Next
नात्याला काही नाव नसावं...
BOI
Sunday, January 07 | 09:45 AM
15 0 0
Share this story


आयुष्यात बऱ्याचदा आपण एखाद्या जवळच्या नात्यावर इतर सर्व नात्यांचं, अपेक्षांचं ओझं टाकतो. त्याच एका नात्याकडून सर्व प्रकारची पूर्तता आपल्याला अपेक्षित असते. पण हे असं करणं म्हणजे त्या नात्यावर अन्याय करण्यासारखंच की.किती महत्त्वाची गोष्ट आहे ही. आपल्या वेगवेगळ्या भावना आणि वेगवेगळ्या आवडींसाठी वेगवेगळी विशेष नाती असू शकतात, असा आपण विचारच करत नाही... या आणि अशाच कैक विचारांना दररोज घेऊन चालताना काही गोष्टी नव्याने उलगडतात नि आयुष्यातल्या अनेक गोष्टींचा अर्थ उलगडतो. अशाच वेगवेगळ्या विचारांचं कोलाज मांडणारं हे साप्ताहिक सदर... हिनाकौसर खान-पिंजार यांचं... हॅशटॅग कोलाज (##कोलाज)
..........
काल एका मित्राला फोन केला होता. गप्पांमध्ये मैत्री, नातेसंबंध असं काहीबाही बोलत असताना तो अगदी सहज म्हणाला, मला ना मित्र म्हणजे कौन्सेलर वाटतात. बघ ना, आपण त्यांना काय काय सांगतो आणि ते काय काय ऐकून घेतात. आपल्याला जे म्हणायचं आहे ते तसंच्या तसं पोहोचत नसेलही कदाचित. त्यांच्या आकलन अंदाजानुसार ते त्या गोष्टी ऐकत राहतात. आपली काही अडचण असेल, तर प्रत्येक वेळी ते उत्तर शोधायला मदत करतात असंही नाही; पण नुसतं आपलं ऐकून घेतल्यानंतरही आपण किती मोकळे होतो. भाव-भावनांचा निचरा झाल्यासारखं वाटतं ‘व्हॉट ए रिलीफ’ ही टर्म आपण प्रत्यक्ष अनुभवतो. त्या अर्थी प्रत्येक मित्र-मैत्रिणी हे कौन्सेलरच असतात.

मनाचा निचरा होऊ द्यावा, असं माणूस ज्यांच्या आयुष्यात नसेल त्यांची काय घालमेल होत असेल.. किती साठत असेल आणि मग ते काय करत असतील याचं.., कसं डील करत असतील अशा अव्यक्ताला, असा एक प्रश्न पडतो मला. काही वेळा मला सांगावंसं वाटतं त्यांना ‘सांग, मला सांग. मनातल्या मनात विचार करत किती कुढशील? बोल एकदाचा आणि मोकळा हो.’ मैत्रीच्या या अर्थी एकाकी असणारी माणसं साहजिकच व्हल्नरेबल होतात. ती शोधत राहतात आपलं असं ऐकणारं माणूस. बघ ना, खरोखरच मोकळं व्हावं असे किती मैतर असतात आपल्याला..? मोजकेच असतात. त्यापलीकडच्या माणसांना खरं तर आपण परिचित, ओळखीचा म्हणायला हवं ना; पण तसं आपण म्हणत नाही. उलट आपण किती मोघमपणे किंवा सरसकटपणे सगळ्यांनाच मित्र-मैत्रीण म्हणून मोकळे होतो.

काही वेळा आपल्या अगदी जवळच्या नात्यातही ही मोकळीक मिळत नाही. अगदी नवरा-बायकोच्याही. लग्नानंतरच्या काही काळात लक्षात येतं, की आपल्या आवडीनिवडी जुळत नाहीयेत किंवा आपण साधा संवादही आपल्या जोडीदाराशी करू शकत नाही. न बोलता येण्याची, न सांगता येण्याची ही भूक मग कशी भागवायची? नवरा-बायकोत काही बिनसलेलं नाहीये, पण संवादाच्या या जागा नाहीयेत. मग काय करायचं? साहजिकच आपण आपल्या जोडीदारापलीकडंही अशी माणसं शोधू लागतो, ज्यांच्यासमवेत आपला संवाद होऊ शकतो. 

