Next
आदमी जो कहता है...
BOI
Sunday, October 14, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

चित्रपटसृष्टीचे महानायक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले अमिताभ बच्चन यांचा ११ ऑक्टोबर हा जन्मदिन . त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांच्यावर चित्रित झालेल्या ‘आदमी जो कहता है’ या गीताचा... 
............
‘सुनहरे गीत’मध्ये अभिनेत्री रेखा आणि तिच्या गाण्याबद्दल लिहीत असताना ‘अमिताभ’ हा उल्लेख अपरिहार्य होता. तेवढा उल्लेख करून थांबावे, अशी नियतीची इच्छा नसावी. १० ऑक्टोबर (रेखाचा जन्मदिवस) झाल्यानंतर ११ ऑक्टोबर येणे अपरिहार्य आहे; पण ११ ऑक्टोबरला अमिताभ यांचा जन्मदिवस येणे हा एक विलक्षण योगायोग नाही का?

अमिताभ, एक महानायक. अमिताभ हे एके काळी वादग्रस्त असलेले व्यक्तिमत्त्व. अमिताभ म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील शतकाचा अभिनेता. जसे लता मंगेशकर यांच्याबद्दल आजपर्यंत बरेच काही लिहून आले आहे, तसेच अमिताभ यांच्या बाबतीत आहे. त्यांचे चित्रपटसृष्टीतील आगमन, त्यांचे सुरुवातीचे फ्लॉप चित्रपट आणि ‘जंजीर’नंतरची लोकप्रियता! आणि नंतर पडलेला ‘अँग्री यंग मॅन’चा शिक्का. त्यानंतर राजकारणात प्रवेश. त्याआधी त्यांचे मोठे आजारपण. आणि त्या सर्वांमधून बाहेर येत असताना फ्लॉप झालेले जादूगर, महान, लाल बादशहा, इत्यादी चित्रपट. 

अमिताभ संपला ही आवई उठली. वयोमानानुसार बदललेला त्याचा चेहरा, त्याची चित्रपट संस्था... हे सगळे एक मोठी उडी घेण्यासाठी नियतीनेच मागे मागे घेतलेली धाव होती. त्या ठिकाणी एक जोर लावून धाव घेतली गेली आणि मग जो विक्रम झाला तो अद्वितीय ठरला.

‘ब्लॅक’सारख्या चित्रपटातून अभिनयसंपन्न अमिताभ लोकांपुढे आला. खरे तर तो त्यापूर्वीच बेमिसाल, कभी कभी, सिलसिला अशा काही चित्रपटांमधून आपल्या अभिनयसंपन्नतेचे दर्शन घडवून गेला होता; पण पब्लिकला ते तितके भावले नव्हते. आणि या सेकंड इनिंगमध्ये स्टार अमिताभपेक्षा अॅक्टर अमिताभ एक एक वरची पायरी चढत गेला आणि अजूनही जातो आहे. एके काळी रेखा आणि अमिताभ यांच्यावर बोलणे, लिहिणे सहज घडून जायचे; पण आज अमिताभ यांच्या वयाच्या ७६व्या वर्षी अॅक्टर अमिताभ हाच विषय महत्त्वाचा ठरतो. कारण २००१नंतर आलेले त्यांचे चित्रपट त्या दृष्टिकोनातून परिपूर्ण आहेत.

आणि फक्त अॅक्टर अमिताभ हा त्यांच्या बद्दलचा विषय राहतो, असे नसून, हे व्यक्तिमत्त्व गेल्या १६-१७ वर्षांत भारतीयांपुढे कसे आले आहे, तेही पाहणे फार आवश्यक आहे. दूरदर्शनचा प्रभाव वाढू लागला, तेव्हा चित्रपट कलावंत आता या पडद्यावरही दिसतात म्हणून लोक अप्रूपाने पाहू लागले. हा छोटा पडदाही अमिताभ यांनी गेल्या १६-१७ वर्षांत ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाने काबीज केला. या छोट्या पडद्याने अॅक्टर अमिताभचे अनेक चित्रपट दाखवले व आजही दाखवले जात आहेत; पण या छोट्या पडद्यावर अमिताभ अॅक्टर म्हणून जेवढा लोकप्रिय झाला, तेवढाच तो ‘अँकर’ म्हणून लोकप्रिय ठरला. कार्यक्रम सादर करण्याची आकर्षक पद्धती, वाक्यातील चढ-उतार, अशा अनेक गोष्टींमधून अमिताभ यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. यामधून हा कलावंत छोट्या पडद्यावरही लोकप्रिय ठरला. 

