Next
ये लाल रंग...!
भटक्या कुत्र्यांच्या प्रतिबंधासाठी नाशिककरांचा प्रयोग
BOI
Tuesday, August 28, 2018 | 01:30 PM
15 0 0
Share this article:नाशिक :
नाशिक शहराच्या अनेक भागांत भटक्या कुत्र्यांमुळे भीतीचे वातावरण आहे. अनेक नागरिक, लहान मुले कुत्र्यांच्या चाव्यांमुळे जखमी झाली आहेत. तसेच या कुत्र्यांमुळे परिसरात घाणही होत आहे. या कुत्र्यांना प्रतिबंध करण्यासाठी आवारात लाल रंगाच्या पाण्याच्या बाटल्या ठेवण्याचा प्रयोग काही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे कुत्री येणे बंद झाल्याचा अनुभव आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

नाशिक परिसरात कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. कुत्र्याच्या दंशाने पंचवटी, जय भवानी रोड , सातपूर, जेलरोड, उपनगर परिसरात नागरिक, तसेच लहान मुले जखमी झाली आहेत. पहाटे शाळा-क्लासला जाणारी मुले, कामगार, वृत्तपत्रविक्रेते यांचा भटकी कुत्री पाठलाग लागतात. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. दिवसा व रात्री ही कुत्री अनेक घरांच्या दारात घाण करतात. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लाल पाणी भरलेली बाटली प्रवेशद्वारात किंवा कुंपणाच्या भिंतीला लावून ठेवली, तर कुत्री त्या भागात येत नाहीत, असा अनुभव तेथील काही नागरिकांना आला आहे. कुत्री लाल रंगाला घाबरत असल्यामुळे असा प्रयोग करावा, अशी माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे हा निरुपद्रवी प्रयोग करून पाहण्याचे काही नागरिकांनी ठरविले. तो प्रयोग यशस्वी होत असल्याचा अनुभव त्यांना आला आहे. त्यामुळे आणखीही काही सोसायट्यांच्या प्रवेशद्वाराशेजारी लाल रंगाच्या पाण्याच्या बाटल्या दिसू लागल्या आहेत. चंपानगरीत अनेक नागरिकांच्या घराच्या गेटसमोर अशा बाटल्या लावलेल्या आढळतात. 

कुत्र्यांची नसबंदी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेने कुत्र्यांना पकडून नेणे, या गोष्टी सहज होत नाहीत. त्यामध्ये नागरिक पाठपुरावा करण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नाहीत. कुत्र्यांना इजा होईल असे काही करण्यास पर्यावरणवाद्यांचा विरोध असतो. म्हणूनच कुत्र्यांच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी कुठूनतरी मिळालेल्या माहितीच्या आधारे नाशिककरांनी हा निरुपद्रवी प्रयोग करणे सुरू केले आहे.

विज्ञान काय सांगते?
कुत्र्यांबाबत झालेला अभ्यास असे सांगतो, की कुत्र्यांना लाल रंग ओळखताच येत नाही. म्हणजे, माणसांना लाल रंग जसा दिसतो, तसा तो कुत्र्यांना दिसत नाही. माणसांना जे आणि जसे सात रंग दिसतात, त्यापैकी कुत्र्यांना प्रामुख्याने पिवळा, निळा आणि राखाडी हेच रंग दिसतात. कुत्र्यांना लाल रंगाऐवजी गडद राखाडी रंग दिसतो, असे परदेशात झालेल्या प्रयोगांचे निष्कर्ष आहेत. अर्थात, सखोल संशोधन होईल तेव्हा होईल, तूर्तास तरी नाशिककरांना हा उपाय उपयोगी ठरला असल्याचे दिसते आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search