आपण बोललेलं ऐकणारी आणि समजून घेणारी अशी कोणीतरी व्यक्ती हवी असते. विवाहित असल्यास ही जागा केवळ नवरा-बायकोतच मर्यादित असावी असं मानणं किती चुकीचं आहे. स्त्री-पुरुषाच्या नात्याचा विचार वासनेच्या पलीकडे करता यायला हवा. मोकळ्या-ढाकळ्या पद्धतीनं नैसर्गिकरीत्या एकमेकांशी शेअरिंग करणारं हे नातं तर मैत्रीच्याही पलीकडचं असेल. आपण उगीचच अशा सगळ्या गोष्टींचा बाऊ करतो. 

तो हे सर्व सांगत होता, तेव्हा मला ‘डिअर जिंदगी’ चित्रपट आठवत होता. या चित्रपटात छोटे-छोटे असे अनेक घटक आहेत, की जे आपल्याला आनंद देऊन जातात. याच चित्रपटात कौन्सिलिंगच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेली कायरा म्हणजेच आलिया भट शाहरुख खानला विचारते, ‘इज देअर सच थिंग अॅज ए परफेक्ट रिलेशनशिप..? एक स्पेशल रिश्ता..?’ हा प्रश्न खूप मोलाचा आहे आणि यावरचं शाहरुख खानचं उत्तरही तितकंच महत्त्वाचं. तो म्हणतो, ‘का? असं एकच स्पेशल नातं का असावं?’ ‘अलग अलग एहसासों के लिए अलग अलग स्पेशल रिश्ते क्यों नही हो सकते..?’ एखाद्यासोबत स्पेशल म्युझिकल नातं, एखाद्यासोबत केवळ आवडीचा फक्कड चहा-कॉफी पिण्यापुरतंच नातं, एखाद्यासोबत गॉसिप करण्यासाठीचं नातं. एखादं बौद्धिक नातं, ज्याच्याशी पुस्तकी गप्पा मारता येऊ शकतात. या सगळ्यांपैकी एक रोमँटिकवालं नातं असतं; पण आपण या रोमँटिक नात्यावर इतर सर्व नात्यांचं, अपेक्षांचं ओझं टाकतो. त्याच एका नात्याकडून सर्व प्रकारची पूर्तता का बरं अपेक्षित करतो? असं करणं म्हणजे रोमँटिक नात्यावर अन्याय करण्यासारखंच की. किती महत्त्वाची गोष्ट आहे ही. आपल्या वेगवेगळ्या भावना आणि वेगवेगळ्या आवडींसाठी वेगवेगळी विशेष नाती असू शकतात. जसं माझा मित्र सांगत होता, की मित्र-मैत्रिणी कौन्सेलर असतात. म्हणजे ‘डिअर जिंदगी’तील स्पेशल नाती म्हणजे मित्राच्या व्याख्येनुसार स्पेसिफिक कौन्सेलरच की.

किती गमतीदार आहे ना, जोडीदार निवडतानाही आपल्या सर्व भावनांसाठी एकच व्यक्ती हवी, असा अनेकांचा अट्टाहास असतो; पण ते शक्य असतं का? आपण तरी आपल्या जोडीदाराच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू शकणारे असतो का? एकुणात काय, विवाहित जोडीदारापलीकडे अशी स्पेशल नाती असू शकतातच. त्यांना काय म्हणायचं? मैत्री? प्रेम? मैत्री-प्रेमाच्या अध्येमध्ये? मैत्री-प्रेमाच्या पलीकडे? नाही माहीत काय म्हणायचं.

