Next
फास्टर फेणे वेड लावतो...
अनिकेत कोनकर (Aniket.Konkar@myvishwa.com)
Sunday, October 29, 2017 | 07:14 PM
15 0 0
Share this article:

सत्तरच्या दशकात जन्मलेला भा. रा. भागवतांचा फास्टर फेणे हा मानसपुत्र आज २०१७मध्येही वेड लावतो, हे त्या साहित्यकृतीचं मोठेपण आहे. जुन्या, पण अनेकांच्या मनावर अधिराज्य केलेल्या फास्टर फेणेच्या व्यक्तिरेखेवर आताच्या संदर्भांनुसार चांगला चित्रपट तयार करण्याचं शिवधनुष्य चित्रपटाच्या टीमनं चांगल्या प्रकारे पेललंय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या फास्टर फेणे या चित्रपटाबद्दल...
...............
लहानपणी ज्यांनी भा. रा. भागवतांची वेड लावणारी भाराभर पुस्तकं वाचली असतील, त्यांच्या ती कायम मनात असतात. भुताळी जहाज, दीपमाळेचे रहस्य यांपासून ते बिपिन बुकलवार आणि फास्टर फेणेपर्यंत... सगळी पुस्तकं वीररसानं भरलेली नि भारलेली... त्या वयात कुतूहल बरंच असतं, काही तरी धाडस करण्याची, शौर्य गाजवण्याची खुमखुमी असते नि त्यामुळेच अशा साहसकथा, सुपरहिरो वगैरेंचं गारूड त्या वयात पटकन होतं. भा. रा. भागवतांचा मानसपुत्र फास्टर फेणेची तर बातच और. त्या पुस्तकांची मजा शीर्षकांपासूनच सुरू होते. फुरसुंगीचा फास्टर फेणे, फास्टर फेणेच्या गळ्यात माळ, फास्टर फेणे डिटेक्टिव्ह, फास्टर फेणे भुस्सा करतो, जंगलपटात फास्टर फेणे, इत्यादी इत्यादी... शीर्षकातूनच इतकी उत्कंठा वाढायची, की ते पुस्तक बसल्या बैठकीत वाचून पूर्ण व्हायचं नि फास्टर फेणेसोबत आपलीही एक वेगवान सैर व्हायची. त्या गोष्टी वाचताना कुठेतरी स्वतःला त्या भूमिकेत ठेवलं जायचं किंवा आपण त्या घटनांचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहोत, असंही वाटायचं. अर्थातच हे त्या साहित्यकृतीचं वैशिष्ट्य आणि सत्तरच्या दशकात जन्मलेला हा फास्टर फेणे आज २०१७मध्येही वेड लावतो, हे त्या साहित्यकृतीचं मोठेपण आहे. आत्ताचं त्याचं वेड लावण्याचं निमित्त आहे चित्रपटाचं हे सर्वांना माहिती असेलच.

मुळात एक काळ गाजवलेल्या या मराठमोळ्या सुपुत्रावर चित्रपट काढायचा, ही कल्पनाच कौतुकास्पद आहे. आणि ती चांगल्या पद्धतीनं प्रत्यक्षात उतरवणं, हेही आव्हानात्मक आहे. त्यासाठी लेखक क्षितिज पटवर्धन, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, निर्माते रितेश, जेनेलिया देशमुख आणि झी स्टुडिओज यांचं नक्कीच कौतुक करण्यासारखं आहे. फास्टर फेणेची व्यक्तिरेखा काल्पनिक असली, तरी इतक्या प्रसिद्ध व्यक्तिरेखेवर चित्रपट काढायचा हे तसं शिवधनुष्य पेलण्यासारखंच होतं; पण ते या टीमनं चांगल्या प्रकारे पेललंय, असं चित्रपट पाहिल्यानंतर वाटलं. 

व्यक्तिरेखा, त्याच्या लकबी जुन्या असल्या, तरी या चित्रपटाची कथा आजच्या काळात घडते. लेखक-दिग्दर्शकानं अनेक समकालीन गोष्टींची दखल घेऊन त्या सिनेमात दाखवल्या आहेत. त्याची ट्ट्यॉक करण्याची लकब, सायकल हाणण्याची सवय, चेक्सचा शर्ट या सगळ्या गोष्टी जुन्याच आहेत; पण तो आताच्या काळातला असल्यानं गीअरची अत्याधुनिक सायकल वापरतो. अभ्यासासाठी यू-ट्यूब वगैरे वापरतो. त्याचं घड्याळही आधुनिक आहे. फेसबुक, फेसबुक लाइव्ह, यू-ट्यूब, जीपीएस लोकेशन, सेल्फी या सध्याच्या तरुणाईच्या नेहमीच्या वागण्या-बोलण्यातल्या गोष्टींचा उपयोग बन्यासारखा सामान्य माणूसही डिटेक्टिव्ह कामगिरीसाठी कशा प्रकारे करू शकतो, हे चित्रपटात चांगल्या पद्धतीनं दाखवलं आहे. गेल्या काही वर्षांत रिक्षासुंदरी स्पर्धा होते आणि त्यात रिक्षा रिव्हर्स चालवण्याचीही स्पर्धा घेतली जाते. त्यांचा नेमका उपयोग लेखक-दिग्दर्शकानं करून घेतला आहे.

