Next
‘लाल परी’वर प्रेम करणाऱ्या युवकांची गोष्ट!
सोशल मीडियातून एकत्र आलेल्या ‘एसटी’प्रेमींनी साकारले फिरते प्रदर्शन
अनिकेत कोनकर
Thursday, June 20, 2019 | 04:47 PM
15 0 0
Share this article:

लाल परी

रत्नागिरी :
गाड्यांची आवड नाही, अशी तरुणाई सहजासहजी सापडत नाही. नवनव्या मॉडेलच्या चारचाकी किंवा दुचाकी गाड्या तरुणांच्या हातात दिसतात. ज्यांच्याकडे गाडी नसते, त्यापैकी बऱ्याच जणांचे पहिले स्वप्न गाडी घेण्याचेच असते; पण अख्ख्या महाराष्ट्राला जोडण्याचे काम करूनही ‘लाल डबा’ म्हणून हिणवल्या जाणाऱ्या ‘एसटी’वर प्रेम करणारेही काही तरुण आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून ‘लाल परी’चे (लाल डबा नव्हे) महत्त्व किती आहे याची जाणीव लोकांना होण्यासाठी हे काही तरुण एसटीचे जणू ब्रँड अँबेसेडर म्हणूनच काम करत आहेत आणि तेही स्वेच्छेने. एसटी महामंडळानेही त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेतली आणि त्यातूनच ‘वारी लाल परीची, गाथा नव्या युगाची’ हे फिरते प्रदर्शन तयार झाले आहे. 

