Next
‘राजमुद्रा’ ढोलपथकाचा अनोखा उपक्रम
वंचित मुलांच्या हस्ते वाद्यपूजन करून सरावाला सुरुवात
BOI
Wednesday, July 31, 2019 | 06:19 PM
15 0 0
Share this article:


पुणे : गणपतीच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना शहरात ढोलपथकांच्या सरावाला सुरुवात झाली आहे. मोठमोठ्या सेलेब्रिटींच्या हस्ते वाद्यपूजन करून या सरावाची सुरुवात केली जाते. मात्र राजमुद्रा ढोलपथकाने यंदा शहरातील ‘घरटं प्रकल्प निवारा’ या संस्थेतील वंचित मुलांच्या हस्ते वाद्यपूजन करून सरावाची सुरुवात केली आहे. तसेच या शुभारंभ कार्यक्रमाच्या खर्चाची रक्कम या संस्थेला दिली आहे. 

अलिकडील काळात ढोलपथकांचे वाढते प्रमाण, त्यामधील आर्थिक गणिते, मिळणारी प्रसिद्धी या गोष्टी लक्षात घेता, अनेक राजकीय नेते, सेलेब्रिटी यामध्ये सहभागी होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मग दर वर्षी होणाऱ्या सरावाच्या सुरुवात समारंभालाही एका इव्हेंटचे स्वरूप येऊ लागले आहे. राजकीय पुढारी, सेलेब्रिटी यांच्या हस्ते या सरावाची सुरुवात करणे, मोठा समारंभ करणे, त्याच्या जाहिराती करणे या गोष्टी सर्रास होताना दिसत आहेत. 

हे एकीकडे होत असताना दुसरीकडे मात्र हा प्रवाह सोडून वेगळ्या वाटेने जाणारी ढोलपथकेही आहेत. यापैकीच एक असलेल्या ‘राजमुद्रा’ पथकाने या वर्षी सराव समारंभाचा घाट न घालता वंचित मुलांच्या हस्ते वाद्यपूजन करून सरावाची सुरुवात केली आहे. इतकेच नाही, तर या समारंभासाठी असलेली खर्चाची रक्कम त्यांनी या वंचित मुलांसाठी दिली आहे. नुकतेच पथकाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील ‘घरटं प्रकल्प निवारा’ या संस्थेत जाऊन तेथील वंचित मुलांच्या हस्ते वाद्यांचे पूजन केले. त्यानंतर त्या मुलांनाही वादनात सहभागी करून घेत यंदाच्या ढोल सरावाची सुरुवात केली, अशी माहिती ‘राजमुद्रा’ पथकाचे सागर कुलकर्णी यांनी दिली. 

२००६मध्ये स्थापना झालेल्या ‘राजमुद्रा’ ढोलपथकाचे हे १४वे वर्ष आहे. मिळणाऱ्या उत्पन्नातील काही वाटा समाजातील गरजवंतांच्या मदतीसाठी देण्याची या पथकाची परंपरा आजतागायत पाळली जात आहे. यंदा वंचित मुलांना आपल्या आनंदात सहभागी करून घेत या पथकाने एक नवीन पायंडा पाडला आहे.  


(राजमुद्रा पथकाची अधिक माहिती असलेला ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.)    
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search