जो शिक्षण घोटाळा फास्टर फेणेनं उघडकीला आणला आहे, तो उगाचच ओढूनताणून तयार केलेला वाटत नाही. तो घोटाळा नेमका कसा असू शकतो, याचं चित्र प्रेक्षकाच्या मनात तयार करण्यात नि तो सोडवल्यानंतरही तो कसा सोडवला हे समजावून देण्यात हा चित्रपट कमी पडत नाही. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळे त्याची तीव्रता मनावर ठसते. मनोरंजन करतानाच सध्याचा एक मोठा प्रश्नही या चित्रपटाने चांगल्या प्रकारे मांडला आहे.

चित्रपटाच्या मुख्य पात्राचं नावच ‘फास्टर’ असं असल्यानं चित्रपटही वेगवानच आहे; पण तरीही पाहताना महत्त्वाच्या गोष्टी, संदर्भ प्रेक्षकाच्या नजरेतून सुटणार नाहीत, याची काळजी दिग्दर्शकानं घेतली आहे. मुळात फास्टर फेणे हा चित्रपटाचा हिरो असला, तरी तो तुमच्या-आमच्यासारखाच एक सामान्य माणूस आहे, याचं भान या चित्रपटात ठेवण्यात आलेलं आहे. उगाच कथेची गरज म्हणून किंवा हिरो आहे म्हणून काहीतरी अचाट किंवा शारीरिक क्षमतेपेक्षा खूप मोठा पराक्रम तो गाजवतो, असं अजिबात दाखवलेलं नाही. त्याची हुशारी, निरीक्षणशक्ती मात्र छोट्या-छोट्या गोष्टीतून वेळोवेळी दिसत राहते. 

मनाला भिडणारे आणि सद्यस्थिती दर्शविणारे संवाद हे या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य. उदाहरणादाखल काही संवाद - ‘चांगल्या कामात वाईट माणसं असतात, तशीच वाईट कामातही चांगली माणसं असतात,’ ‘शिक्षणासाठी कुवत नाही, ऐपत लागते,’ ‘शिक्षण आहे तिथं पैसा आहे आणि पैसा आहे तिथं पॉवर आहे,’ ‘आज मुलांना एज्युकेशनची नाही, एज्युकेशनला मुलांची गरज आहे,’ ‘शिक्षण असेल त्याला कसलंही भय नसतं नि भय असेल तिथं शिक्षण होऊ शकत नाही,’ ‘पोलिसांना प्रामाणिकपणा आणि हुशारी एकाच वेळी दाखवायची संधी फार कमी वेळा मिळते,’ ‘मागे वळणं सोपं आहे, पण पुढे जाणं आवश्यक आहे,’ ‘मार्क कितीही मिळाले तरी चालतील, अभ्यास वाया जात नाही..’ अर्थात, ही फक्त काही उदाहरणं झाली. एकंदरीतच चित्रपटाचे संवाद आणि पटकथा चांगली जमून आली आहे.

भूमिकांसाठी अभिनेत्यांची चपखल निवड हाही या सिनेमाचा एक प्लस पॉइंट. भा. रा. भागवतांच्या भूमिकेत दिलीप प्रभावळकर, बनेश ऊर्फ फास्टर फेणेच्या भूमिकेत अमेय वाघ, पत्रकार अबोलीच्या भूमिकेत पर्ण पेठे, भू-भूच्या भूमिकेत शुभम मोरे यांनी आपापल्या भूमिकांना फार चांगला न्याय दिला आहे. मुळात अमेय वाघ भा. रा. भागवतांच्या पुस्तकातल्या फास्टर फेणेसारखाच दिसतो नि वावरतोही. त्यामुळे त्याचा चांगला प्रभाव पडतो. अमर फोटो स्टुडिओ, दिल दोस्ती दुनियादारी यांप्रमाणेच ‘फास्टर फेणे’तला अमेयही वेगळं काही तरी देऊन जातो. दिलीप प्रभावळकरांबद्दल वेगळं काय सांगणार? आपल्या अभिनयाच्या सुंदर प्रभावळीनं भूमिकेचं सोनं करणं एवढंच त्यांना माहिती आहे नि याही वेळी आपल्याला त्याचा अनुभव येतो. सिद्धार्थ जाधवनं रिक्षाचालक अंबादासच्या छोट्या भूमिकेत विशिष्ट लकब दाखवून छाप पाडली आहे. 

