Next
पालक रंगले नाट्यशिबिरात...
BOI
Friday, May 12, 2017 | 06:59 PM
15 0 0
Share this article:

पुणे : सध्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांच्या अनेक विविध शिबिरांचा धमाका चालू असताना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव शाखेने चक्क पालकांचे नाट्य प्रबोधन शिबिर घेऊन पालकांनाच दंगा, मस्ती व नाटक करायला लावले. रंगभूमी कलातज्ज्ञ प्रा. देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर या दोघांनी शिबिराचे संचालन केले. देवदत्त पाठक यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या शिबिरात मुलांचे प्रश्न, अडचणी, घरातील वातावरण, स्पर्धा, तुलना आणि अपेक्षा या विषयांवरील अनेक रंगमंचीय खेळांतून पालकांनी आपल्या मुलांच्या तक्रारी जाणून घेतल्या. ‘मुलांच्या क्षमतेच्या प्रमाणात त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू,’ अशी एकत्रित शपथही घेतली.
 
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव शाखेने आयोजित केलेल्या या शिबिरात तळेगाव, मावळ परिसरातील ३८ शिबिरार्थींचा (मुलांचा) सहभाग होता. मुलांचा आणि पालकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या शिबिराचा समारोप ११ मे रोजी झाला. ‘हे शिबिर फक्त १० दिवसांचेच का? शंभर दिवसांचे का नाही,’ असा प्रश्न शिबिरार्थी मुलांनी समारोपाच्या वेळी विचारला. या वेळी शिबिरात प्रावीण्य मिळवणाऱ्या शिबिरार्थींना देवदत्त पाठक यांच्या ‘गुरुस्कूल’तर्फे आगळ्यावेगळ्या प्रकारची प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. ती अशी...
सर्वोत्कृष्ट सृजनशीलता : वैष्णवी पवार
सर्वोत्कृष्ट सहभाग : वेदान्त काणे व आर्या चितळे
सर्वोत्कृष्ट वर्तन : जान्हवी इखे
सर्वोत्कृष्ट प्रगती : सृष्टी कदम व विश्वजित जाधव.
 
‘आपले तळेगाव सांस्कृतिक चळवळींचे माहेरघर आहे. फक्त आपण त्यात सहभागी व्हायला हवे. आपल्या पाल्यांनाही सहभागी करून घ्यायला हवे,’ असे मत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेचे विश्वास देशपांडे यांनी मनोगतात मांडले.
  
‘आपण चांगले वागलो, की आपली मुलेही चांगली वागतात. या शिबिरात मुलांना मी शिकवले नाही, तर मुले स्वत:हून शिकली आणि हीच स्वत: शिकण्याची सवय त्यांना पुढील आयुष्यात खूप उपयोगी पडेल,’ असे देवदत्त पाठक यांनी आपल्या मनोगतात सांगितले. समारोप समारंभात नाट्य परिषदेचे खजिनदार नितीन शहा, सुरेशभाऊ दाभाडे, ऊर्मिला छाजेड आणि ‘कलापिनी’च्या उपाध्यक्षा शर्मिला शहा उपस्थित होत्या.
 
तळेगाव शाखेच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी सुरेश धोत्रे (अध्यक्ष), ऊर्मिला छाजेड, नयना डोळस, राजेश बारणे, भरतकुमार छाजेड, निरंजन जहागीरदार, विजय कुलकर्णी, सुषमा इखे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search