Next
अटल जीवनगौरव पुरस्कार मा. गो. वैद्य यांना प्रदान
BOI
Friday, December 21, 2018 | 03:25 PM
15 0 0
Share this article:

मा. गो. वैद्यनागपूर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात आलेल्या अटल सन्मानातील पहिला ‘अटल जीवनगौरव’ पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांना प्रदान करण्यात आला. 

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते येथील सुरेश भट सभागृहात गुरुवारी, दि. २० डिसेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर उपस्थित होते. 

‘प्रेरणा अटल सन्मान’ भाऊ काणे यांना प्रदान करण्यात आला, तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ‘अटल सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

 कला क्षेत्रात लाखनी येथील डॉ. हरिश्चंद्र बोरकर, संगीत क्षेत्रासाठी व्हायोलिनवादक ‘सूरमणी’ पं. प्रभाकर धाकडे, शिक्षणक्षेत्रात भंडारा येथील मुबारक सय्यद, महिला सक्षमीकरणासाठी यवतमाळच्या संगीता सव्वालाखे, अकोला येथील प्रगतिशील शेतकरी अनंता वाघ, कारंजा येथील समाजसेविका सुचिता सोळंके, मेळघाटमध्ये कृषीक्षेत्रात काम करणारे गणराज पाटील, जलसंधारण क्षेत्रात काम करणारे माधव कोटस्थाने आणि पर्यावरणसंवर्धनासाठी झटणारे गोपाळराव ठोसर यांचा समावेश होता.  

भाऊ काणे
पुरस्कारार्थींची निवड करणाऱ्या समितीत सामजिक कार्यकर्ते गिरीश गांधी, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, गजानन निमदेव, दिलीप चावरे, कल्पना पांडे व अविनाश घुशे यांचा समावेश होता. 

या वेळी नितीन गडकरी यांनी वैद्य यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कार्याला उजाळा दिला. ते म्हणाले, ‘वैद्य यांनी संपूर्ण आयुष्य संघासाठी वेचले. आपले आयुष्य घडविण्यासाठी तरुण पिढीने वैद्य यांचे आयुष्य, त्यांची देशभक्ती यांचा अभ्यास केला पाहिजे.’ ९६ वर्षे पूर्ण केलेल्या वैद्य यांनी शंभर वर्षे पूर्ण करावीत, अशा शुभेच्छा गडकरी यांनी दिल्या.  

सत्काराला उत्तर देताना मा. गो. तथा बाबुराव वैद्य यांनी अटलबिहारी वाजपेयी त्यांच्या घरी राहिले होते, त्या वेळच्या आठवणी सांगितल्या. १९४५ पासूनच्या त्यांच्या मैत्रीच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. अटलबिहारी  वाजपेयी यांच्या नावाचा सन्मान मिळणे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे वैद्य यांनी नमूद केले. 

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कमलेश भडकमकर यांनी चाली लावलेल्या अटलजींच्या कविता अजित परब, मुग्धा वैशंपायन, धनश्री देशपांडे यांनी सादर केल्या. या वेळी नृत्यांगना दिशा देसाई यांनी त्यावर आधारीत नृत्य सादर केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search