Next
पहिलं पाऊल टाकणाऱ्या तेजस्विनी
BOI
Thursday, March 08 | 08:30 AM
15 0 0
Share this storyविविध क्षेत्रांत पहिला ठसा उमटवणाऱ्या देशातल्या ११२ महिलांना केंद्र सरकारने अलीकडेच फर्स्ट लेडी पुरस्कार देऊन गौरविलं. त्या सर्व महिलांच्या प्रेरणादायी वाटचालीची माहिती देणारी ‘पहिलं पाऊल टाकणाऱ्या तेजस्विनी’ ही विशेष लेखमाला आम्ही आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून आजपासून प्रसिद्ध करत आहोत. या लेखमालेचा हा पहिला भाग... 
..........
आज आठ मार्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिन. विसाव्या शतकाच्या आरंभी अमेरिका आणि युरोपमध्ये कामगार महिलांनी केलेल्या यशस्वी आंदोलनाच्या सन्मानार्थ महिला दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर मतदानाचा अधिकार, व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याचा अधिकार, कामाच्या ठिकाणी समान वागणूक मिळण्याचा हक्क याबरोबरच अगदी जागतिक महायुद्धाच्या विरोधातही महिलांनी यशस्वी लढा देऊन महिला दिनाचं औचित्य सार्थ केलं. तेव्हापासून आजतागायत महिलांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं आहे; पण या साऱ्यामागे त्या त्या क्षेत्रात पहिलं यशस्वी पाऊल टाकणाऱ्या महिलांची मोठी तपश्चर्या आहे. त्यांच्यामुळे अन्य महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या पदचिन्हांवरून वाटचाल करत, आज अनेक जणी उत्तुंग यश मिळवत आहेत. 

आपापल्या क्षेत्रात पहिला ठसा उमटवणाऱ्या देशातल्या महिलांना केंद्र सरकारने २० जानेवारी २०१८ रोजी फर्स्ट लेडी पुरस्कार देऊन गौरविलं. महिला व बालकल्याण मंत्रालयानं आयोजित केलेल्या एका विशेष समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या सर्व जणींचा सन्मान करण्यात आला. त्या सर्व महिलांच्या प्रेरणादायी वाटचालीची माहिती देणारी ‘पहिलं पाऊल टाकणाऱ्या तेजस्विनी’ ही विशेष लेखमाला आम्ही आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून आजपासून प्रसिद्ध करत आहोत. या लेखमालेचा हा पहिला भाग...

गगनभरारी घेणाऱ्या रणरागिणी :

काश्मिरी हवाईकन्या आयेशा अझीझ :
वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी विमान चालवण्याचा प्रशिक्षणार्थी परवाना मिळवणारी आयेशा ही काश्मीरमधली पहिलीच महिला वैमानिक आहे. २०१२मध्ये तिनं पहिल्यांदा रशियाच्या सोकुल विमानतळावरून मिग २९व सेसना १७२आर ही विमानं यशस्वीरीत्या चालवली. २०१६मध्ये ‘बॉम्बे फ्लाइंग क्लब’मधून विमान चालवण्याची पदवी मिळवल्यानंतर तिला व्यावसायिक विमानचालक परवाना मिळाला. लहानपणापासून पाहिलेलं वैमानिक होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, न डगमगता प्रयत्न करणारी आयेशा सगळ्यांसाठीच एक प्रेरणा आहे. 

हवाई दलाची महिला फायटर पायलट तुकडी :
भारतीय हवाई दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांना फायटर पायलट बनण्याची संधी देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी झाला. आठ मार्च २०१६ रोजी तत्कालीन हवाई दलप्रमुख अरूप राहा यांनी त्याबाबतची घोषणा केली. फ्लाइंग ऑफिसर भावना कांत, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंग या तिघींची पहिल्या लढाऊ विमानचालक म्हणून प्रशिक्षणासाठी निवड झाली. बिहारमधील एका गावात सामान्य कुटुंबात जन्माला आलेली भावना लहानपणापासूनच फायटर पायलट होण्याचं स्वप्न पाहत होती. मध्य प्रदेशमधील रेवा इथं राहणारी अवनी कॉलेजमध्ये असताना फ्लाइंग क्लबची सदस्य होती. तिथूनच तिला हवाई दलात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली. वडील आणि आजोबा यांच्यामुळे हवाई दलाची पार्श्वभूमी असलेल्या राजस्थानमधील झुनझुनुच्या मोहनाचं हवाई दलात जाणं साहजिकच होतं. 

