Next
शेतकऱ्याचा गुणी पोरगा!
BOI
Thursday, May 10, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

कर्णबधिर मुलांसह अभिजित राऊत

अमरावतीतला अभिजित राऊत हा एका शेतकरी कुटुंबातला मुलगा. खेळांची आवड असल्याने त्यातच करिअर करायचं ठरवलेल्या अभिजितची गाठ अचानक कर्णबधिर मुलांशी पडली. अनेक प्रश्नांना तोंड देऊनही त्यांनी आनंदानं हे जगणं स्वीकारलंय, ही गोष्ट अभिजितला भावली आणि अपंग मुलांसाठीच काम करायचं त्यानं ठरवलं. अपंगांची नोंदणी, त्यांना ऑनलाइन प्रमाणपत्रं मिळवून देणं, शासकीय योजना, साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचवणं अशा बाबतींत त्यानं उल्लेखनीय काम केलं. स्वतःच्या प्रसिद्धीचा अजिबात सोस नसलेल्या अभिजित राऊतची प्रेरणादायी गोष्ट जाणून घेऊ या... ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदराच्या आजच्या भागात...
............
कोणीतरी कोणासाठी आयुष्य वेचावे
जीवनाच्या वाटेवरी सुख पेरीत जावे

स्वागत थोरात या कवीच्या या ओळींप्रमाणे जगणारा अभिजित नावाचा तरुण मला ८-१० वर्षांपूर्वी भेटला. थोडासा लाजराबुजरा, कमी बोलणारा, चेहऱ्यावर सात्त्विक भाव असणारा, कोणाच्याही मदतीला न बोलता धावणारा आणि प्रसिद्धीसाठी पुढे न येणारा हा तरुण मला पहिल्याच भेटीत भावला. 

अभिजित राऊत हा विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यातल्या चांदूरबाजार या (त्या वेळी १५ हजार लोकवस्ती असलेल्या) गावात राहणाऱ्या एका शेतकरी कुटुंबातला मुलगा! अभिजितच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती; मात्र त्याची शिकायची खूप इच्छा होती. अमरावतीला असलेल्या हनुमान व्यायाम केंद्रात जात असल्यामुळे अभिजितला व्यायाम आणि खेळ यांचीही गोडी लागली. निरोगी मन निरोगी शरीरात वास करतं, यावर त्याचा विश्वास बसला होता. अभिजितला पोहायला खूप आवडायचं. पाणी दिसलं की अभिजितनं त्यात सूर मारलाच म्हणून समजा. पोहण्याच्या या वेडामुळेच अभिजितनं १९९६-९७ या वर्षी स्विमिंगमधलं राष्ट्रीय स्तरावरचं सुवर्णपदक पटकावलं. इथेच हा गडी थांबला नाही, तर १९९८-९९ या वर्षी त्यानं स्विमिंगमधलं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं सुवर्णपदक पटकावलं. अभिजितनं अमरावतीमधून इंग्रजी साहित्यामध्ये बीए ही पदवी घेतली. 