त्याचबरोबर भारत सरकारच्या पोलिओ निर्मूलन मोहिमेत, स्वच्छता अभियानातही सहभाग घेऊन त्यांनी आपण केवळ कलावंत नसून सामाजिक बांधिलकी जपणारे भारतीय आहोत, हेही दाखवून दिले आहे. महाराष्ट्रावर किंवा भारतातील कोणत्याही भागात विविध स्वरूपाच्या आपत्ती आल्या, तेव्हा केलेल्या आर्थिक मदतीचा गाजावाजा न करणारा अभिनेता, हे अमिताभचे एक वेगळे रूप आहे. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला त्याच्या वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा देऊन त्याच्या एका ‘सुनहऱ्या’ गीताकडे वळू या.

अमिताभ यांनी पडद्यावर गायलेल्या गीतांमध्ये प्रेमगीतांचेच प्रमाण कमी आहे. अर्थात तो १९७०नंतरच्या बदललेल्या काळाचा परिणाम होता. हिंदी चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ १९५० ते १९६० हा मानला जातो. परंतु १९६०नंतरच्या पुढील दहा वर्षांत या सुवर्णयुगाचे अनेक सुवर्णकण कित्येक गीतांमधून ऐकायला मिळाले. एखादा काळ असा एकदम संपुष्टात येत नाही. त्याच्या काही खुणा पुढील काळाच्या काही टप्यांपर्यंत दिसतच राहतात. त्याप्रमाणे १९६० ते १९७० या दशकातील चित्रपटगीते तशी पूर्ण टाकाऊ नव्हती. कित्येक गीते आशयपूर्ण व सुमधुर होती. 

परंतु १९७०नंतर चित्रपटांची कथानके बदलली. ओघानेच त्याचा परिणाम चित्रपटगीतांवर झाला. सूडपटांची लाट आली, तेव्हा त्यामध्ये भावपूर्ण गीते कशी आढळावीत? अमिताभ यांच्या लोकप्रियतेचा काळ तो हाच - १९७० ते १९८०चा. त्यामुळे त्यांच्या वाट्याला आलेली गीते कामचलाऊ संगीताची व शब्दांची जुळवाजुळव केलेलीच आहेत. परंतु त्यातही काही अप्रतिम, तसेच आशयपूर्ण अशी गीते त्यांच्या वाट्याला आली. ती त्यांनी अप्रतिमपणे पडद्यावर साकार केली. अशा काही मोजक्या गीतांपैकी एक गीत होते १९७४च्या ‘मजबूर’ चित्रपटातील.

लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे संगीत, आनंद बक्षी यांचे शब्द व किशोरकुमार यांचा स्वर या सगळ्या मिश्रणातून निर्माण झालेली गीते तद्दन व्यावसायिकच होती. परंतु मध्येच केव्हा तरी आनंद बक्षी यांच्यातील प्रतिभावंत शायर असे अप्रतिम लिहून जायचा, की ते गीत मनामध्ये कायमचेच ठाण मांडायचे.

अशा प्रकारच्या त्यांच्या काही गीतांमधील हे एक आशयपूर्ण गीत. मजबूर चित्रपटाच्या कथानकानुसार नायकाला आपण मृत्यूच्या जवळ आलेलो आहोत, हे कळते आणि ओघानेच तो मानवी जीवनाबद्दलचे भाष्य करणारे गीत गातो. अर्थात आनंद बक्षींनी हे गीत एकूण मानवी जीवनाबद्दल भाष्य करणारे व छानपणे मार्गदर्शन करणारे लिहिले आहे. त्यामुळेच मला ते सुनहरे वाटते. 

