Next
‘आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या संधी’
प्रेस रिलीज
Friday, January 05 | 04:53 PM
15 0 0
Share this story

आयुर्वेदावरील परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी डावीकडून मंदार जोगळेकर, डॉ. सुकुमार सरदेशमुख, डॉ. हरीश पाटणकर, डॉ. अस्मिता वेले, डॉ. अस्मा इनामदार, डॉ. प्रियांका चोरगे.पुणे : ‘युरोपीय देशांसह जगभरात आयुर्वेदाबाबत जागृती वाढत आहे. अनेक देश आयुर्वेदाला मुख्य उपचारपद्धती म्हणून स्वीकारू पाहत आहेत. त्यामुळे आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीयस्तरावर मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारताकडे योग आणि आयुर्वेद निर्यात करण्यासारख्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. संशोधनात्मक आयुर्वेद पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत,’ असे प्रतिपादन हंगेरीतील भारतीय दूतावासातील आयुष विभागाच्या अध्यक्षा डॉ. अस्मिता वेले यांनी केले.

भारतातील पहिले आयुर्वेदीय हेअर टेस्टिंग लॅब अँड रिसर्च सेंटर असलेल्या केशायुर्वेद आणि बीव्हीजी इंडियातर्फे मराठा चेम्बर ऑफ कॉमर्सच्या सुमंत मुळगावकर सभागृहात आयोजित आयुर्वेदावरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केले होते. या प्रसंगी ‘आंतरराष्ट्रीय स्तवरावर आयुर्वेद’ या विषयावर त्या बोलत होत्या. या वेळी ‘बुकगंगा डॉट कॉम’चे सीईओ मंदार जोगळेकर, केशायुर्वेदचे संस्थापक डॉ. हरीश पाटणकर, ‘बीव्हीजी’चे उपाध्यक्ष डॉ. दत्ताजी गायकवाड, डॉ. अजित कोल्हटकर, आयुर्वेदाचार्य डॉ. सुकुमार देशमुख, डॉ. अस्मा इनामदार, डॉ. प्रियांका चोरगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी केशायुर्वेदचे जगभरात ५० उपकेंद्र झाल्याबद्दल केंद्रप्रमुखांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. वेले म्हणाल्या, ‘वैद्यांनी प्रत्येक गोष्टीचा दस्तावेज ठेवला पाहिजे. आयुर्वेद सर्व देशांपर्यंत पोहोचू लागले आहे. भारत सरकारचे आयुष मंत्रालयही त्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रत्येक देशात आयुषमार्फत भारतीय दूतावासात आयुर्वेदाचे अध्यासन स्थापन केले जात आहे. त्यामुळे परदेशात नव्याने आयुर्वेदात काम करू पाहणाऱ्यांना संधी आहेत. त्याचा फायदा भारतीय वैद्यांनी घेत आपल्या भारतीय आयुर्वेदाचा जगभर प्रसार केला पाहिजे.’

‘बुकगंगा’चे मंदार जोगळेकर म्हणाले, ‘इंटरनेटमुळे वैद्यांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. सोशल मिडीयासह इतर नवमाध्यमांचा आयुर्वेद प्रसारासाठी वापर केला पाहिजे. आपापसांतील संवाद वाढविण्यासाठी आणि ज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी ‘वेबिनार’चा प्रभावी वापर केला पाहिजे.’

डॉ. पाटणकर म्हणाले, ‘केशायुर्वेद हे आयुर्वेदाला तत्रंज्ञानाची जोड देऊन विकसित केलेले संशोधन आहे. अल्पावधीत मिळालेला प्रतिसाद आनंददायी असून, येत्या वर्षभरात शंभर उपकेंद्र सुरू करण्याचा मानस आहे. योगापाठोपाठ आता आयुर्वेदही जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रशियात योग आणि आयुर्वेदाला महत्त्व दिले जात असून, नव्याने या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सद्यस्थिती अनुकूल आहे.’

‘युरोप आणि जपान आता पर्यायी औषधे म्हणून आयुर्वेदाला स्वीकारत आहे; परंतु पुराव्यांवर त्यांचा अधिक भर आहे. तुमच्याकडे ज्ञान, सादरीकरण, नाविन्यता आणि तेथील कायदेशीर बाबींची जाण असेल, तर चांगल्या पद्धतीने तुम्ही आयुर्वेद रुजवू शकता,’ असे डॉ. सुकुमार देशमुख यांनी ‘युरोप व जपानमधील आयुर्वेदाला असणाऱ्या संधी’ या विषयावर बोलताना सांगितले.

डॉ. अस्मा इनामदार ‘दुबईमधील आयुर्वेदाला असणाऱ्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. दुबई हे वैद्यकीय पर्यटन म्हणून विकसित होत असल्याचे त्या म्हणाल्या.

‘जर्मनीमधील आयुर्वेदाला असणाऱ्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. चोरगे म्हणाल्या, ‘जर्मन भाषा अवगत करण्यासाठी तेथील लोक आणि सरकार तुम्हाला मदत करते. त्यामुळे भाषेचा फारसा अडसर राहत नाही. विविध कोर्सेस आणि समुदेशन सत्रातून आपण आयुर्वेद पोहोचवू शकतो.’

डॉ. भावना उपाध्याय यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दत्ताजी गायकवाड यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link