Next
नवजीवन देण्यासाठी धडपडणारी ‘रीबर्थ फाउंडेशन’
BOI
Friday, January 18, 2019 | 04:15 PM
15 0 1
Share this article:

पुण्यातील रीबर्थ फाउंडेशन ही संस्था अवयवदानासंदर्भात जनजागृतीचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करते. या संस्थेने अवयवदानासंदर्भात माहिती देणारी टोल फ्री हेल्पलाइनही सुरू केली आहे. तसेच जनजागृतीसाठी शॉर्टफिल्म स्पर्धेसह विविध प्रकारचे उपक्रम ही संस्था राबवत असते. ‘लेणे समाजाचे’ या सदरात आज माहिती घेऊ या रीबर्थ फाउंडेशनच्या कार्याची...
...........
पुणे शहराचा सांस्कृतिक इतिहास सर्वश्रुत आहे; पण पुणे शहराचा वैद्यकीय इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा ११ मे २०१६ हा दिवस सुवर्णाक्षरांनी त्यामध्ये नोंदवला जाईल. पुणे शहरात या दिवशी दोन ‘ग्रीन कॉरिडॉर’ करण्यात आले. त्यामुळे पुण्यातील आणि नाशिकमधील एकेका रुग्णाचा जीव वाचला. पुणे, मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखा, मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटल, पुण्यातील जहांगीर, तसेच सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी हे जीव वाचविण्यात मोलाची भूमिका बजावली. एका ‘ब्रेन डेड’ रुग्णाने हृदय, तर दुसऱ्याने यकृत (लिव्हर) दान केले आणि या यंत्रणांनी ते वेळेत योग्य ठिकाणी पोहोचवले आणि त्याचे शरीरांत रोपण केले. पोलिसांनी जहांगीर हॉस्पिटल ते विमानतळ आणि मोशी ते डेक्कनचे सह्याद्री हॉस्पिटल या रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रित करून हे अवयव घेऊन जाणाऱ्या वाहनांना मोकळा रस्ता उपलब्ध करून दिला. त्यामुळे हे यश मिळवता आले. या घटनेमुळे पुणेकरांनी पहिल्यांदाच वैद्यकीय क्षेत्रातील वेगवान कामाचा अनुभव घेतला. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे अवयवदानाचे महत्त्व.

यूबीएस आयटी कंपनीतील जनजागृती मोहिमेत सहभागी रीबर्थ फाउंडेशनचे स्वयंसेवक.

‘ब्रेन डेड’ व्यक्तींनी वेळेवर अवयवदान केले, तर त्याचे आठ अवयव दुसऱ्या रुग्णासाठी वापरता येऊ शकतात. त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी घेतलेल्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात, हे खरे असले, तरीही अजून समाजात अवयवदानाबद्दल खूप कमी माहिती आहे. अवयवदानाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी रीबर्थ फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था काम करते. अवयवदानामुळे एखाद्या रुग्णाचा अक्षरश: पुनर्जन्मच होतो. समाजात याबद्दल जागृती झाली, तर भविष्यात अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. ही जाणीव प्रखर झाल्याने काही तरुणांनी एकत्र येऊन रीबर्थ फाउंडेशन ही संस्था स्थापन केली. या संस्थेचे अध्यक्ष राजेश शेट्टी यांनी संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली.

ते म्हणाले, ‘अवयवदानाबद्दल आम्ही सगळेच ऐकून होतो. त्याबद्दल मनात कुतूहलही होते. २०१४मध्ये एका शॉर्ट फिल्म स्पर्धेसाठी मी आणि काही मित्रांनी या विषयावर फिल्म तयार केली. हे काम करताना या विषयाची आम्हाला अधिक समज आली; पण या विषयाबाबत आपल्या समजात अजिबात जागृती नाही हे लक्षात आले. रुग्णांना असलेली अवयवांची गरज आणि त्यांचा पुरवठा यामध्ये खूप मोठी दरी होती. अर्थात, अवयवदान हे बोलण्याइतके सोपे नाही हे माहीत होते. आम्हाला काय करता येईल याचा विचार झाल्यावर अवयवदानाबद्दल जनजागृती करणाऱ्या संस्थेची कल्पना पुढे आली. पाच मार्च २०१५ रोजी आम्ही ४० जणांनी रीबर्थ फाउंडेशनची स्थापना केली. आता आमच्या सदस्यांची संख्या १०६ झाली आहे. आम्ही सगळे निरनिराळ्या क्षेत्रांत काम करणारे आहोत.’