क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करून कोच (प्रशिक्षक) व्हायचं, असं दहावीत असल्यापासूनच अभिजितनं ठरवलं होतं; मात्र त्याला वेगळी वाटही खुणावत होती. त्यातच घरची आर्थिक परिस्थिती ढासळत चालली होती. आपले छंद, आपली आवड बाजूला ठेवून अर्थार्जन करणं खूप आवश्यक होतं. अशा वेळी मग अभिजितनं नागपूरच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये अर्धवेळ नोकरी पकडली. स्वतः काटकसरीनं राहून अभिजित आपल्या गावाकडे आई-वडिलांना पैसे पाठवू लागला. दोन वर्षं ही नोकरी केल्यानंतर अभिजितला जपान लाइफ मल्टिनॅशनल कंपनीत मार्केटिंगचं काम मिळालं. ऑफिसच्या शेजारीच कर्णबधिर मुलांसाठीची शाळा होती. जेवणाच्या सुट्टीत आणि येता-जाता अभिजितचं लक्ष या कर्णबधिर मुलांकडे जायचं. ती मुलं प्रार्थना कशी करतात, आपसांत संवाद कशी साधतात, याचं त्याला खूपच कुतूहल वाटायचं. या कुतुहलापोटीच अभिजितनं कर्णबधिर शाळेत स्पेशल एज्युकेशनचा दोन वर्षांचा कोर्स केला. या काळात याच मुलांबरोबर अभिजित राहू लागला. एकत्र राहिल्यानं अभिजितला त्या मुलांच्या जगण्यातले अनेक प्रश्न समजले. आपल्याला कुठलंच व्यंग नसताना, चांगले धट्टेकट्टे असताना आपण रोजच कितीतरी तक्रारींचा पाढा वाचत असतो आणि ही मुलं मात्र पावलोपावली ठेचकाळत असतात, अनेक प्रश्नांना तोंड देत चालत असतात, तरीही त्यांनी हे जगणं स्वीकारलंय आणि तेही आनंदानं, असं अभिजितनं अनुभवलं. यातूनच, आपल्याला अपंग मुलांसाठीच काहीतरी करायचंय, या भावनेनं त्याच्या मनात घर केलं. 

याच वेळी म्हणजे २००७ साली नागपूर महानगरपालिकेत सर्व शिक्षा अभियानांतर्गत ‘अपंग समन्वयक’ ही पोस्ट निघाल्याचं अभिजितला समजलं आणि अभिजितनं या पदासाठी रीतसर अर्ज भरला. त्याचं शिक्षण आणि त्याचा डिप्लोमा कामी आला आणि कंत्राट बेसिसवर असलेलं काम अभिजित राऊतला मिळालं. कंत्राटी काम असल्यानं जगणं स्थिरावणार नव्हतं. अस्थिरता राहणार होती; पण तरीही अभिजितनं ही आपल्याला फार मोठी संधी मिळाली आहे असं समजून आनंदानं काम स्वीकारलं. या कामात शासनाच्या अपंगांसाठी असलेल्या शिक्षणाच्या योजना त्याला सर्वांपर्यंत पोहोचवायच्या होत्या. 
 
खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अभिजित राऊतयाच वेळी अभिजितच्या आयुष्यात आणखी एक घटना घडली. अभिजितचा मित्र दिनेश मासोदकर त्याला मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या एका कार्यक्रमासाठी घेऊन गेला. तिथे दत्ता बाळसराफ, विजय कान्हेकर, सुहास तेंडुलकर आणि विश्वास ठाकूर यांच्याशी अभिजितची ओळख झाली. अपंगत्वावर काम करणाऱ्या वेगळ्या व्यक्तींशी दिनेश मासोदकरमुळे ओळख झाल्यानं अभिजितला खूपच आनंद झाला. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली अभिजित अनेक गोष्टी शिकला. अपंगविषयक क्षेत्रात खासदार सुप्रिया सुळेंचं साहाय्य आणि मार्गदर्शन त्याला मिळालं. आपल्या कामाबरोबरच आणखी व्यापक स्तरावरचे अपंगांचे प्रश्न आणि समस्या त्याला कळू लागल्या. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या अपंग विकास मंचासाठी अपंगांविषयीचं धोरण ठरवताना त्याला त्यात काम करण्याची संधी मिळाली. २०११ साली अभिजितनं जिल्हा अपंग पुनर्वसन प्रकल्पाचं (डीडीआरसी) काम सुरू केलं. राष्ट्रीय स्तरावर अपंगांसाठीचे १७० उपक्रम अभिजितनं हाती घेतले. ७५०० अपंगांना लागणाऱ्या साधनांचं वाटप करण्याचा कार्यक्रम २०१५ साली त्यानं यशस्वीरीत्या पूर्ण केला. इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या या कार्यक्रमाची नोंद संसदेतही घेण्यात आली. 