मुळात असं काही तरी लेबलिंग आपल्याला का हवं असतं? दोन व्यक्तींमधलं नातं व्यवस्थितरीत्या डिफाइन व्हावं असा अट्टाहास असतो तरी का? याचा जरा बारकाईने विचार केला, तर लक्षात येतं की अशा स्वरूपातले डेफिनेट फॉर्म्स, नात्यांच्या रचना ठरवणार असतात. म्हणजे प्रियकरानं नवरा किंवा प्रेयसीनं बायको झालं रे झालं, की ते लगेच बदलतात. प्रियकरानं प्रियकर असेपर्यंत मित्रत्वासारखं वागणं हे आपसूक असतं. तो नवरा झाला, की त्यातलं मित्रत्व काही अंशी मालकी हक्काने रिप्लेस होतं. कारण आपण वर्षानुवर्षं नवरा कसा असावा याचे ठोकताळे पक्के बसवत आलो आहोत. तोच प्रकार अन्य नात्यांबाबतही. त्यामुळेच जिथं असं नेमकं नामकरण करता येत नाही, तिथं इतरांनी कोणता दृष्टिकोन ठेवावा याबाबत भयंकर गोंधळ उडालेला असतो आणि म्हणूनच आपल्याला असं लेबलिंग हवंच असतं; पण ते खरंच तसं प्रत्येक नात्याला लागू होऊ शकतं का? 

माझा मित्र म्हणत होता, ‘स्त्री-पुरुषांच्या नात्यात नेहमी वासनाच असते असं नाही गं.’ ते अगदी बरोबर आहे. आपण स्त्री-पुरुषांच्या नात्यांमध्ये अशी वासनाच शोधत असतो. त्यात त्या पलीकडे काही तरी असेल याचा विचार करण्यात खुजेपणा दाखवतो. नाही का? मागे एकदा एका मैत्रिणीने अशाच रीतीचं एखादं बाँडिंग शेअर करत असणाऱ्या ऑफिसमधल्या दोन सहकाऱ्यांवर कमेंट केली होती... ‘बघ, रोमिओ-ज्युलिएट येताहेत.’ मी चकित होऊन तिच्याकडे पाहिलं. तेव्हा ती म्हणाली, ‘हे मी नाही म्हणत. अख्खं ऑफिस म्हणत आहे.’ स्वत: विचारांनी बऱ्यापैकी मोकळी असणाऱ्या या मैत्रिणीकडून अशी कमेंट ऐकून कसंसंच झालं. त्या वेळच्या धांदलीत तिला काही सांगता आलं नाही; पण तेव्हाही माझ्या मनात हे आलं होतं, ‘तूही कोणाची अशी खास मैत्रीण असशील, तर इतरांनी काय म्हणावं तुला?’ असो. ‘डिअर जिंदगी’ बघ म्हणून सल्ला द्यायला हवा तिला. नाही तर मग तिच्या आयुष्यात माझ्या मित्रासारखा कौन्सेलर तरी यायला हवा. जेणेकरून वेगवेगळ्या नात्यांना, वेगवेगळ्या भावनांना वेगवेगळे अर्थ असतात याचा उलगडा तरी होईल...!! व्हॉट से..?


- हिनाकौसर खान-पिंजार
ई-मेल : greenheena@gmail.com

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sunita Dewalkar Pune About 338 Days ago
Excellent explanation.. i like it very much.. likhate raho mam.
2
0
Poonam B.M. About 339 Days ago
निखळ मैत्रीबद्दल खूप छान लिहिले आहे. याशिवाय नावरयाला मैत्रीण आणि बायकोला मित्र असावा असे प्रत्यक्षात व्हायला पाहिजे, निदान असा विचार करणारयानी ते पाऊल उचलायला हवे हे नक्की, पुढे हा समाज त्यांचे अनुकरण करेल.
4
0

Select Language
Share Link