सर्वोत्कृष्ट साहसी महिला निवृत्त कॅप्टन रुची शर्मा :
कॅप्टन रुची शर्मा या प्रत्यक्ष लष्करात काम केलेल्या पहिल्या पॅराट्रूपर आहेत. ‘आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स’मधून राष्ट्रपतींच्या सुवर्णपदकासह प्रशिक्षण पूर्ण केलेल्या रुची यांनी भारतीय लष्कराच्या पॅराशूट ब्रिगेडमध्ये ‘मरून बेरेटास’ तुकडीत स्थान मिळविलं. अत्यंत विपरीत परिस्थितीत उत्कृष्ट कामगिरी करून दाखवण्याचं तुमचं कौशल्य या तुकडीत पणाला लागतं. लेह-लडाखसारख्या अतिशय कठीण भागात काम केलेल्या रुची यांना १९९९मध्ये ऑर्डनन्स कॉर्प्सकडून ‘सर्वोत्कृष्ट साहसी महिला’ म्हणून ‘जनरल ओबेरॉय चषक’ देऊन सन्मानित करण्यात आलं. ‘असामान्य कामगिरी करणाऱ्या पॅराट्रूपर्सच्या तुकडीत सहभागी होणं हे माझं स्वप्न होतं,’ असं म्हणणाऱ्या रुची शर्मा ‘मी एक व्यावसायिक पॅराट्रूपर आहे, केवळ हौशी नाही,’ असं अभिमानानं सांगतात.

ईशान्य भागात खासगी हवाई वाहतूक सुरू करणाऱ्या कॅप्टन शोभा के. मणी :
कॅप्टन शोभा यांनी ‘नॉर्थ इस्ट शटल्स’ या खासगी हवाई वाहतूक सेवेची स्थापना केली. खासगी हवाई वाहतूक सेवा सुरू करणाऱ्या त्या देशातील पहिल्याच महिला आहेत. चार्टर्ड विमानांच्या सेवेपासून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. देशाच्या ईशान्य भागातील छोट्या छोट्या शहरांना विमानसेवेनं जोडण्याचं काम त्यांनी यशस्वी करून दाखवलं. ‘ईशान्येकडील भागात भौगोलिक परिस्थितीमुळे रस्ते व रेल्वे वाहतूक सेवा तितकीशी सक्षम नाही. म्हणूनच मी विमानसेवा सुरू केली,’ असं त्या सांगतात.

अंतराळवीर कल्पना चावला :
अंतराळात झेपावणारी भारतीय वंशाची पहिली महिला म्हणजे कल्पना चावला. १९८८मध्ये त्यांनी अमेरिकेतील कोलोरॅडो विद्यापीठातून विमान अभियांत्रिकी शाखेत पीएचडी मिळवली. १९८८मध्येच त्यांनी ‘नासा’च्या एम्स संशोधन केंद्रात काम करण्यास सुरुवात केली. अंतराळ संशोधन संस्थेचं सन्मानपदक मिळवणाऱ्या कल्पना चावला यांनी १९९७मध्ये ‘कोलंबिया स्पेस शटल’मधून प्रथमच अंतराळ प्रवास केला. या मोहिमेत त्या विशेषज्ञ, तसंच ‘रोबोटिक आर्म ऑपरेटर’ म्हणून सहभागी झाल्या होत्या. त्या मोहिमेतच त्यांचं दुर्दैवी, अपघाती निधन झालं.

युद्धभूमीवर काम केलेल्या पॅराट्रूपर जोसिसिला फरिदा रेहाना :
निवृत्त लेफ्टनंट कर्नल जोसिसिला या भारतीय लष्करातील पहिल्या पॅराट्रूपर. १९४०मध्ये म्हैसूरमध्ये जन्मलेल्या रेहाना या वैद्यकशास्त्रातील पदवीधर. १९६२च्या युद्धानंतर लष्करानं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत त्या १९६४मध्ये लष्करी सेवेत रुजू झाल्या. १९७१च्या युद्धात त्यांनी पॅराशूट मेडिकल सेवेद्वारे भाग घेऊन प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन काम केलं. लष्करातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये ‘जनरल चौधरी चषक’ मिळवणाऱ्या त्या पहिल्याच महिला अधिकारी आहेत. 

सागरकन्या :

मर्चंट नेव्ही कॅप्टन राधिका मेनन :
राधिका मेनन २०१२मध्ये ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ या कंपनीत रेडिओ ऑफिसर म्हणून रुजू झाल्या. त्या देशातल्या पहिल्या मर्चंट नेव्ही कॅप्टन आहेत. दृढ निर्धार आणि साहस या गुणांच्या मदतीनं त्यांनी ‘दुर्गम्मा’ या बुडणाऱ्या नौकेतील सात मच्छिमारांची सुखरूप सुटका केली. या त्यांच्या साहसी कृत्याच्या सन्मानार्थ इंटरनॅशनल मेरिटाइम ऑर्गनायझेशननं त्यांना ‘एक्सेप्शनल ब्रेव्हरी अॅट सी’ हा पुरस्कार प्रदान केला.