अवयवदानाबद्दल सामान्य जनतेला माहिती देण्यासाठी ‘रीबर्थ’च्या माध्यमातून तीन उपक्रम राबवले जातात. पहिला उपक्रम ‘ग्रीन कॉरिडॉर’ ही शॉर्ट फिल्म तयार करण्याची स्पर्धा. यामध्ये अवयवदानाशी संबंधित शॉर्ट फिल्म तयार करून फाउंडेशनकडे पाठवायची असते. सर्वोत्तम फिल्मला बक्षीस देण्यात येते. 

ग्रीन कॉरिडॉर शॉर्ट फिल्म स्पर्धेच्या उद्घाटनावेळी अध्यक्ष राजेश शेट्टी व इतर मान्यवर.

‘आमच्या ग्रीन कॉरिडॉर उपक्रमाला तरुणांकडून खूपच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या काही स्पर्धांमध्ये मिळून आमच्याकडे १०६ फिल्म आल्या आहेत. यापैकी काही यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. फिल्मच्या निमित्ताने तरुण-तरुणी या विषयाचा अभ्यास करतात. माहिती मिळवतात. आपोआपच अवयवदानाचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचतो. तरुण व्यक्तीने ‘ब्रेन डेड’ अवस्थेत अवयवदान केले, तर त्याचे आठ अवयव इतर रुग्णांना दिले जाऊ शकतात. त्यामुळे तरुणांना ही माहिती देण्याचा आमचा उद्देश होता, तो सफल झाला. या स्पर्धेला भारतभरातून उत्तम प्रतिसाद लाभला,’ असे रीबर्थ फाउंडेशनचे विश्वस्त सिद्धार्थ गांधी यांनी सांगितले.

दुसऱ्या उपक्रमाबद्दल शेट्टी म्हणाले, ‘जेव्हा माणसाला भूक लागते, तेव्हा त्याला अन्नाची किंमत कळते. निकड निर्माण झाली, की माणूस सर्व प्रयत्न करून ती पूर्ण करण्याच्या मागे लागतो, हा आपला सगळ्यांचाच अनुभव आहे. त्याबाबत रीबर्थ टीमच्या बैठकीत चर्चा झाली आणि  ‘रंगेथॉन’ या आमच्या उपक्रमाची संकल्पना सुचली. अवयवदानावर व्याख्याने दिली, तरीही ती ऐकून कदाचित माणूस सोडून देतो; पण जर आपला एखादा अवयव निकामी झाला, तर काय होईल याची जाणीव त्याला करून दिली, तर अवयवदानाचे महत्त्व त्या व्यक्तीच्या मनावर बिंबते, ही थीम घेऊन आम्ही २०१७मध्ये अमनोरा सिटीमध्ये ‘रंगेथॉन’ हा उपक्रम राबवला. या वेळी डोळ्यांना पट्टी बांधून चालणे, रेन डान्स, रंग खेळणे या माध्यमातून नागरिकांना आम्ही त्यांच्या अवयवांच्या महत्त्वाची जाणीव करून दिली. त्यामध्ये ३५०० पुणेकर सहभागी झाले होते. ही जाणीव प्रगल्भ झाली, की अवयवदानाचे महत्त्व आपोआप पटते.’

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी संस्थेच्या कामाचा गौरव केला.

प्रयत्नांना राजमान्यता
रीबर्थ फाउंडेशनच्या कामाची दखल राज्य सरकारनेही घेतली. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पत्र लिहून राज्य सरकारचा लोगो वापरण्याची आणि त्यांच्या संलग्नतेचा उल्लेख ‘रीबर्थ’च्या अवयवदानासंबंधीच्या साहित्यात करण्याची परवानगी दिली. ‘रीबर्थ’ने अवयवदानाची माहिती देण्यासाठी १० ऑगस्ट २०१६ रोजी हेल्पलाइन (१८००-२७४-७४४४) सुरू केली.  राज्य सरकारने सहाच दिवसांत दखल घेतली आणि ‘रीबर्थ’च्या हेल्पलाइनलाच राज्य सरकारची अवयवदानासंबंधीची अधिकृत हेल्पलाइन म्हणून मान्यता दिली.