अप्पा या एज्युकेशन माफियाच्या भूमिकेत गिरीश कुलकर्णीनं अख्खा चित्रपट व्यापून टाकला आहे. त्याचं पात्र निगेटिव्ह असलं, तरी ते आपल्या मनावर राज्य करतं. त्याची ती बोलण्याची खास ढब, चेहऱ्यावरचे भीतिदायक हावभाव, विशिष्ट प्रकारे हसत समोरच्याची खिल्ली उडवणं आणि खलनायकाला साजेसे जरब बसवणारे नि क्षणात भाव बदलणारे बोलके डोळे ही त्याच्या भूमिकेची खासियत. ‘सरकारनामा’मधला यशवंत दत्त यांच्या तोंडचा ‘सत्कार करा’ हा शब्दप्रयोग जसा फेमस झाला होता, तसाच ‘फास्टर फेणे’मधल्या गिरीश कुलकर्णीच्या तोंडचा ‘धन्यवाद द्या’ हा शब्दप्रयोगही प्रसिद्ध होईल असं वाटतं. ‘देऊळ’मधला साधा-भोळा केश्या साकारून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या या अभिनेत्यानं या चित्रपटाल्या खलनायक अप्पाच्या भूमिकेतही जान ओतली आहे.

नाटकाच्या बाबतीत असं म्हटलं जातं, की पहिल्या प्रवेशात भिंतीवर टांगलेलं पिस्तूल दाखवलं असेल, तर शेवटच्या प्रवेशात तरी ते झाडलं गेलं पाहिजे. रहस्यमय कादंबरी, नाटक किंवा चित्रपट असेल, तर अशा संदर्भांचं असणं खूप महत्त्वाचं असतं. या चित्रपटातही अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्यांचे संदर्भ आधी येतात आणि नंतर त्या संदर्भांचा उपयोग केलेला दाखवला जातो. चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवलं गेलेलं बाइक रेसिंग, बन्यानं काढलेला धनेश पक्ष्याबरोबरचा सेल्फी, अप्पाचं इंजेक्शनद्वारे इन्सुलिन घेणं हे सगळे संदर्भ पुढे गेल्यावर उलगडतात.

मिलिंद जोग यांची सिनेमॅटोग्राफी पुण्याचं मंडईपासून जनता वसाहतीपर्यंत आणि एकंदरच कथेनुरूप छान दर्शन घडविते... पार्श्वसंगीतही उत्कंठावर्धक दृश्यांना साजेसं...

त्यातल्या त्यात, चालत्या पीएमपी बसमध्ये अप्पानं त्याच्या गुंडांसह फास्टर फेणेला धमकावणं आणि फास्टर फेणे व भू-भूला पाण्याच्या टाकीत टाकल्यानंतर तुलनेनं सहजपणे त्यांची सुटका होणं, या दोन घटना थोड्या अतिरंजित वाटतात; पण त्याला आपण ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ म्हणू शकतो. (चित्रपटाच्या सुरुवातीला येणाऱ्या ‘चित्रीकरणादरम्यान कोणत्याही प्राण्याला किंवा पक्षाला दुखावण्यात आलेलं नाही’ या सूचनेत ‘पक्ष्याला’ या शब्दाऐवजी ‘पक्षाला’ असा चुकीचा शब्द वापरला गेला आहे. संपूर्ण चित्रपटात भाषेचा वापर अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलेला आहे; त्यामुळे छोटीशीच असली, तरी ही चूक खटकते.)

आजची मुलं, तरुण पिढी वाचत नाही, अशी ओरड सगळीकडे ऐकू येते. काही प्रमाणात ती खरीही आहे; मात्र या पिढीला वाचनाकडे वळवण्यासाठी असे चित्रपट चांगली भूमिका बजावू शकतात, हे या चित्रपटामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. चांगल्या साहित्याच्या आधारे चांगला सिनेमा होऊ शकतो आणि चांगल्या सिनेमाच्या आधारे चांगल्या साहित्याला चांगले दिवस येऊ शकतात, हे सूत्र अगदी ‘श्यामची आई’पासून सुरू आहे. अलीकडच्या काळात तर ‘नटरंग’सारख्या अनेक चित्रपटांनीही ते दाखवून दिलं. ‘फास्टर फेणे’मध्ये फक्त मुख्य पात्र साहित्यातलं आहे आणि त्यावर आधारित आजच्या काळाला साजेशी कथा लिहून त्याचा चित्रपट बनवला आहे. तरीही ज्यांनी मूळ फास्टर फेणे वाचला नसेल, त्यांच्या मनात त्याच्याबद्दलचं कुतूहल वाढण्यास या चित्रपटामुळे नक्की मदत होईल, यात शंका नाही. जे आधीच फास्टर फेणेचे फॅन्स आहेत, त्यांना तर त्याची ही नव्या काळातली पुनर्भेट ‘ट्ट्यॉक’ करायलाच लावते...
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Savita Deshpande About
सुरेख विश्लेषण. फा.फे. कालानुसार बदलला पण अजुनी सायकल वरच का बरं? असा प्रश्न पडला बुवा. बाकी सगळं आधुनिक तंत्रज्ञान वापरतोय तो. पण सिनेमा खरच छान.
0
0
विश्वास जगताप About
मस्त ! लेख वाचल्यानंतर फास्टर फेणे बघावाच लागेल. खूप छान लेख.
0
0
shilpa kulkarni About
Chan nirikshan aniket !!
0
0
Shashank Shanware About
Picture is worth watching thanks to all invol in this to revive my old memories
0
0
Ganesh Godik About
Interesting
1
0

Select Language
Share Link
 
Search