रोहित धेंडे

सध्या हे प्रदर्शन महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांतील ५० ठिकाणांच्या दौऱ्यावर आहे. दौऱ्याच्या बाराव्या दिवशी (२० जून २०१९) हे प्रदर्शन रत्नागिरीच्या रहाटाघर बस स्थानकात आले. त्या वेळी या संकल्पनेचा उद्गाता रोहित धेंडे याच्याशी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने संवाद साधला. त्यातून ही संकल्पना उलगडत गेली. ‘एसटी’साठी वेळ देण्याकरिता नोकरीला ‘ना’
रोहित धेंडे या ठाण्याच्या सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणाला अगदी शाळेत असल्यापासूनच एसटीची मोठी आवड. पुढे कॉलेजात गेल्यानंतर ही आवड वाढत गेली आणि त्याने ‘फ्लिकर’ या फोटो शेअरिंग वेबसाइटवरून एसटीचे फोटो शेअर करायला सुरुवात केली. त्यानंतर फेसबुकचा उदय झाला आणि २०१२मध्ये फेसबुकवर ‘एमएसआरटीसी लव्हर्स’चा ग्रुप त्याने सुरू केला. त्यातूनच राज्यभरातील एसटीप्रेमी जोडले गेले. ‘एसटी’साठी वेळ देता यावा या एकमेव कारणामुळे रोहितने कोणत्याही कंपनीत पूर्णवेळ नोकरी स्वीकारलेली नाही. तो ‘फ्री-लान्स’ म्हणून काम करतो. त्याचे एसटीप्रेम किती उच्च पातळीचे आहे, याची कल्पना यावरून येईल.... आणि ग्रुप सुरू झाला!
‘ग्रुपमधील आम्ही कोणीच एकमेकांना ओळखत नव्हतो. प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगळी होती. प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणचा होता; पण एसटीवरील प्रेम हा आमच्यातला समान धागा होता....’ रोहित धेंडे सांगत होता... ‘या ग्रुपमधून आम्ही सगळे जण जोडले गेलो. त्यातून शेअरिंग होऊ लागले आणि मग ‘एसटी’चे जणू ब्रँड अँबेसेडर म्हणूनच आम्ही काम करू लागलो.’एसटीच्या सकारात्मक गोष्टींचे ब्रँडिंग
‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून एसटीचे काम मोठे आहे. रेल्वेला काही मर्यादा आहेत; पण एसटी मात्र गावागावापर्यंत पोहोचते, हेच तिचे वैशिष्ट्य आहे. ‘एसटी’ला लाल डबा म्हटले जाते, एसटीबद्दलच्या तक्रारी अनेकदा केल्या जातात; पण त्यामुळे एसटीचे महत्त्व कमी होत नाही. गेल्या काही वर्षांत एसटीत जे चांगले बदल होत आहेत, ते नक्कीच कौतुकास्पद आहेत. एसटीबद्दलच्या सकारात्मक गोष्टी मांडण्यासाठी काही तरी करण्याची गरज होती. त्यातूनच प्रदर्शनाची संकल्पना सुचली,’ असे रोहित धेंडे याने सांगितले. १२ वर्षांची तपश्चर्या
१२ वर्षे अभ्यास करून, एसटीच्या सगळ्या २५० आगारांमध्ये फिरून रोहितने आणि अन्य एसटीप्रेमींनी एसटीची जुनी तिकिटे, बॅज, फोटो वगैरे दुर्मीळ साहित्य गोळा केले. त्यातूनच त्याने २०१६मध्ये एसटी विश्वरथ नावाचे एक प्रदर्शन भरवले. त्यामध्ये एसटीचा संपूर्ण प्रवास उलगडण्यात आला होता. त्याच दरम्यान, राज्याचे सार्वजनिक वाहतूकमंत्री दिवाकर रावते यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली आणि त्यांनी स्वतःहून या उपक्रमाची दखल घेतली. ‘एसटी’च्या ब्रँडिंगसाठी ही मुले काही तरी करत आहेत, तर त्यांना एसटीकडूनही मदत मिळाली पाहिजे, या भावनेने रावते यांनी सहकार्याची हमी दिली. त्यातूनच पुढील उपक्रमांसाठी प्रोत्साहन मिळाले. बस फॉर अस फाउंडेशनची स्थापना
‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट असणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. त्यामुळेच आमच्या उपक्रमांना एक कायदेशीर अधिष्ठान देण्यासाठी आम्ही एक जून २०१९ रोजी ‘बस फॉर अस फाउंडेशन’ या स्वयंसेवी संघटनेची स्थापना केली. प्रवाशांसाठी प्रवासी संघटना असते, कामगारांसाठी कामगार संघटना असते; पण संपूर्ण एसटीसाठीही काही तरी असावे, या विचाराने ही संघटना स्थापन केली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठीचे अनेक उपक्रम या माध्यमातून राबविले जाणार आहेत. भविष्यात केंद्र पातळीवर आमच्या उपक्रमांची दखल घेतली गेली, तर असे उपक्रम कोणत्याही राज्यात राबवता येऊ शकतात. म्हणूनच आम्ही संघटनेचे नाव ‘एमएसआरटीसी’पुरते मर्यादित न ठेवता, ‘बस फॉर अस’ असे ठेवले आहे,’ असे रोहितने सांगितले. 

अशी आहे ‘गाथा नव्या युगाची’
‘वारी लाल परीची, गाथा नव्या युगाची’ ही सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या प्रदर्शनाची संकल्पना आहे. त्यासाठी ‘बस फॉर अस फाउंडेशन’ला एसटीकडूनच बस उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि ड्रायव्हर, डिझेल, तसेच कार्यकर्त्यांची प्रत्येक ठिकाणची राहण्याची-जेवण्याची व्यवस्था एसटीकडून केली जाते. एक जून २०१९ रोजी एसटीने ७२व्या वर्षात पदार्पण केले. त्याचे औचित्य साधून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण शंकर केवटे (वय ९४) हेदेखील त्या वेळी उपस्थित होते. गेल्या चार-पाच वर्षांत एसटीत झालेले बदल या बसमध्ये रोहितने एसटीप्रेमींच्या मदतीने पोस्टर्सच्या माध्यमातून उलगडले आहेत. बसच्या आत आणि बाहेरही ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत.

