Next
स्वातंत्र्यदेवीची विनवणी
BOI
Tuesday, February 27, 2018 | 08:30 AM
15 0 0
Share this article:


‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ ही कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी देशाच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाल्यावर लिहिलेली कविता. त्यांनी वर्णन केलेल्या परिस्थितीत आजही फारसा बदल झालेला नसल्याने या विनवणीची आजही खूप गरज आहे. मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा एक भाग म्हणून ही कविता आपल्यापुढे सादर केली आहे पुणे आकाशवाणीच्या वरिष्ठ निवेदिका डॉ. प्रतिमा जगताप यांनी...
........
वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज
पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका ।
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका ॥

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे ।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका ॥

अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका ।
अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका ॥
जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा ।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका ॥

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।
करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका ॥

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा ।
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका ॥

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना ।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका ॥
सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने ।
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका ॥

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे ।
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका ॥

पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा ।
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका ॥
- कुसुमाग्रज 


(कुसमाग्रजांच्या निवडक कविता अन् त्यांवरचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख वाचण्यासाठी https://goo.gl/UoDAaC येथे क्लिक करा. कुसुमाग्रजांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/fp3o2p येथे क्लिक करा. मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले सर्व लेख, कविता आणि व्हिडिओ https://goo.gl/qgDdWU या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search