Next
‘चित्रपटांमध्ये दृष्टीकोन बदलण्याची ताकद’
आरोग्य चित्रपट महोत्सवात देविका दफ्तरदार यांचे प्रतिपादन
BOI
Monday, December 24, 2018 | 06:14 PM
15 0 0
Share this article:

आठव्या आरोग्य चित्रपट महोत्सवात देविका दफ्तरदार यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या वेळी पी. एम. शहा फाउंडेशनचे संचालक चेतन गांधी उपस्थित होते.

पुणे : ‘अभिनेता किंवा अभिनेत्री ही छान दिसायला हवी अशी सर्वांप्रमाणेच माझीही सुरुवातीला धारणा होती. पण ‘नितळ’ या चित्रपटात पांढरे डाग असणाऱ्या मुलीची व्यक्तिरेखा साकारताना मला पूर्णतः नवी दृष्टी मिळाली आणि खरे सौंदर्य आपल्या व्यक्तिमत्त्वाचे, निर्मळ मनाचे असते, ही गोष्ट मनावर ठसली. चित्रपटांमध्ये दृष्टीकोन बदलण्याची ताकद असते’, असे मत अभिनेत्री देविका दफ्तरदार यांनी व्यक्त केले.

पी. एम. शहा फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय आरोग्य चित्रपट महोत्सवाचा समारोप देविका यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे झाला. या वेळी त्या बोलत होत्या. या महोत्सवासाठी आरोग्यविषयक ३८ लघुपट व माहितीपट निवडले गेले होते. यातून आकांक्षा चित्कारा दिग्दर्शित ‘अ बीस्ट कॉल्ड ब्यूटी’या माहितीपटाला आणि उमेश बगाडे दिग्दर्शित ‘अनाहूत’ या लघुपटाला देविका यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करून गौरवण्यात आले. पी. एम. शहा फाउंडेशनचे संचालक अॅड. चेतन गांधी या वेळी उपस्थित होते.

रिद्धी छाब्रा दिग्दर्शित ‘आय होल्ड ब्लड’ व रिनीता बॅनर्जी दिग्दर्शित ‘बीयॉंड वर्ड्स’ या माहितीपटांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय; तसेच सुमित पाटील दिग्दर्शित ‘तरंग’ व पुष्पनाथन अरुमुगम दिग्दर्शित ‘कावल दैवम’ या लघुपटांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले.

‘अनेक आजारांबद्दल अजुनही फारसे बोलले जात नाही. अशा विषयांवरील माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चित्रपट हे चांगले माध्यम आहे,असे सांगून देविका यांनी त्यांची भूमिका असलेल्या ‘नितळ’ या चित्रपटाच्या वेळचा अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या, ‘या चित्रपटात मी ‘ल्यूकोडर्मा’मुळे त्वचेवर पांढरे डाग असलेल्या डॉक्टरची भूमिका साकारली होती. सुरुवातीला चेहऱ्यावर पांढऱ्या डागांचा मेकअप केल्यावर माझा उत्साह मावळला होता,परंतु ती भूमिका समजून घेताना सौंदर्याकडे पाहण्याची माझी दृष्टी बदलली.’

 ‘त्या चित्रपटात नाटककार विजय तेंडुलकर यांचीही भूमिका होती. ‘तू पांढरे डाग असलेल्या मेकअपमध्ये अगदी छान दिसतेस. कधीतरी याच मेकअपमध्ये बाहेर जात जा, असे ते म्हणत’, अशी आठवण देविका यांनी सांगितली.

चित्रपट अभ्यासक डॉ. चंद्रशेखर जोशी, अनुजा देवधर व वैद्यकीय व्यावसायिक डॉ. लीना बोरुडे यांनी या महोत्सवासाठी परीक्षक म्हणून काम पाहिले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search