अपंगांचे प्रश्न समजून घेत असताना, त्यांच्यापर्यंत शासकीय योजना पोहोचवत असतानाच एका मोठी समस्या अभिजितच्या लक्षात आली. ती होती अपंगांना मिळणाऱ्या प्रमाणपत्राची! अपंगांजवळ हे प्रमाणपत्र नसेल, तर त्यांना अनेक योजनांपासून वंचित राहावं लागत असे. तसंच हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांना होणारा त्रास खूपच जास्त होता. अशा वेळी प्रमाणपत्रं सुलभपणे मिळण्यासाठी त्यातल्या त्रुटी काय आहेत याचा अभ्यास करून अभिजितनं आयएसजी म्हणजेच ‘इन्क्लुजिव्ह सर्व्हिसेस फॉर डिसॅबिलिटी’ हे सॉफ्टवेअर स्वतः तयार केलं. तत्कालीन सरकारला या सॉफ्टवेअरचं सादरीकरण करून दाखवण्यात आलं. यामुळे अपंग बांधवांना प्रमाणपत्र ऑनलाइन मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार होती. याचा पथदर्शी प्रकल्प नागपूरच्या इंदिरा गांधी रुग्णालयात (जे मेयो नावानं ओळखलं जातं) सुरू करण्यात आला. हा प्रकल्प तिथे यशस्वी झाला. सरकारच्या तंत्रज्ञान विभागानं केपीएमजी या कंपनीला हे सॉफ्टवेअर तयार करायला सांगितलं आणि त्याद्वारे नागपूरमध्ये अपंगांना प्रमाणपत्रं ऑनलाइन देण्याची प्रक्रिया सुरू झाली. या दरम्यान अभिजितनं या सॉफ्टवेअरमध्ये येणारे अडथळे शोधले आणि त्यावर उपायही शोधले. 

पूर्वी अपंगांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कमीत कमी सहा महिने लागायचे. अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागायची. वेगवेगळ्या कार्यालयांत खेटे मारावे लागायचे. ही किचकट प्रक्रिया अभिजितनं अतिशय सुलभ केली आणि ‘मिशन झिरो डिपेंडन्सी फॉर डिसेबिलिटी सर्टिफिकेट’ची सुरुवात केली. त्याला ‘मिशन १०० डेज’ असं म्हटलं गेलं. १०० दिवसांत अभिजितनं जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त अपंगांना प्रमाणपत्र देण्याचं ठरवलं. यासाठी तालुक्यातालुक्यातल्या डॉक्टर्सना एकत्र करून ३० दिवसांचं प्रशिक्षण देण्यात आलं. त्यानंतर प्रत्येक तालुक्यात शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आणि या शिबिरांमधून जवळजवळ १० हजार अपंगांची नोंदणी झाली. त्यापैकी सहा हजार अपंगांना स्पीडपोस्टद्वारे प्रमाणपत्रं घरपोच पोहोचली. या प्रमाणपत्रांबरोबरच अपंगांसाठीच्या योजनांचं माहितीपत्रकही अभिजितनं पाकिटात टाकलं. शासकीय यंत्रणेद्वारे इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या सुलभपणे असं काम घडू शकतं, यावर प्रमाणपत्रधारकांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांना आश्चर्य आणि आनंद या गोष्टी एकाच वेळी अनुभवायला मिळत होत्या. 

