Next
नाट्यवाचन स्पर्धेत ‘फर्ग्युसन’ची बाजी
BOI
Saturday, November 11 | 04:15 PM
15 0 0
Share this story

आयपार इंटरनॅशनल फेस्टिव्हलच्या निमित्ताने पुण्यातील रसिकांना विविध देशांतील उत्तम कलाकृती पाहायला मिळत आहेत. त्यातच विद्यार्थ्यांनाही सहभाग घेण्याची एक संधी ‘आयपार’ने आंतरमहाविद्यालयीन नाट्यवाचन स्पर्धेच्या निमित्ताने दिली.
.........
आयपार इंटरनॅशनल फेस्टिव्हलच्या निमित्ताने पुण्यातील रसिकांना विविध देशांतील उत्तम कलाकृती पाहायला मिळत आहेत. त्यातच विद्यार्थ्यांनाही सहभाग घेण्याची एक संधी ‘आयपार’ने आंतरमहाविद्यालयीन नाट्यवाचन स्पर्धेच्या निमित्ताने दिली. सहा, सात व आठ नोव्हेंबर रोजी कलाछाया कॅम्पसमध्ये ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे यंदाचे पहिलेच वर्ष होते. 

कलाकार म्हणून आवाज, वाचन यावर प्रभुत्व मिळविणे, भाषा आणि डिक्शन (शब्दांचा वापर) सुधारणे व त्याचबरोबर कमीत कमी तांत्रिक बाबींचा आधार घेऊन केवळ नाट्यवाचनाच्या कलेवर तरुण कलाकारांनी लक्ष केंद्रित करावे, हा या स्पर्धेच्या आयोजनाचा मुख्य हेतू असल्याचे संयोजकांनी सांगितले. सहसा नाट्यवाचनाच्या स्पर्धेचा कालावधी २० ते ३० मिनिटांपर्यंत असतो; पण हाच कालावधी किमान एक तास ते दोन तास असा करत स्पर्धकांसमोर आयोजकांनी खऱ्या अर्थाने आव्हान ठेवले, हे या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य! 

स्पर्धेबाबत बोलताना परीक्षक पौर्णिमा मनोहर म्हणाल्या, ‘प्रसाद वनारसे यांच्याकडून ही संकल्पना ऐकली, तेव्हाच खूप आनंद झाला. फक्त वाचिक अभिनयावर फोकस करून एक तास सादरीकरण करणे हे स्पर्धकांसाठी अवघड होते; पण काही त्रुटी वगळता स्पर्धकांनी उत्तम सादरीकरण केले.’ परीक्षणाबाबतचा अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, ‘स्पर्धेचं परीक्षण करताना खूप मजा आली. एक तास आहे म्हणून त्याचा कंटाळा आला असे कुठेच झाले नाही. या स्पर्धेमध्ये लाइव्ह संगीत वापरायला परवानगी होती. त्यामुळे तोंडाने विविध आवाज काढण्याचे प्रकार टाळले गेले. संगीत किंवा इतर गोष्टी या पूरक असायला हव्यात; पण काही स्पर्धकांनी त्याचा अति वापर केल्याचेही जाणवले. त्याचबरोबर अजून एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे वाचनादरम्यान खूप स्पर्धक पाणी प्यायचे. एक नट म्हणून या काही गोष्टी स्पर्धकांनी ध्यानात घेतल्या पाहिजेत. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या संघाचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. अत्यंत कमी, पण वेगळ्या आणि पूरक अशा अपेक्षित संगीताचा वापर त्यांनी केला.’ नाट्यवाचन करताना खूप मेहनत घेणे, प्रत्येक वाक्याचा अर्थ समजून घेऊन ते सादर करणे खूप गरजेचे आहे, असा सल्लादेखील त्यांनी स्पर्धकांना दिला.

या स्पर्धेत पुण्यातील सहा महाविद्यालयीन संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाच्या व मॉडर्न कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या संघांना अनुक्रमे पहिले व उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक संकेत पारखे (फर्ग्युसन) याला, तर उत्तेजनार्थ पारितोषिक अनघा काकडे (मॉडर्न) यांना मिळाले. पुरुष वाचिक अभिनयाचे पारितोषिक ‘फर्ग्युसन’चा संकेत पारखे व मॉडर्न महाविद्यालयाच्या (गणेशखिंड) प्रथमेश सावंत याला मिळाले. मॉडर्न महाविद्यालयाच्या (गणेशखिंड) गौरी ढोके हिने स्त्री वाचिक अभिनयाचे पारितोषिक पटकाविले. स्पर्धेचे परीक्षण श्याम जोशी व पौर्णिमा मनोहर यांनी केले. 

‘जास्त वेळेत जास्त गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला’
संकेत पारखेस्पर्धेबाबत काहीसे उशिरा कळल्यामुळे संहिता ठरविण्यासाठी फारसा वेळ हातात नव्हता. तेवढ्यात महेश एलकुंचवार यांची ‘वासनाकांड’ ही कथा वाचनात आली. केवळ दोन पात्रांची कथा असल्याने ते एक प्रकारचे चॅलेंज होते. पहिल्या वाचनात फारसे काही हाती लागले नाही; पण नंतर अनेक मुद्दे सापडत गेले व त्यामुळे आम्ही चांगले सादरीकरण करू शकलो. कथेच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच चांगले काही तरी हाती लागते, असे मला वाटते. स्पर्धेतील सादरीकरणाचा कालावधी ही नवी गोष्ट होती; पण त्याकडे संधी म्हणून पाहत जास्त वेळेत जास्त गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला. संयोजकांनीही सगळ्याच पातळीवर आम्हाला भरपूर सहकार्य केले. 
- संकेत पारखे, फर्ग्युसन महाविद्यालय

‘‘हिरकणी’ला अनेकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश’
अनघा काकडेविश्वनाथ खैरे यांच्या ‘हिरकणी’ या पुस्तकाचे नाट्यरूपांतर करून मी ‘हिरा’ ही संहिता लिहिली व ती सादर करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या फेस्टिव्हलमधील स्पर्धा असल्याने थोडा दबाव होता; पण आपल्या मातीतील कथा मांडून हिरकणीला अनेकांपर्यंत पोहोचविणे हादेखील हेतू ही संहिता निवडण्यामागे होता. स्पर्धेत वेळेची अट पूर्ण करताना आमचा कस लागला. शिवाय नाट्यक्षेत्रातील अनेक दिग्गजांसमोर सादरीकरण करायला मिळाले. त्या निमित्ताने त्यांच्याकडून चार गोष्टी शिकण्याची संधीसुद्धा मिळाली. रांगड्या बाजाची कथा असल्यामुळे त्यात पोवाडे व लोकसंगीताचा वापर आम्ही केला. तसेच तबला, डफ, डग्गा अशी वाद्ये वापरली. त्यामुळे सादरीकरण जास्त उठावदार झाले.  
- अनघा काकडे, मॉडर्न महाविद्यालय

- आकाश गुळाणकर
ई-मेल : akash.gulankar@gmail.com

(‘आयपार महोत्सवा’चे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील वार्तांकन वाचण्यासाठी https://goo.gl/12cDAa येथे क्लिक करा.) 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link