Next
अरे देवा तुझी मुले...
BOI
Tuesday, April 18, 2017 | 07:00 AM
15 9 0
Share this article:

अनेक भावपूर्ण गीतांना तितकेच भावपूर्ण संगीत देऊन ती अजरामर करणारे ज्येष्ठ संगीतकार, अनेक सुंदर गीतांची रचना करणारे श्रेष्ठ गीतकार/कवी आणि शब्दप्रधान गायकीचे उद्गाते यशवंत देव यांना नुकताच महाराष्ट्र टाइम्सचा ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या निमित्ताने ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज ‘अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात’ या गीताबद्दल....
..................


महाराष्ट्र टाइम्सचा ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार नुकताच विख्यात गीतकार आणि संगीतकार यशवंत देव यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या गौरवांकित करणाऱ्या सोहळ्याचा फोटो पाहिला. वयाची नव्वदी पार केलेल्या यशवंत देव यांच्या फोटोकडे पाहताना त्यांनी स्वरबद्ध केलेली आणि लिहिलेली गाणी काना-मनात ‘रुणुझुणू’ लागली...हो खरंच! रुणुझुणू हाच शब्द देवांच्या संबंधी लिहिताना आठवतोय. तुम्हीही बघा ना रुणुझुणू हा शब्द उच्चारून... त्या शब्दाच्या मागे नादमयता आपोआप येते... अगदी तस्साच अनुभव देवांची गाणी ऐकताना येतो.

महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्याच्या दोनच दिवस अगोदर मी त्यांच्याशी फोनवर बोलले होते. कारण त्या दिवशी मी ‘अरे देवा तुझी मुले...’ हे त्यांचं गीत प्रसारित केलं होतं. गीत ऐकताना अनेक आठवणी मनात दाटून आल्या होत्या. म्हटलं, देवसाहेबांशी बोलू या. खूप दिवस झाले टीव्हीवर किंवा इतर संगीत समारंभात त्यांचं दर्शन झालं नव्हतं. थोडी काळजी वाटली. अनामिक हुरहुर.... ‘हॅलो! कसे आहात देवसाहेब? कशी आहे तब्येत?’ मी विचारलं.... तर पलीकडून अतिशय थकलेला आवाज आला.... ‘तब्येत नाही बरी...आता नव्वदी पार केली.’ मी त्यांच्या गाण्याविषयी थोडंसं बोलले. त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं होतं, त्या वेळी मी त्यांची मुलाखत घेतली होती, त्याची आठवण करून दिली. ते म्हणाले, ‘हो आठवतंय...आपण छान संवाद साधला होतात.’ मी म्हटलं, ‘आकाशवाणीच्या सेवेत असताना अनेक गाणी तुम्ही रसिकांना बहाल केली आहेत. आम्ही सारे ऋणी आहोत तुमचे. ‘अरे देवा तुझी मुले...’ किंवा आशाताईंच्या आवाजातलं ‘तुझ्या एका हाकेसाठी...’ हे गीतही तुम्ही आकाशवाणीत असतानाच केलं होतंत ना?’ ते त्वरित म्हणाले, ‘किती छान गाण्यांची आठवण करून दिलीस तू! हल्ली ही गीतं कुठं ऐकायला मिळतात?’ मी म्हटलं, ‘देवसाहेब, आम्ही प्रसारित करतो ना! आजच तुमचं ‘अरे देवा तुझी मुले...’ हे गीत प्रसारित केलं आणि तुम्हाला फोन केला, केवळ तुमचं अभीष्टचिंतन आणि ऋण व्यक्त करण्यासाठी....तब्येतीची काळजी घ्या. उन्हाळा खूप जाणवतोय. ठेवते फोन. नमस्कार.’ देवसाहेबांशी खूप गप्पा माराव्यात असं वाटत होतं; पण त्यांना बोलण्याचे कष्ट होत आहेत हे जाणवत होतं. त्यामुळे फोन बंद केला; पण त्यांचं ‘अरे देवा तुझी मुले...’ हे गाणं मनाच्या रेडिओत वाजतच राहिलं.

