Next
म. श्री. दीक्षित, केरूनाना छत्रे, अरविंद गोखले
BOI
Wednesday, May 16 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘पुण्याचा चालता-बोलता इतिहास’ असं ज्यांना कौतुकाने म्हटलं जाई ते म. श्री. दीक्षित, ज्योतिषशास्त्रज्ञ केरूनाना छत्रे आणि आंतरराष्ट्रीय संबंध आणि विशेषत: भारत-पाकिस्तानसंबंधी गाढा अभ्यास असणारे पत्रकार अरविंद व्यंकटेश गोखले यांचा १६ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.....  
मधुकर श्रीधर दीक्षित 

१६ मे १९२४ रोजी पुण्यात जन्मलेले मधुकर श्रीधर दीक्षित ऊर्फ ‘मश्री’ हे चरित्रकार म्हणून ओळखले जातात. ‘पुण्याचा चालता-बोलता इतिहास’ असं त्यांना कौतुकाने म्हटलं जाई. त्यांनी पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या संस्थांमध्ये - म्हणजे साहित्य परिषद, वसंत व्याख्यानमाला, पुणे नगर वाचन मंदिर, पुणे सार्वजनिक सभा, बालगंधर्व संगीत रसिक मंडळ - यांमध्ये मोलाचा सक्रीय सहभाग घेतला होता. ‘मसाप’चा इतिहास त्यांनी ग्रंथबद्ध केला होता. इतिहास आणि मराठी साहित्य हे त्यांच्या विशेष आवडीचे आणि अभ्यासाचे विषय होते.

अहल्याबाई होळकर, आम्ही चित्पावन कोकणस्थ, छोटासा ज्ञानकोश, क्रांतिवीर सावरकर, लालबहादूर शास्त्री, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, साईबाबांचे सांगाती, वीररमणी झाशीची राणी, आनंदीबाई पेशवे, भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, लोकप्रिय नाट्यगीते, मुळा-मुठेच्या तीरावरून, ओठावरची गाणी, प्रतापी बाजीराव, स्वातंत्र्यवीर सावरकर, अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

१७ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांचं निधन झालं.

(मधुकर श्रीधर दीक्षित यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.) 
.......

केरो लक्ष्मण छत्रे 

१६ मे १८२४ रोजी नागावमध्ये जन्मलेले केरो लक्ष्मण ऊर्फ केरूनाना छत्रे हे गणिती आणि ज्योतिषशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. ब्रिटिशकालीन महाराष्ट्रात पाश्चात्य विद्येत निपुण असणाऱ्या केरोपंतांनी सुरुवातीला कुलाबा दांडीच्या वेधशाळेमध्ये असिस्टंट म्हणून नोकरी केली होती. नंतर १८६५ साली त्यांनी पुण्यामध्ये गणितशास्त्राचे प्रोफेसर म्हणून काम केलं. 

त्याआधी १८५० च्या सुमारास त्यांनी इंग्लिश आणि फ्रेंच ग्रंथांच्या आधारे ग्रहसाधनांची कोष्टकं तयार केली होती. ‘तिथीचिंतामणी’ हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध होतं. याशिवाय मराठी शाळांना उपयोगी अशी पदार्थविज्ञानशास्त्र आणि अंकगणित ही दोन पुस्तकं त्यांनी तयार केली होती. 

१९ मार्च १८८४ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
.....

अरविंद व्यंकटेश गोखले

१६ मे १९४६ रोजी जन्मलेले अरविंद व्यंकटेश गोखले हे पत्रकार आणि राजकीय विश्लेषक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी दैनिक केसरीचे संपादक म्हणून, तसंच दैनिक लोकसत्ताचे सहसंपादक म्हणून काम पाहिलं आहे. 

आंतरराष्ट्रीय संबंध आणि विशेषत: भारत-पाकिस्तान संबंध हे त्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय आहेत. त्यांना लंडनच्या ‘कॉमनवेल्थ प्रेस युनियन’ची ‘हॅरी ब्रिटन मेमोरिअल फेलोशिप’, तसंच वॉशिंग्टनच्या ‘दी हेन्री एल स्टिम्सन सेंटर’ची फेलोशिप मिळाली होती. 

अमेरिकेत शिकायचंय?, असाही पाकिस्तान, अक्षरांजली, आयसी ८१४, कारगिल ते कंदाहार, पाकिस्ताननामा, मंडालेचा राजबंदी, संघर्ष बलुचिस्तानचा, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.

आचार्य अत्रे पारितोषिक, साहित्यसम्राट न. चिं. केळकर पारितोषिक, कै. बाबूराव ठाकूर पत्रकारिता पुरस्कार, मराठी भाषासंवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेला मराठी भाषाविषयक माध्यमरत्न पुरस्कार, महाराष्ट्र संपादक परिषदेतर्फे आदर्श पत्रकारितेसाठीचा लोकमान्य टिळक स्मृति पुरस्कार, पत्रकार कै. वरुणराज भिडे पुरस्कार, कै. सुशीलादेवी देशमुख उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार आणि मुंबई मराठी साहित्य संघाचा कै. रा. भि. जोशी पुरस्कार असे मानाचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 

(अरविंद व्यंकटेश गोखले यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link