एमएस बांधणीच्या बस, शिवशाही, स्लीपर बस, पंढरीच्या वारीची विठाई बस, विविध मॉडेलच्या बांधणीची वैशिष्ट्ये, मजबुती यांसह एसटीच्या विविध योजनांबद्दलही यात माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही आंदोलनात एसटीला लक्ष्य केले जाते. तसे न होण्यासाठी जागृतीपर संदेशही देण्यात आला आहे. एसटी बसच्या मॉडेलमध्ये १९४८पासून कसे बदल होत गेले, याचा प्रवासही फोटोंतून उलगडतो. तसेच, एसटीकडे राज्यभरात किती बसेस आहेत, किती कर्मचारी काम करतात, एकंदरच एसटीचा पसारा किती व्यापक आहे, याची माहितीही देण्यात आली आहे. एसटी बसच्या नव्या मॉडेल्सच्या प्रतिकृतीही प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. 

रत्नागिरीतील कार्यकर्त्यांसह रोहित धेंडे

एसटीसंदर्भातील मग्ज, एसटी बसच्या विविध मॉडेल्सच्या हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यासाठीचे साहित्य, स्टिकर्स आदी गोष्टी प्रदर्शनस्थळी विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत. प्रदर्शनाच्या प्रत्येक ठिकाणी स्थानिक एसटीप्रेमी कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळेच हा उपक्रम चांगल्या प्रकारे सादर करता येतो, असे रोहितने आवर्जून सांगितले.आणखीही बरेच उपक्रम 
‘पूर्वी एसटी स्टँडवर प्रदर्शन लावले होते; मात्र रेल्वेची सायन्स एक्स्प्रेस असते, त्याप्रमाणे बसमध्येच प्रदर्शन केले, तर ती कुठेही नेता येईल, असा विचार केला. एसटीकडून बस उपलब्ध झाल्यामुळे ती योजना मूर्त स्वरूपात आली. तरीही एकच बस संपूर्ण राज्यभर फिरवण्याला मर्यादा आहेत. त्यामुळे भविष्यात प्रत्येक जिल्ह्याला अशी बस उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात शाळा-कॉलेजेस, तसेच ठिकठिकाणी ती बस फिरवता येऊ शकते,’ अशा शब्दांत रोहितने पुढील योजनाही सांगितली.‘अशा संघटना विविध राज्यांमध्ये आहेत; पण अशा पद्धतीचे ठोस काम करणारी संघटना महाराष्ट्रातच आहे,’ असे रोहितने सांगितले, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर सार्थ अभिमान झळकत होता. 

रत्नागिरीतील उद्घाटन कार्यक्रम

रत्नागिरीनंतर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पंढरपूरसह गडचिरोलीपर्यंत
दौऱ्यातील प्रत्येक ठिकाणी एसटी बस स्थानकात सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत ही प्रदर्शनाची बस उभी असते. सर्वांना पाहण्यासाठी ते खुले असते. ठाण्यातून रायगड जिल्ह्यातून दापोली, चिपळूणमधून २० जून रोजी हे प्रदर्शन रत्नागिरीत आले होते. रत्नागिरीत विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, वाहतूक अधीक्षक एस. एम. खाडे, सहायक अधीक्षक ए. पी. जाधव, आगार व्यवस्थापक वरिष्ठ अजयकुमार मोरे, कनिष्ठ व्यवस्थापक सागर गाडे, कामगार अधिकारी श्री. पाटील यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

हे प्रदर्शन २१ जून रोजी कणकवली, तर २२ जून रोजी मालवणला जाणार आहे. त्यानंतर ते कोल्हापूरहून पुण्याला जाणार असून, पंढरपूरच्या वारीच्या कालावधीत ते तीन दिवस पंढरपुरात असेल. अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्र फिरून सर्वांत शेवटी हे प्रदर्शन गडचिरोलीत जाणार आहे, अशी माहिती रोहित धेंडे याने दिली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या भल्यासाठी अशा प्रकारे कार्य करणारी तरुणाई असेल, तर वाहतूक कोंडीपासून प्रदूषणापर्यंतच्या अनेक समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे सोपे होऊ शकेल.

अधिक माहितीसाठी : https://www.facebook.com/busforusfoundation/

(‘लाल परी’च्या या प्रदर्शनाची झलक आणि रोहित धेंडे याचे मनोगत पाहा सोबतच्या व्हिडिओत...)यापासून एसटीच्या प्रतिकृती बनविता येतात. 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
आजिनाथ भिसे About 117 Days ago
चालक
1
0

Select Language
Share Link
 
Search