अपंगांना प्रमाणपत्र मिळायला लागलं; पण इथं थांबून उपयोगाचं नाही हेही अभिजितच्या लक्षात आलं. आता त्यांना सरकारी योजनांचा लाभही मिळायला हवा आणि त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचायला हव्यात यासाठी काय केलं पाहिजे याचं नियोजन अभिजितनं केलं. जिल्ह्यामध्ये अपंगांची रीतसर माहिती, आकडेवारी नव्हती. गावातल्या आशाताईंना प्रशिक्षण देऊन १६०० आशाताईंकडे गावागावातल्या अपंगांची माहिती मिळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी हे काम अतिशय चोखपणे पार पाडलं. नागपूरचा प्रकल्प यशस्वी झाला. आता अन्य अनेक जिल्ह्यांत अभिजितला पोहोचायचं आहे. सध्या गडचिरोलीमध्ये काम करण्याचं त्यानं निश्चित केलं आहे. आपल्या कामाचं सगळं श्रेय तो त्यानं जमवलेल्या त्याच्यासारख्याच समविचारी सहकाऱ्यांना, आपल्या टीमला देतो. 

लेखिका दीपा देशमुख यांच्यासह अभिजित राऊतअभिजितला कुठलेही पुरस्कार, मानसन्मान या गोष्टींचं आकर्षण नाही. त्याला प्रसिद्धीचाही सोस नाही. कुटुंबात एक अपंग व्यक्ती असेल, तर त्या कुटुंबाला किती प्रश्नांशी सामना करावा लागतो हे त्यानं खूप जवळून बघितलंय. त्यामुळे आपली पुढची वाटचालही अपंगांच्या जगण्यातले अडथळे दूर करण्याचं स्वप्न घेऊनच करायची आहे, असं अभिजित म्हणतो. आपली नोकरी स्थिर नसताना, केवळ आपल्या मनमिळाऊ स्वभावानं सगळ्यांना आपलंसं करून काम करणाऱ्या अभिजितला त्याच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा! अभिजितसाठी स्वागत थोरातनं लिहिलेल्या या ओळी खरोखरच सार्थ ठरतात.

कोणीतरी कोणासाठी आयुष्य वेचावे
जीवनाच्या वाटेवरी सुख पेरीत जावे
कोणीतरी कोणासाठी नित्य गीत गावे
त्या गीताच्या बोलांनी आयुष्य हे फुलावे
कोणीतरी कोणासाठी मुक्त हास्य व्हावे
त्या हास्याच्या मोहराने आसमंत भारावे
कोणीतरी कोणासाठी...

संपर्क : अभिजित राऊत
मोबाइल : ९८२३३ ८७५०२, ९८२३९ ३४०७०
ई-मेल : abhiraut2008@yahoo.com

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Pravin Lohe About 283 Days ago
अभिजीत सरांचे व्यक्तिमत्व म्हणजे अपंगांसाठी एक प्रेरणास्थान असून त्यांच्या कार्याला लाख लाख शुभेच्छा
0
0
Pravin sonone About 283 Days ago
Great work ... Sir , Salam aplya Kamala.
0
0
Surendra Pawar About 284 Days ago
अभिजीत तुझा सारखे कार्य करण्याची बौद्धीक कुवत व क्षमता आम्हा सर्व शासकीय यंत्रणेतील लोकांना येवो ! त्रिवार अभिनंदन .
1
0
DINEAH MASODKAR About 284 Days ago
Very nice article
1
0
Mrunalinee More About 284 Days ago
प्रत्येकाचे ह्रदय अभिजीत सारखे संवेदनशील असावे.प्रत्येक जण सर्वगुण संपन्न नसतो .तेव्हा एकमेकांच्या सहकार्याने जगणे सहज व्हावे.आणि हे होत आहे... गरजवंताला मदत ही भावना प्रत्येकात उतरावी. Good going Abhijit.
1
0
Rudra kadbhane About 284 Days ago
खुप छान काम करत आहेत अभीजीत सर...
1
0
Madhav suryawanshi About 284 Days ago
अभिजितच्या कार्याला सलाम ..दीपाताई आपण योग्य व्यक्तीची योग्य ठिकाणी घेतलेली दखल खरचं कौतुकास्पद आहे.दोघानाही मनःपूर्वक शुभेच्छा..!
1
0

Select Language
Share Link