जलपरी बुला चौधरी :
वयाच्या पाचव्या वर्षापासून पोहण्याचं रीतसर प्रशिक्षण घेणाऱ्या बुला चौधरी यांनी नवव्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन सहा सुवर्णपदकं पटकावली. १९९१मध्ये झालेल्या साउथ एशियन फेडरेशन गेममध्येही त्यांनी सहा सुवर्णपदकं मिळवली. १९८९मध्ये त्यांनी पहिल्यांदा इंग्लिश खाडी पार केली. त्यानंतर जिब्राल्टरची खाडी, कुक स्ट्रेट, टिऱ्हेनियन, टोरोनिअस गल्फ, कॅटलिना खाडी आणि थ्री अँकर बे पोहून पार केलेल्या बुला चौधरी यांच्या नावावर जगातील पाच खंडांमधील खाड्यांमध्ये पोहण्याच्या विश्वविक्रमाची नोंद आहे.

विक्रमवीर भक्ती शर्मा :
आपल्या आईकडून पोहण्याचे प्राथमिक धडे घेतलेल्या भक्ती शर्मा हिनं जगातल्या पाचही समुद्रांत पोहण्याचा पराक्रम केला आहे. तिच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. २०१५मध्ये अंटार्क्टिक समुद्रात, हातपाय गोठवणाऱ्या एक अंश सेल्सिअस तापमानात २.२८ किलोमीटर अंतर ४१.१४ मिनिटांत पार करून तिनं नवा विश्वविक्रम नोंदवला. अशा प्रकारची कामगिरी करणारी ती जगातली सर्वांत लहान आणि आशियातली पहिलीच महिला ठरली.

अंटार्क्टिकावर पोहोचलेली पहिली भारतीय महिला अदिती पंत :
पुणे विद्यापीठात विज्ञान शाखेत पदवीचं शिक्षण घेत असताना अॅलिस्टर हार्डी यांनी लिहिलेलं ‘दी ओपन सी’ हे पुस्तक अदिती पंत यांच्या वाचनात आलं. या पुस्तकातून प्रेरणा घेऊन महासागर विज्ञानातच करिअर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी अमेरिकेत जाऊन समुद्र विज्ञानाचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि पीएचडी मिळवली. त्यानंतर त्यांनी गोव्यातल्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेत काम करायला सुरुवात केली. १९८३मध्ये त्या भारताच्या अंटार्क्टिक मोहिमेत सहभागी झाल्या. भारत सरकारनं ‘अंटार्क्टिक पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान केला. 

इंग्लिश खाडी पार करणारी पहिली भारतीय महिला आरती साहा :
वयाच्या चौथ्या वर्षापासून पोहणाऱ्या आरती साहा यांनी अनेक राज्यस्तरीय स्पर्धा जिंकल्या. १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेतही त्यांनी भाग घेतला होता. जलतरणपटू मिहीर सेन यांना आदर्श मानणाऱ्या आरती यांनी १९५९मध्ये इंग्लिश खाडी पार केली. त्यांच्या या कामगिरीचा गौरव करण्यासाठी पोस्टानं विशेष टपाल तिकीट प्रकाशित केलं होतं. भारत सरकारनंही त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं. 

उत्तुंग शिखरांच्या राण्या :

एव्हरेस्ट वीरांगना बचेंद्री पाल :
१९८४मध्ये माउंट एव्हरेस्ट सर केलेल्या बचेंद्री पाल या एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. त्यांच्याबरोबर या मोहिमेत सहा महिला होत्या; पण एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणाऱ्या त्यांच्या तुकडीतल्या त्या एकमेव महिला गिर्यारोहक ठरल्या. त्यानंतरही १९९३, १९९४मध्ये त्यांनी एव्हरेस्ट मोहिमेत भाग घेतला. १९९७मध्ये त्या सर्व महिलांचा समावेश असलेली एक तुकडी घेऊन त्या एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या कामगिरीचा गौरव म्हणून भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कार आणि राष्ट्रीय साहस पुरस्कार प्रदान केला आहे. 

अंशू जामसेनपा : अरुणाचल प्रदेशातल्या, दोन मुलांची आई असलेल्या अंशू जामसेनपा या महिलेने एव्हरेस्ट शिखर पाच दिवसांत दोनदा आणि एकूण पाच वेळा सर करण्याची कामगिरी केली. अशी कामगिरी करणारी अंशू ही पहिली महिला आहे.

