Next
पन्हाळे कुटुंबीयांनी जपली आहे शतकाहून अधिक काळ सुवर्ण गौरीपूजनाची परंपरा
BOI
Thursday, September 12, 2019 | 12:00 AM
15 0 0
Share this article:

गौरीपूजन करताना संगीता पन्हाळे आणि अभिजित पन्हाळे

पुणे : गणरायाच्या आगमनानंतर सुखसमृद्धीच्या पावलांनी घरात येणाऱ्या गौरींचे पूजन हा एक अवर्णनीय सोहळा असतो. पुण्यातील कॅम्प परिसरातील पन्हाळे कुटुंबीयांच्या घरात शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ जुन्या सोन्याच्या गौरीपूजनाची परंपरा असल्याने त्यांच्याकडे हा सोहळा अगदी विलक्षण असतो. 

विशेष म्हणजे, पन्हाळे यांच्या वास्तूही १९४२ मध्ये उभारण्यात आलेली असून, त्याच घरात आजही त्याच पारंपरिक पद्धतीने गणशोत्सव साजरा होतो. मोठ्या संख्येने आप्त, मित्रपरिवार या सोहळ्यासाठी त्यांच्या घरी हजेरी लावतो. 

यंदाही अगदी पारंपरिक पद्धतीने अभिजित आणि संगीता पन्हाळे यांनी गौरीपूजन केले. आजच्या आधुनिक काळातही संगीता पन्हाळे अगदी पूर्वापार चालत आलेल्या रितीरिवाजानुसार गौरीपूजन करतात. आजही त्या गौरीच्या नैवेद्यासाठीचे सर्व फराळाचे जिन्नस शुद्ध तुपात घरीच बनवतात. गौरींची आसनव्यवस्थाही अत्यंत अचूक माप घेऊन अत्यंत काटेकोरपणे तयार करण्यात येते. एकदा या गौरी उभ्या केल्या की एक मिलीमीटरही हलता कामा नयेत, इतकी दक्षता बाळगावी लागते. गौरींचे मुखवटे हे पितळी, मातीचे असतात; पण पन्हाळे यांच्या घराण्याच्या या परंपरागत चालत आलेल्या गौरींचे मुखवटे सोन्याचा मुलामा दिलेले आहेत, त्याचीही एक कहाणी आहे. 

त्याबाबत माहिती देताना संगीता पन्हाळे म्हणाल्या, ‘१९३५ पासून पन्हाळे कुटुंबीयांच्या गौरींचे मुखवटे सोन्याचे आहेत. त्याआधी ते तांब्याचे होते. १८८०च्या सुमारास काशीबाई पन्हाळे त्यांचा मुलगा शंकर पन्हाळे यांना घेऊन पुण्याला आल्या तेव्हा त्यांच्याकडे असलेल्या गौरींचे मुखवटे तांब्याचे होते. शंकरराव पन्हाळे यांच्या पत्नी सोनुबाई पन्हाळे यांनी मुलगा झाल्यास गौरींचे पुतळे सोन्याचे करीन, असा नवस केला होता. त्यांचा नवस पूर्ण झाला आणि १९३५ मध्ये त्यांनी मूळ तांब्याच्या मुखवट्यांना सोन्याचा मुलामा देऊन घेतला. तेंव्हापासून या सोन्याच्या गौरींचे पूजन केले जाते. शंकरराव पन्हाळे यांचे पुण्यातील विकासात मोठे योगदान असून, त्यांना इंग्रज सरकारने रावसाहेब पदवी दिली होती. स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना मदत केली होती. अनेकांना आश्रय दिला होता. कॅम्प परिसरात लोकमान्य टिळक यांनी कामाठीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, तेव्हा शंकरराव पन्हाळे यांचा त्यात सक्रीय पुढाकार होता. कॅम्प एज्युकेशन सोसायटीशीही ते निगडीत होते. भारत सरकारने त्यांना १९७३ मध्ये त्यांना पदमश्री बहाल केली होती. असा उज्ज्वल इतिहास असलेल्या या घराण्याच्या परंपरा, रिती यांचा आम्हाला अभिमान आहे, त्यामुळे आम्ही अगदी मनापासून या परंपरा जपत आहोत. आपली समृद्ध संस्कृती जपली जावी, यासाठी प्रयत्न करत आहोत.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search