भारत ऑर्गन यात्रेअंतर्गत भारतभ्रमणाला निघालेल्या प्रमोद महाजन यांना कार्यकर्त्यांनी निरोप दिला.

याच वर्षी ‘रीबर्थ’ने तिसरा उपक्रम सुरू केला आहे, त्याचे नाव आहे भारत ऑर्गन यात्रा. या उपक्रमांतर्गत संस्थेचे कार्यकर्ते देशातील विविध ठिकाणी सायकल, मोटरसायकल आणि कारने प्रवास करून अवयवदानाबाबत जनजागृती करतात. त्याचाच भाग म्हणून प्रमोद लक्ष्मण महाजन हे ६७ वर्षांचे गृहस्थ सध्या भारताच्या यात्रेवर आहेत. महाजन यांनीही काही वर्षांपूर्वी अवयवदान केले आहे. ‘रीबर्थ’च्या वतीने विविध शाळा, आयटी कंपन्या, ज्येष्ठ नागरिक संघांत व्याख्यानांच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. भारत ऑर्गन यात्रा उपक्रमांतर्गत रीबर्थ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अरुणाचल प्रदेशात सायकल यात्रा केली. त्या वेळी तेथील सीमा सुरक्षा दलाचे जवान व त्यांच्या कुटुंबीयांनाही अवयवदानाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

भारत ऑर्गन यात्रेदरम्यान अरुणाचल प्रदेशातील सीमा सुरक्षा दलाचे जवान व त्यांच्या कुटुंबीयांना अवयवदानाबद्दल माहिती देण्यात आली.

‘रीबर्थ संस्थेच्या या प्रयत्नांना समाजाच्या सर्वच स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. पुण्यात विविध संघटना अवयवदानाची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न करत असतात. या सगळ्यांच्या प्रयत्नांतून पुण्यातील अवयवदान करण्याचे प्रमाण वाढले आहे. पुणे शहरात २०१४ या वर्षात आठ जणांनी अवयवदान केले होते. २०१८ या वर्षात पुणे शहरात ६३ जणांनी अवयवदान केले आहे. अवयव दानाच्या संख्येत सध्या पुणे महाराष्ट्रात पहिल्या, तर देशात चेन्नईनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. पुण्यातील अवयवदानवाढीमध्ये ‘रीबर्थ’च्या जनजागृती मोहिमांचा खारीचा वाटा आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. दान केलेल्या अवयवांच्या संख्येचा विचार केला, तर पुढच्या काही काळात पुणे देशात पहिल्या क्रमांकावर जाईल,’ असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला.  

रीबर्थ फाउंडेशनच्या कार्याला निधी आणि प्रत्यक्ष कार्यकर्त्यांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासते. आर्थिक मदत देणाऱ्या व्यक्तीला ‘८० जी’ कायद्यांतर्गत करसवलत मिळू शकते. ग्रीन कॉरिडॉरच्या निमित्ताने पुण्यात सुरू असलेल्या अवयवदानाच्या चळवळीकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले. या बातम्या नागरिकांनी उत्सुकतेने वाचल्या. या घटनांवर आधारित चित्रपटही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पाहिले. आता वेळ आहे प्रत्यक्ष कृती करण्याची. चला तर मग सहभागी होऊ या ‘रीबर्थ’च्या या कामामध्ये.

संपर्क : विनाली दाते, जनसंपर्क अधिकारी, रीबर्थ फाउंडेशन, पुणे
मोबाइल : ९७६७५ ५३३००
टोल फ्री क्रमांक : १८००-२७४-७४४४
वेबसाइट : http://rebirthtrust.org/

- अमोल अशोक आगवेकर 
ई-मेल : amolsra@gmail.com

(रीबर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश शेट्टी यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील ‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध आहेत. पुण्याच्या विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या समन्वयक आरती गोखले यांच्या कार्याबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ritu About 271 Days ago
Keep it up team Rebirth.
0
0

Select Language
Share Link
 
Search