Next
‘अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी परस्परसंवाद ठेवला पाहिजे’
महेश झगडे यांचे मत; स्पर्धा परीक्षा महोत्सवाचा समारोप
BOI
Friday, June 21, 2019 | 05:19 PM
15 0 0
Share this article:

स्पर्धा परीक्षा महोत्सवात स्पर्धा परीक्षेपेक्षा वेगळी वाट निवडत स्वयंरोजगार उभारणाऱ्या युवांचा सन्मान करताना मान्यवर.  (डावीकडून)  मंदार जोगळेकर, सतीश मगर, महेश झगडे, आनंद पाटील, रोहित पवार.

पुणे : ‘भारतीय राज्यघटनेने लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत;मात्र बऱ्याचदा त्याचे पालन होत नाही. परिणामी लोक अधिकाऱ्यांकडून करावयाची कामे घेऊन लोकप्रतिनिधींकडे जातात. या दोघांमध्ये समन्वयाचा अभाव आणि विसंवाद वाढतो. त्यातूनच जनतेची अनेक कामे प्रलंबित राहतात. त्यामुळे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी आपापल्या कर्तव्यांप्रती प्रामाणिक राहत एकमेकांशी संवाद ठेवला पाहिजे,’ असे स्पष्ट मत राज्याचे माजी प्रधान सचिव महेश झगडे यांनी व्यक्त केले.

सृजन फाउंडेशन आणि एमपीएससी स्टुडंट्स राईट्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय स्पर्धा परीक्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ‘अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात सुसंवादाची गरज’ या विषयावर झगडे बोलत होते. 


गणेश कला क्रीडामंच येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी उद्योजक सतीश मगर, सनदी अधिकारी आनंद पाटील, मायविश्व टेक्नॉलॉजीचे संचालक मंदार जोगळेकर, रक्षक ग्रुपचे रणजितसिंह पाटील, सृजन फाउंडेशनचे संस्थापक व  बारामती अॅग्रो फूड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार, एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे महेश बडे, किरण निंभोरे आदी उपस्थित होते. 

स्पर्धा परीक्षेतील अपयशानंतर वेगळी वाट निवडत स्वयंरोजगाराकडे वळणाऱ्या युवकांचा सन्मान या वेळी करण्यात आला. तरुणांना सर्व क्षेत्रांत नोकऱ्यांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी सृजन करिअर अॅपचे या वेळी लोकार्पण झाले.

महेश झगडे म्हणाले, ‘अलीकडे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची खोली उथळ झाली आहे. आपण ज्या क्षेत्रात काम करू इच्छितो, त्यावर प्रभुत्व मिळवले पाहिजे. आपल्यामध्ये उत्साह आणि मार्केटिंग करण्याची कला असेल, तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येते. केवळ नोकरीच्या मागे न लागता ‘डिसरपटिव्ह इनोव्हेशन’ करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये खासगी, सरकारी नोकऱ्यांमध्ये ६५ टक्के कपात अटळ आहे. त्यामुळे व्यवसाय व स्वयंरोजगाराच्या संधी आपण शोधायला हव्यात. अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी आपली कर्तव्य पार पाडून लोकांची कामे तत्परेने करावीत.’

सतीश मगर म्हणाले, ‘चाळीस वर्षांपूर्वी मीही अधिकारी बनण्याचा प्रयत्न केला. मात्र, अल्पावधीत तो नाद सोडून दिला आणि स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी धडपड सुरू केली. शेती, डेअरी क्षेत्रात काम करत होतो. त्याकाळी जमिनी विकण्याचा प्रवाह होता. अनेक गुंठामंत्री बनून कालांतराने तिथेच पडेल, ते काम करत होते. त्यामुळे जमिनी न विकत आपण उत्पन्न देऊ शकणारा व्यवसाय करायचा, या हेतूने मगरपट्टा सिटीची उभारणी सुरू झाली. आज दीडशेपेक्षा जास्त कुटुंबाना यातून उत्पन्न मिळत आहे. ८० हजार लोक काम करतात. एकही शेतकरी विस्थापित होऊ दिला नाही. मराठी माणसाला धंदा करता आला पाहिजे. त्यासाठी आपण अहंकार सोडून देणे गरजेचे आहे. जे जमेल ते काम प्रामाणिकपणे करून त्यात यश मिळवण्याचा दृष्टीकोन आपण जपला पाहिजे. कितीही मोठ्या पदावर गेलात, तरी आपले पाय जमिनीवर असावेत.’

आनंद पाटील म्हणाले, ‘समाज आणि अधिकारी या एकमेकांना पूरक आहेत. प्रशासनात काम करताना अनंत अडचणी येतात. त्यावर मात करून पुढे जायचे असते. मातृभाषेत समाज जोडता येतो. आव्हानात्मक परिस्थितीतून आपले व्यक्तिमत्त्व घडत जाते. समाज भावनिक गोष्टीत अडकतो. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्या भावना समजून कठीण परिस्थितीतही संयमाने वागले पाहिजे. नागरिकांच्या समस्या सोडविण्याला अधिकाऱ्यांचे सर्वोच्च प्राधान्य असायला हवे.’  

मंदार जोगळेकर म्हणाले, ‘उघड्या डोळ्यांनी उपलब्ध संधींचा अवास्तव अपेक्षा न ठेवता लाभ घ्यायला हवा. मन लावून काम करा. हार मानायची नाही. जगाच्या भाषा शिका. घराबाहेर पडून जग बघा. वेळेचे नियोजन आणि सकारात्मक उर्जा असेल,, तर तुम्ही मोठे कार्य उभारू शकता. प्रश्न उपस्थित करण्याबरोबरच त्यावर उपाय देण्यासाठी प्रयत्न करणे खूप गरजेचे असते. ग्राहकाची गरज ओळखून व्यवसाय करा. पुढच्या काळात नोकरी नाही, तर व्यवसाय हाच योग्य मार्ग आहे.’

रोहित पवार म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरेल. स्पर्धा परीक्षांत यश आले नाही, तर खचून जाऊ नये. इतर क्षेत्रात नोकरी आणि व्यवसायाच्या मोठ्या संधी आहेत. त्याचा फायदा घ्यायला हवा. या संधी एकाच व्यासपीठावर उपलब्ध व्हाव्यात यासाठी सृजन अॅप्लिकेशन काम करेल.’

माधव जगताप यांनी प्रास्ताविक केले. निलेश आरडळे, त्रिवेणी काहलकर, आरिफ पटेल यांनी सूत्रसंचालन केले. अभिषेक अवचार यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search