूत घालवायची आणि उद्या अमरनाथ गुहेत. उद्या अमरनाथ दर्शन. लिंगाचं दर्शन!

अभिजित पानसेअनेक वर्षांचं स्वप्न उद्या पूर्ण होणार याचा आनंद होताच; पण हा घोडेवाला आजच दर्शन होईल असं म्हणत होता. मी तयार झालो. मी हिमालयाच्या आतील रांगांमध्ये होतो. दूरवर फक्त हिमालयाची शिखरं. तिथे वीजसुद्धा उपलब्ध नव्हती. दूरदूरपर्यंत झाडंही दिसत नव्हती. अर्थात अकरा हजार फुटांवर ती असणारही नाहीत. केवळ काही खुरटी झुडुपं दिसत होती. 

घोडेवाल्यासोबत त्याच्या घोड्यापर्यंत जाणंही मला खूप कष्टप्रद वाटत होतं. हा घोडेवाला देवासारखा.. अगदी शंकरासारखाच भेटला होता. शेवटी एकदाचं माझं अश्ववाहन दिसलं. उंच, पांढरा, कपाळावर काळपट रंगाचा पट्टा, सुंदर कान असा तो होता. घोडेवालाही त्याची स्तुती करत होता. हा अत्यंत समजूतदार आणि हुशार घोडा आहे, असं म्हणत होता. मलाही पूढे प्रवासात त्याची प्रचीती आली. घोडेवाल्याच्या साहाय्याने मी घोड्यावर आरोहित झालो. घोड्यावर मांड ठोकली वगैरे नाही म्हणू शकत. इकडे माझ्या मांड्यांमध्ये मात्र मणामणाचे गोळे आले होते. 

घोडेवाल्याने काही मूलभूत नियम सांगितले. चढावरून जाताना कंबरेत वाकायचं. उतार असताना मागे पाठ ताणायची. पाय कसे ताणून ठेवायचे. आमचा शुभ्र अश्व पुढे चालू लागला. एका लयीत घोडा चालत होता. आभाळ भरलेलं होतं. पावसाची लक्षणं स्पष्ट होती. मला घोड्यावर बसूनही श्वास घेताना त्रास होत होता. बॅगेतील रेनकोट प्रयत्नपूर्वक काढून तो अंगात चढवला. 

आयुष्यात पाहिलेला सर्वांत सुंदर, अप्रतिम असा निसर्ग तेव्हा मी बघत होतो. अवाढव्य हिमालयाच्या रांगा. कुठेतरी पाण्याचं दर्शन, बर्फ झालेली नदी, थोडं फार खुरटं जमिनीलगत गवत, तेवढीच काय ती हिरव्या रंगाची सोबत होती. बाकी सगळीकडे फक्त शुभ्र आणि मातकट रंग. एकही पक्षी नाही. छोट्याश्या पायवाटेनं जाणारी माणसांची रांग. मला हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेची आठवण झाली. ‘यह महान दृश्य है.. चल रहा मनुष्य है.. अश्रू स्वेद से लथपथ लथपथ लथपथ, अग्नीपथ.. हिमपथ.. हिमपथ… हिमपथ…’

(क्रमशः) 
- अभिजित पानसे
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com

(‘अमरनाथ ट्रेक’ हा ट्रॅव्हलॉग दर शनिवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/V6rLmU  या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link