Next
ओसाड माळरानावर फुलवली द्राक्षबाग
तरुण शेतकऱ्याने जिद्दीने साधली किमया
BOI
Thursday, March 28, 2019 | 12:36 PM
15 0 0
Share this article:

रावसाहेब गाढवे

सोलापूर :
रावसाहेब मारुती गाढवे या तरुण शेतकऱ्याने कातळावर द्राक्षबाग फुलवण्याची किमया केली आहे. सोलापूर-सांगली जिल्ह्याच्या सीमेवर कातळ भागात या शेतकऱ्याने कष्ट करून फुलवलेल्या या चार एकर क्षेत्रावरील द्राक्षबागेने अनेकांना प्रेरणा दिली आहे. 

दरसवाडी (जि. सांगली) येथील माळरानात फुलविलेल्या द्राक्षबागेत मार्गदर्शक शशी भोसले यांच्यासह रावसाहेब गाढवे.

फुलचिंचोली (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील रावसाहेब मारुती गाढवे या तरुण शेतकऱ्याने आपल्या दरसवाडी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील ओसाड खडकाळ शेतात ही किमया साधली आहे. सांगली जिल्ह्याच्या हद्दीत येत असलेल्या या शेताला त्यांनी सोलापूर जिल्ह्यातून पाणी विकत आणून दिले आहे. दरसवाडी येथे त्यांची सुमारे वीस एकर खडकाळ, वडिलोपार्जित जमीन आहे. पाणीटंचाईमुळे त्यांची शेती पडीक होती. आता त्यांनी याच माळरानात द्राक्षबाग फुलवण्याचे मोठे धाडस केले आहे आणि त्यात त्यांना चांगले यशही आले आहे. पाणीटंचाईमुळे त्यांना पाणी विकत घ्यावे लागले. त्या भागात मिळणारे पाणी खारट असल्याने त्याचा द्राक्षांचे उत्पादन व गोडीवर परिणाम होतो, असा त्या भागातील शेतकऱ्यांचा अनुभव आहे. म्हणून गाढवे यांनी सोलापूर जिल्ह्यातील गोडे पाणी विकत घेऊन टँकरने द्राक्षबागेला पुरविले. पाण्यावर जास्त खर्च झाला, तरी त्यामुळे द्राक्षाची गोडी वाढल्यामुळे उत्पादनात वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी विकत घेतले, तरी माळरानावर द्राक्षबाग फुलविणे हे जिकिरीचे आणि जोखमीचेच होते; मात्र त्यांनी धाडस केले आणि जिद्दीने त्यात यश मिळविले. सध्या त्यांनी एकरी वीस टन द्राक्षाचे उत्पादन घेतले आहे. द्राक्षांना सरासरी ४० रुपये प्रति किलो दर मिळाला. यातून एकरी सुमारे आठ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. विकतचे पाणी वापरावे लागल्यामुळे त्यासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. ‘आमची दरसवाडीतील शेती पाण्याअभावी पडीकच होती. फुलचिंचोलीतील द्राक्षबागेच्या अनुभवावर आम्ही दरसवाडीच्या माळरानात पाणी विकत घेऊन द्राक्षबागेची लागवड केली. ती बाग आम्ही सोलापूर जिल्ह्यातील गोड्या पाण्यावर जगवली. यात आम्हाला चांगले यश मिळाल्याने मोठे समाधान वाटत आहे,’ असे गाढवे यांनी सांगितले. 

गाढवे यांचे मार्गदर्शक शशी भोसले म्हणाले, ‘गाढवे यांनी ओसाड माळरानात पाणी विकत घ्यावे लागले तरी जिद्दीने शेती करून परिसरातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली आहे.’

(सोबत व्हिडिओ देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Nathaji Keskar About 143 Days ago
Very inspiring Dr
0
0
Bal Gramopadhye About 144 Days ago
There is a lesson for others . Low
0
0

Select Language
Share Link
 
Search