जातिभेद, वर्णभेद, उच्च-नीचतेच्या खोट्या कल्पनांना उराशी कवटाळून सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्या समाजकंटकांचा त्रास सर्वांनाच होतो. समानता, बंधुभावाचा, शांतीचा प्रसार होण्यासाठी महाराष्ट्रात होऊन गेलेल्या अनेक संत-महात्म्यांनी, समाजसुधारकांनी कार्य केले. त्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी होते; पण त्यांची शिकवण किती जण अंगीकारतात, हा प्रश्न अजूनही सतावतोय. यशवंत देव यांनी लिहिलेल्या या गीतामध्ये साक्षात देवालाच प्रश्न विचारलाय,

‘अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात,
कुणी एकत्र नांदती, कुणी दूर दहा हात...’ 

मी देवसाहेबांशी या गीताबद्दल बोलताना म्हटलं होतं, ‘तुमचं हे गीत ऐकलं, की तुमचं नातं साने गुरुजींच्या कविमनाशी जोडलं जातं. ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे,’ असं सांगणारे साने गुरुजी असोत किंवा समानतेची शिकवण देणारे, भोजनासाठी सर्वांना एकाच पंगतीत बसवणारे संत एकनाथ असोत, किंवा आपला पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला करणारे महात्मा जोतिबा फुले असोत, किंवा दीनदलितांसाठी अवघं आयुष्य पणाला लावणारे, समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असोत, तुमचं हे गीत ऐकताना या साऱ्या संतांची, समाजसुधारकांची तळमळ अनुभवायला येते.’

‘तुझा माझा देवा कारे वैराकार,’ असा जाब विचारणारे संत नामदेव असोत, की ‘माझे अश्रूंनी भिजलेले अभंग तुला ऐकू येत नाहीत का विठूराया,’ असं म्हणणारे चोखोबा असोत किंवा ‘विठ्या, पंढरीच्या चोरा’ असे म्हणणारी संत जनाबाई असो, या सर्वांनी विठाई माऊलीला घातलेली साद, हाक आणि या हाकेतील आर्तता यशवंत देवांच्या या गीतात उतरली आहे. 

जात-पात पाहुनिया सारा व्यापार ठरतो
मोठेपणा माणसाला का रे जन्मासवे येतो
कुणी लोळे वैभवात कुणी पोळतो चिंतेत
अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात
कुणी एकत्र नांदती कुणी दूर दहा हात...

सुधीर फडके यांच्या आवाजात यशवंत देव यांनी हे गीत ध्वनिमुद्रित केलं होतं. आकाशवाणीसाठी निर्माण झालेलं हे मूळ गीत आता श्रीधर फडके यांच्या आवाजात ध्वनिमुद्रिकेवर ऐकायला मिळतं. खरंच, हे गीत म्हणजे यशवंत देव यांच्यातला कवी आणि संगीतकार यांचं सुरेख मिश्रण आहे. कलाकार हा फक्त कलाकारच नसतो, तर तो या समाजाचा एक अविभाज्य घटक असतो. या समाजाचं ऋण फेडण्याची ताकद त्याच्या कलेत असते. कलेसाठी कला की जीवनासाठी कला या वादात न पडता सामाजिक बांधिलकी जपणारा कलाकार नेहमीच आदरणीय ठरतो, सन्माननीय ठरतो.

देवसाहेब ‘महाराष्ट्रभूषण’ या सन्मानाबरोबर अनेक सन्मानांचे धनी आहेत. त्यांची ही श्रीमंती अक्षय आहे. कारण त्यांनी सदासतेज गीतांमधून सर्व रसिकांनाही श्रीमंत केलंय, समृद्ध केलंय. त्यांचं मन:पूर्वक अभिनंदन करताना त्यांच्या अनेक सुंदर सुंदर भावगीतांच्या ओळी कानामनात रुंजी घालू लागल्या आहेत....‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम’ करायला लावणारं त्यांचं संगीत आपण गुणगुणतच राहणार आणि स्वत: यशवंत देव असूनही थेट देवालाच प्रश्न करणाऱ्या त्यांच्या गीताचा अंतर्मुख होऊन विचार करणार...

आता वागण्याची तऱ्हा जरा निराळी करावी
अभंगाची एक तरी ओवी अनुभवा यावी
वर्णभेद ज्याच्या मनी तोचि मलिन पतीत
अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात?


- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत.)
 
(‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ हे सदर दर मंगळवारी प्रसिद्ध होते.)

(या सदरातील आधीचे लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 9 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shailesh paranjape About
Mool ganya itkach lekh sundar ahe..ganyamagcha saundarya ani samajik vichar chhan ulgadun dakhavla ahe
2
0

Select Language
Share Link
 
Search