Next
गीता गोपीनाथ ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’च्या मुख्य अर्थतज्ज्ञ
या पदावर नियुक्ती झालेल्या पहिल्या महिला आणि दुसऱ्या भारतीय
BOI
Wednesday, January 09, 2019 | 04:29 PM
15 0 0
Share this article:

गीता गोपीनाथवॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) या जागतिक अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवणाऱ्या सर्वोच्च संस्थेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून गीता गोपीनाथ यांनी नुकतीच सूत्रे स्वीकारली आहेत. या पदावर नियुक्ती झालेल्या त्या पहिल्याच महिला आणि दुसऱ्या भारतीय आहेत. हा बहुमान भारतीय महिलेला मिळणे ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. 

कर्नाटकातील म्हैसूरमध्ये जन्मलेल्या आणि आता अमेरिकेच्या नागरिक असलेल्या गीता गोपीनाथ (४७) सध्या हार्वर्ड विद्यापीठात ‘आंतरराष्ट्रीय अभ्यास आणि अर्थशास्त्र’ या विषयाच्या प्राध्यापक आहेत. मॉरिस ऑब्सफेल्ड यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपल्यानंतर संस्थेच्या ११व्या मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून गीता गोपीनाथ यांनी एक जानेवारी २०१९ रोजी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीची घोषणा ऑक्टोबर महिन्यात करण्यात आली होती. याआधी रघुराम राजन यांनी हे पद भूषविले होते. 

‘इंटरनॅशनल फायनान्स’ आणि ‘मॅक्रोइकॉनॉमिक्स’ हे गीता यांचे संशोधनाचे विषय आहेत. प्राथमिक शिक्षण म्हैसूरमध्ये, तर पदवीपर्यंतचे शिक्षण दिल्लीत पूर्ण केल्यानंतर गीता यांनी ‘दिल्ली स्कूल ऑफ इकनॉमिक्स’मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठात एमएची पदवी घेतली. २००१मध्ये त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली. त्यासाठी त्यांना वुड्रो विल्सन फेलोशिप रिसर्च अॅवॉर्ड मिळाले होते. त्या ‘अमेरिकन इकॉनॉमिक्स रिव्ह्यू’च्या सहसंपादक आणि ‘नॅशनल ब्यूरो ऑफ इकोनॉमिक रिसर्च’मध्येही कार्यरत होत्या. २००१ ते २००५ या कालावधीत शिकागो विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून काम केलेल्या गीता २००५पासून हार्वर्ड विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. याच विद्यापीठात पुढे त्यांची पदोन्नती होत गेली. गीता यांचे कुटुंब मूळचे केरळचे. केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्या आर्थिक सल्लागार म्हणूनही गीता यांनी कार्यभार सांभाळला होता.    

‘गीता या जगातील अव्वल अर्थतज्ज्ञांपैकी एक असून, त्यांना या विषयातील आंतरराष्ट्रीय स्तरावरचा मोठा अनुभव आहे. जगभरातील महिलांसाठी त्या ‘रोल मॉडेल’ आहेत,’ असे ‘आयएमएफ’च्या व्यवस्थापकीय संचालिका ख्रिस्टिन लेगार्ड यांनी गीता यांच्याबद्दल म्हटले आहे. 

या पदावर नियुक्ती होणे हा मोठा बहुमान असल्याची भावना गीता यांनी व्यक्त केली आहे. ‘डॉलर हा जागतिक अर्थकारणातील आणि व्यवहारातील महत्त्वाचा मुद्दा आहे. या अर्थकारणात डॉलरचे असलेले स्थान समजून घेण्यात आपल्याला रस असल्याचे गीता यांनी म्हटले आहे. तसेच अनेक देशांचे डॉलरमध्ये होणारे व्यवहार, त्याचा आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर होणारा परिणाम आणि डॉलरची तूट भासल्यास त्याचा जागतिक अर्थकारणावर होणारा परिणाम हे आपल्या अभ्यासाचे विषय असतील,’ असे गीता यांनी म्हटले आहे. महत्त्वाच्या धोरणविषयक प्रश्नांमध्ये बौद्धिक नेतृत्व करण्याची संस्थेची परंपरा पुढेही सुरू ठेवण्याचा प्रयत्न आपण करू, असे त्यांनी म्हटले आहे. 

‘जागतिकीकरणामुळे काही प्रश्न उपस्थित झाले असून, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. व्यापारामुळे जागतिक गरिबी कमी झाली असून, जीवनमान उंचावले आहे. तरीही असमानतेचा प्रश्न आणि नियमांमध्ये एकवाक्यता आहे का, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search