बघा. काय आहे त्या गीतात - किशोरदा सुरुवात करतात - पडद्यावर अर्थातच ऐन तारुण्यातील अमिताभजी -

कभी सोचता हूँ के मैं चूप रहूँ

कधी मला वाटते, की मी काही सांगावे (तर) कधी मला वाटते, की मी गप्प बसावे, चूप राहावे (पण आता मात्र सांगतोच, की)

आदमी जो कहता है, आदमी जो सुनता है 
जिंदगीभर वो सदायें पीछा करती है
आदमी जो देता है, आदमी जो लेता है 
जिंदगीभर वो दुवाएँ पीछा करती है

माणूस जे बोलतो, माणूस जे ऐकतो, त्याचा प्रतिसाद (प्रतिध्वनी) आयुष्यभर त्याचा पाठलाग करत असतो. माणूस जे देतो, जे घेतो, त्यामुळे मिळणाऱ्या सदिच्छा (अगर शाप, तळतळाटसुद्धा) आयुष्यभर त्याचा पाठलाग करत असतात. (त्याच्या वाट्याला येतात.)

जैसी करनी, वैसी भरनी, करावे तसे भरावे, चांगले करा चांगलेच होईल, वाईट करा वाईट होईल, या सर्व तत्त्वज्ञानाचा आशय सांगणाऱ्या या वरील चार ओळी हे या गीताचे ध्रुवपद आणि मग पुढे कवी सांगतो -

कोई भी हो हर ख्वाब तो सच्चा नहीं होता
बहुत जादा प्यार भी अच्छा नहीं होता. 
कभी दामन छुडाना तो मुश्कील हो 
प्यार के रिश्ते टूटे तो, प्यार के रस्ते छूटे तो
रास्तो में फिर वफाएँ पीछा करती है

(या जगात) कोणीही असू दे, त्याचे प्रत्येक स्वप्न सत्यात उतरत नाही. (पाहिजे त्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला मिळतातच असे नाही. काहीतरी उणीव प्रत्येकाच्या जीवनात राहतेच.) अति प्रेमही चांगले असत नाही. (कारण जीव मग त्या मायापाशात गुंतत राहतो, हे प्रतिकात्मक रूपाने सांगताना कवी लिहितो) प्रेमाची नाती तुटली, प्रेमाचा मार्ग सुटला, तरी जीवनाच्या वाटचालीत त्या निष्ठा (ते विचार) पाठलाग करत राहतातच.

हे तत्त्वज्ञान सांगून कवी पुढील कडव्यात मानवी मनाचा लहरीपणा, विक्षिप्तपणा सांगताना म्हणतो, की - 

कभी कभी मन धूप के कारण तरसता है 
कभी कभी फिर झूम के सावन बरसता है 
पलक झपके यहाँ मौसम बदल जाये 
प्यास कभी मिटती नहीं, एक बूंद भी मिलती नहीं 
और कभी रिमझिम घटाएँ पीछा करती है 

कधी कधी हे मानवी मन सूर्यकिरणांचा उबदारपणा मिळावा म्हणून व्याकूळ होत असते. मग कधी कधी श्रावणसरी चिंब भिजवून टाकतात. या दुनियेत पापणी लवण्याच्या कालावधीतही ऋतू बदलून जातो. क्षणात सुख संपते, परिस्थिती बदलते. जीवनात तृष्णा कधी शांत होत नाही. (एक झाली, की दुसरी इच्छा डोके वर काढतेच.) पाहिजे तेव्हा सौख्याचा एक थेंब मिळत नाही आणि नंतर मात्र कृष्णमेघ बरसतात. 

असे हे बेभरवशाचे मानवी जीवन आहे. म्हणून हे मानवा, तू सत्कृत्य करीत जा, असा गर्भितार्थ या काव्यात दडला आहे. अमिताभ यांनी पडद्यावर गायलेल्या काही मोजक्या ‘सुनहऱ्या’ गीतांपैकी हे एक गीत आहे. आणि तत्त्वज्ञानही चित्रपटगीतांमधून सांगितले गेले होते, हे दर्शवणारे असे हे ‘सुनहरे’ गीत आहे. 

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत. चित्रपट अभ्यासक अमोल उदगीरकर यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल लिहिलेला विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search