कुशल सारथी :


पहिल्या प्रवासी रेल्वेचालक सुरेखा यादव :
महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातल्या एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुरेखा यादव १९८८मध्ये भारतातल्या पहिल्या महिला रेल्वेचालक बनल्या. २०११मध्ये महिला दिनानिमित्त पुणे ते मुंबई डेक्कन क्वीन ही रेल्वेगाडी चालवून त्यांनी नव्या विक्रमाची नोंद केली. घाट असलेल्या मार्गावर रेल्वे चालवणाऱ्या त्या पहिल्या आशियाई महिला ठरल्या. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन विविध संस्था, संघटनांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात यशस्वी पाऊल रोवून त्यांनी महिलांना एक नवी वाट दाखवून दिली आहे. 

बसचालक व्ही. सरिता :
‘दिल्ली ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशन’च्या पहिल्या महिला बसचालक असलेल्या व्ही. सरिता आज दिल्लीसारख्या मोठ्या शहरात हजारो महिला प्रवाशांना सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचवण्याचं काम करत आहेत. तेलंगणा राज्यातील एका खेड्यातून आलेल्या सरिता यांनी कुटुंबाच्या मिळकतीला हातभार लावण्यासाठी हे काम सुरू केलं. दिल्लीत बसचालक म्हणून काम करण्यापूर्वी त्यांनी रिक्षाचालक म्हणून, हैदराबादमध्ये बसचालक म्हणून आणि त्यानंतर दिल्लीत टॅक्सीचालक म्हणून काम केलं आहे. त्यांच्या या कामामुळे आणखी काही महिलांना या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळेल, अशी त्यांना आशा आहे. 

पहिल्या महिला रिक्षाचालक शीला डावरे :
१९८८ ते २००१ अशी तब्बल तेरा वर्षं परभणीत रिक्षाचालक म्हणून काम केलेल्या शीला डावरे यांच्या कामाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’नंदेखील घेतली आहे. ‘मी काही विक्रमासाठी हे काम केलं नाही. मी देशातली पहिली महिला रिक्षाचालक आहे हे मला इतरांकडूनच समजलं,’ असं परभणीतून कामाच्या शोधात पुण्यात आलेल्या शीला डावरे नम्रपणे सांगतात. २००१मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळं काम बंद करावं लागल्यानंतर त्यांनी महिलांना वाहन चालवण्याचं व्यावसायिक प्रशिक्षण देणारी संस्था सुरू केली आहे. 

संघर्षाची कहाणी - सेल्वी गौडा :
कर्नाटकातल्या सेल्वी गौडा यांचा १४व्या वर्षी बालविवाह झाला. या विवाहामुळे त्यांना अत्यंत कष्टदायक अशा मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरं जावं लागलं. परंतु त्यातूनही अतिशय धाडसानं त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली आणि म्हैसूरमधल्या एका ‘एनजीओ’त दाखल झाल्या. तिथे आल्या तेव्हा त्यांना सायकलसुद्धा चालवता येत नव्हती; मात्र निश्चयाच्या बळावर त्या २००४मध्ये टॅक्सीचालक बनल्या. इतकंच नाही, तर इतर महिलांना स्वावलंबनाचा हा मार्ग दाखवत त्यांनी महिलांची टॅक्सी संघटना स्थापन केली. ‘फर्स्ट लेडी’ पुरस्कार मिळवणाऱ्या सेल्वी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘ड्राइव्हिंग विथ सेल्वी’ या लघुपटालादेखील पुरस्कार मिळाला आहे. (या लघुपटाची झलक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

कार प्रशिक्षक स्नेहा कामत :
पुरुष प्रशिक्षकांकडून कार चालवण्याचं प्रशिक्षण घेताना येणाऱ्या अडचणींतून मार्ग काढण्याच्या उद्देशानं स्नेहा कामत यांनी २०१२मध्ये ‘शी कॅन ड्राइव्ह’ ही महिलांना महिलांकडूनच कार चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जाणारी संस्था स्थापन केली. अशा प्रकारची ही भारतातली एकमेव संस्था आहे. आजतागायत त्यांनी सुमारे चारशे महिलांना कार चालवण्याचं प्रशिक्षण दिलं आहे. महिलांना वाहन चालवण्याचा आत्मविश्वास मिळवून देण्याचं काम त्या करतात. ‘स्त्रियांमधला आत्मविश्वास जागृत झाला, तर त्या कुठलंही काम उत्कृष्टपणे करू शकतात,’ यावर स्नेहा कामत यांचा विश्वास आहे. 

(महिला दिनाबद्दलचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील सर्व विशेष लेख https://goo.gl/zuvB57 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत. या महिलांबद्दलचा सोबतचा व्हिडिओ जरूर पाहा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link